डोंगर कापणी आणि भराव घालवणे या प्रकारांवर २४ घंटे लक्ष ठेवण्याचा तलाठ्यांना आदेश

पणजी, १२ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यातील डोंगर कापणी आणि भराव घालणे, या प्रकारांवर २४ घंटे लक्ष ठेवण्याबरोबरच त्यासंदर्भात अहवाल देणे, तसेच शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशीही निरीक्षण करण्याची सूचना तलाठ्यांना करण्यात आली आहे. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी ए. अश्विन चंद्रू यांनी यासंबंधी आदेश काढला आहे. यासंबंधीची छायाचित्रे आणि व्हिडिओ यांचे पुरावे जोडून त्यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना द्यावा लागणार आहे. तलाठ्यांनी यासाठी गस्तीपथकाशी समन्वय करणे महत्त्वाचे असल्याचे जिल्हाधिकारी ए. अश्विन चंद्रू यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे प्रशासनाची त्वरित कारवाई टाळण्यासाठी अनधिकृत डोंगर कापणी, भराव घालणे आदी प्रकार शनिवार, रविवार किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी होत असतात, असे यापूर्वी आढळून आलेले आहे.

वायनाड, केरळ येथे झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकार डोंगर कापणी, भराव घालणे आदींविषयी सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकत्याच झालेल्या राज्य आपत्कालीन यंत्रणेच्या बैठकीतही डोंगर कापणी आणि भराव घालणे, या प्रकारांवर लक्ष ठेवण्याचे दायित्व संबंधित भागातील तलाठ्याचे असल्याचे म्हटले होते. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी ए. अश्विन चंद्रू यांनी यासंबंधी आता आदेश काढला आहे.