साधकांनो, सकारात्मकतेचे महत्त्व जाणा आणि त्यासाठी प्रयत्न करून सर्व प्रकारच्या समस्यांवर मात करण्यासाठी सक्षम व्हा !
‘मनुष्याच्या मनात २ प्रकारचे विचार असतात – सकारात्मक आणि नकारात्मक. सकारात्मक विचारांमुळे व्यक्ती आनंदी जीवन जगते, तर नकारात्मक विचारांच्या व्यक्तीला दुःख भोगावे लागते. ‘काळा चष्मा घालणार्याला सर्व जग काळेच दिसते. त्याप्रमाणे ‘नकारात्मक विचार करणे’, हा स्वभावदोष असलेल्या व्यक्तीला समोरचे प्रसंग आणि व्यक्ती यांमध्ये नेहमी काहीतरी खोट दिसते. तिच्या मनातील अनावश्यक शंका आणि प्रश्न यांमुळे ती स्वतःला आणि अन्यांना गोंधळात टाकते.
एकदा ‘बाटा’ या आस्थापनाने एका वरिष्ठ अधिकार्याला आफ्रिकेत बुटाच्या ‘सेल्स प्रमोशन’साठी पाठवले. ‘तेथील सर्व लोक अनवाणीच चालतात’, हे पाहून ‘तेथे ‘सेल्स प्रमोशन’ करू शकत नाही’, असे त्याने व्यवस्थापनाला सांगितले. ते ऐकणार्या एका तरुणाने आफ्रिकेत ‘सेल्स प्रमोशन’साठी जाण्याची संधी मागितली. तो तेथे जाऊन आल्यावर सर्व लोक अनवाणी चालत असल्यामुळे ‘तेथे बुटाच्या ‘सेल्स प्रमोशन’ला पुष्कळ मोठा वाव आहे’, असे त्याने सांगितले. येथे तीच परिस्थिती असतांना दोघांच्या विचारप्रक्रियेतील फरक आपल्या लक्षात येतो; म्हणून सदैव सकारात्मक विचार करावा.
मनुष्य सत्ता, संपत्ती, शक्ती किंवा पद यांमुळे मोठा होत नाही किंवा मोठा मानला जात नाही. त्याचे मोठेपण चांगल्या आणि सकारात्मक विचारांवरून ठरते.
१. नकारात्मकतेचे प्रकटीकरण
‘चिडचिड होणे, राग येणे, भीती वाटणे, आरडाओरडा करणे, रडणे, आकांडतांडव करणे, आदळआपट करणे, इतरांची निंदा करणे’, यांसारख्या कृतींमधून नकारात्मकतेचे प्रकटीकरण होते.
२. नकारात्मक विचारांमुळे होणारी हानी
अ. नकारात्मक विचारांची व्यक्ती मनाने दुर्बल आणि शंकेखोर असते. अनावश्यक आणि निरर्थक विचारांच्या ओझ्याखाली ती दबून जाते.
आ. नकारात्मक विचारांमुळे तिची इच्छाशक्ती आणि क्रियाशक्ती दुर्बळ होते. निष्क्रीयतेमुळे त्या व्यक्तीची ज्ञानार्जनाची आणि शिकण्याची प्रक्रिया बंद पडते.
इ. तिचे व्यष्टी आणि समष्टी जीवन दुःखी होते. तिला नैराश्य येते.
ई. नकारात्मक विचारांच्या व्यक्तीमुळे समोरची व्यक्ती निरुत्साही होते आणि आनंदापासून दूर जाते.
उ. नकारात्मक विचारांमुळे त्या व्यक्तीची स्वतःची आणि तिच्या कुटुंबियांची हानी होते. तिचे भविष्य अंधारमय बनते.
३. नकारात्मक विचारांचा शरिरावर होणारा परिणाम
एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २ रुग्णांची स्थिती फारच गंभीर होती. त्यांचा अंतकाळ जवळ आल्याचे जाणवत होते. हे पाहून तेथेच उपचार घेत असलेल्या तिसर्या रुग्णाच्या मनात ‘मी वाचणार नाही’, असा विचार आला. खरेतर, तो तिसरा रुग्ण उपचाराने बरा होऊ शकला असता; परंतु त्याच्या मनातील नकारात्मक विचारांमुळे त्याची शारीरिक स्थिती खालावली आणि तो मरण पावला. यावरून ‘मनात येणारे विचार शरिरावर कसे परिणाम करतात ?’, हे लक्षात येते.
४. नकारात्मकता दूर करून सकारात्मकता वाढवल्याने होणारे लाभ
४ अ. सर्व प्रकारच्या संकटांतून सहजतेने बाहेर पडता येणे : सकारात्मक व्यक्तीचे मन आनंदी आणि उत्साही असल्यामुळे तिचे शरीरही तिला तितक्याच सकारात्मकतेने साथ देते. कोणत्याही प्रकारची संकटे किंवा शारीरिक आणि मानसिक त्रास यांमधून ती व्यक्ती अगदी सहज बाहेर पडते. याचे उदाहरण पुढे दिले आहे.
