केंद्र सरकारने बांगलादेशातील अत्याचारग्रस्त हिंदूंच्या साहाय्यासाठी पावले उचलावीत ! – भारतीय विचारवंत
|
नवी देहली – केंद्र सरकारने बांगलादेशातील अत्याचारग्रस्त हिंदूंच्या साहाय्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी देशातील ५७ विचारवंतांनी केंद्रातील भाजप सरकारला पत्र लिहून केली आहे. ‘या हिंसाचाराला भारतीय संसदेने ‘हिंदूंवरील धार्मिक हिंसा’ म्हणून मान्यता दिली पाहिजे’, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे. या पत्रात बांगलादेशातील मेहेरपूरमधील इस्कॉन मंदिर जाळण्याचा व्हिडिओ आणि हिंदूंच्या जमावाकडून झालेल्या हत्यांचा संदर्भ देत या घटना अस्वस्थ करणार्या असल्याचे म्हटले आहे. या पत्रावर लेखक विक्रम संपत, अभिनव अग्रवाल, अरुण कृष्णन्, हर्ष गुप्ता मधुसूदन, स्मिता बरुआ, शास्त्रज्ञ आनंद रंगनाथन् आणि अभियंता योगिनी देशपांडे यांचा समावेश आहे.
हिंदूंच्या दडपशाहीवर चिंता व्यक्त करत या विचारवंतांनी लिहिले की,
१. हिंदूंना लक्ष्य करणार्या या हिंसाचाराने जगाचे लक्ष एका नव्या पद्धतीकडे वेधले आहे. हिंदूंवर आक्रमणे होण्याच्या एकाएकी घटना घडत आहेत, असे नाही. बांगलादेशात मोठा इतिहास असलेल्या हिंदूंवर होणारी आक्रमणे राजकीय अस्थिरतेच्या काळात अधिक तीव्र होतात.
२. बांगलादेश जेव्हा पूर्व पाकिस्तान होता, तेव्हा पाकिस्तानी सैन्याने २५ लाख हिंदूंना कसे मारले होते, याची आठवण करून दिली आहे. वर्ष २०१३ पासून आतापर्यंत बांगलादेशात हिंदूंवर ३ सहस्र ६०० हून अधिक आक्रमणांच्या घटना घडल्या आहेत.
३. बांगलादेशातून हिंदूंच्या दुःखाचे स्मरण करून त्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्यात यावीत. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या स्तरावर हा प्रश्न मांडावा आणि भारत सरकारने उच्च पातळीवर तो सोडवण्यासाठी पावले उचलावीत. तसेच भारतीय संसदेने त्या विरोधात ठराव संमत करावा. हिंदूंच्या सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने पावले उचलली जावीत आणि पीडितांना साहाय्य करण्यापासून आश्रय देण्यापर्यंतच्या पर्यायांचा विचार करण्यात यावा.