दुसर्या महायुद्धाच्या वेळी हिटलरने शत्रू सैनिकांना पकडून तंबूत (कॅम्पमध्ये) त्यांच्यावर भयंकर अत्याचार केले. त्यांना अंघोळीला उकळते पाणी दिले, रोगजंतूंची इंजेक्शन्स दिली, खायला निकृष्ट आणि अपुरे अन्न दिले, तसेच त्यांच्याकडून शारीरिक कष्टाची कामे करून घेतली. त्या वेळी तेथे (कॅम्पमध्ये) सकारात्मक विचारांच्या काही व्यक्ती होत्या. त्या व्यक्ती सर्व प्रसंगांना सकारात्मकतेने आणि आनंदाने सामोरे गेल्या. त्यामुळे त्यांना पुष्कळ दुःख भोगूनही आनंदी रहाता आले. त्यांना मरण आले नाही; मात्र बाकी सर्व नकारात्मक विचारांच्या व्यक्तींना शारीरिक त्रासाने रोगग्रस्त होऊन मृत्यूला कवटाळावे लागले.
४ आ. आपले विचार सकारात्मक असतील, तर त्यांचा सकारात्मक परिणाम घरातील वातावरण, कुटुंबीय, मित्र, कार्यालयातील सहकारी आणि समाजातील व्यक्ती यांच्यावर होतो अन् तेही सकारात्मक होतात.
५. सकारात्मक रहाण्यासाठी उपाय
५ अ. सकाळी उठल्यानंतर भगवंताला प्रार्थना करणे : सकारात्मक विचार हे सुखी आणि स्वस्थ जीवनाचे आधारस्तंभ आहेत. सकाळी उठल्यावर ‘आजचा दिवस पहायला मिळाला’, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पुढीलप्रमाणे प्रार्थना करावी, ‘हे भगवंता, मला दिवसभर तुझ्या अनुसंधानात ठेव. मला सदैव सकारात्मक रहाता येऊन प्रत्येक कृती आणि प्रसंग यांना आनंदाने सामोरे जाता येऊ दे. अडचणी आल्यास तुझ्या प्रेरणेने, उत्साहाने आणि आनंदाने मला त्यांवर मात करता येऊ दे. माझ्याकडून दृढ श्रद्धेने आणि सकारात्मकतेने प्रयत्न होऊन मला यश अन् आनंद प्राप्त होऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’
५ आ. आरशात पाहून स्वतःशी सकारात्मक बोलणे : आरशात पाहून ‘मी आज आनंदी दिसत आहे. माझा आजचा दिवस आनंदात आणि उत्साहात जाणार आहे. मला दिवसभर कोणत्याही प्रकारचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास होणार नाही’, असे स्वतःशी बोलावे.
५ इ. शरीरस्वास्थ्य सांभाळणे : शरीरस्वास्थ्याकडे दुर्लक्ष करू नये. शरीर स्वस्थ असेल, तर मन स्वस्थ आणि शांत रहाते. प्रतिदिन नियमित थोडा वेळ देऊन शरिराच्या स्वास्थ्यासाठी व्यायाम आणि योगासने करावीत. दीर्घ श्वसन करावे आणि प्राणायाम करावा.
५ ई. सत्संगात रहाणे : सतत चांगल्या लोकांच्या सहवासात आणि सत्संगात राहिल्याने नकारात्मकता जवळपास फिरकणार नाही. नेहमी चांगले ग्रंथ वाचावेत, संतांचे दर्शन घ्यावे, तसेच देवदर्शनासाठी देवळात जावे.
५ उ. आपले बोलणे हे आनंद आणि प्रेम वाढवणारे असावे.
५ ऊ. इतरांमधील गुण पहाणे : इतरांच्या दोषांकडे दुर्लक्ष करावे. त्यांच्यामधील गुणच पहावेत. त्यामुळे दोघांच्याही जीवनात आनंद निर्माण होतो, उदा. एक पाय नसलेल्या राजाने चित्रकारांना स्वतःचे चांगले चित्र काढण्यास सांगितल्यावर चित्रकारांनी नकार दर्शवला; मात्र एका चित्रकाराने ‘तो राजा एक पाय पुढे करून एका पायावर बसून शिकार करण्याच्या पवित्र्यात आहे’, असे चित्र रंगवून राजाकडून पारितोषिक मिळवले.
५ ए. स्वयंसूचना देणे : ‘नकारात्मक विचार मनात येऊ नयेत’, यासाठी आणि मनात नकारात्मक विचार आला, तर लगेच मनाला त्याची जाणीव होण्यासाठी स्वयंसूचना द्याव्यात.
५ ऐ. मनाला सकारात्मक दृष्टीकोन देणे : सकारात्मक दृष्टीकोनांची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. जीवन पुष्कळ सुंदर आहे. सूर्य आणि चंद्र नियमित उगवतात अन् मावळतात. सृष्टीचे सौंदर्य क्षणाक्षणाला पालटत असते. त्यामध्येही पुष्कळ आनंद असतो. मला तो आनंद अनुभवायचा आहे.
२. सतत शिकण्याच्या स्थितीत राहिल्याने मला शिकण्यातील आनंद मिळणार आहे.
३. कोणत्याही प्रसंगात किंवा घटनेत ‘कोणत्या सूत्राला किती महत्त्व द्यायचे ?’, हे ठरवून मला निर्णय घेता येणार आहे.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनीच मला ही सूत्रे सुचवली आणि त्यांनीच ती माझ्याकडून लिहून घेतली. मी ही सूत्रे त्यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करतो.’
– श्री. अशोक लिमकर (वय ७२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.१.२०२४)