सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात त्यांच्या अस्तित्वामुळे साधकाला खोकल्याचा त्रास न होणे

श्री. अशोक लिमकर

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगाची ओढ लागणे 

‘मी काही दिवस सेवेनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. एक दिवस सकाळपासूनच माझे मन आनंदी आणि प्रफुल्लित होते. ‘मी दुपारी नामजप करत असतांना आज गुरुदेवांचा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा) सत्संग लाभणार आहे’, असे मला समजले. मन, इंद्रिये आणि सर्व शरीर आनंद अन् चैतन्य यांनी भारित झाल्याचे मला जाणवू लागले. बर्‍याच कालावधीने मला गुरुदेवांचे दर्शन होणार’, हा विचार सतत माझ्या मनात येत होता. मला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. ‘मी कधी एकदा सत्संगाला जातो’, असे विचार माझ्या मनात येत होते.

२. ‘सतत खोकला येत असल्याने सत्संगाला कसा जाणार ?’, असा विचार मनात येणे आणि ‘गुरुदेवच यातून मार्ग काढतील’, अशी दृढ श्रद्धा असणे 

‘मला सतत खोकल्याचा त्रास होत आहे’, याचा मला विसरच पडला होता. ‘१५ ते २० मिनिटांमध्ये मला २ – ४ वेळा खोकल्याची उबळ येत असे. तेव्हा मला सतत खोकला आल्यामुळे माझा जीव कासावीस होत असे. अशा स्थितीत ‘मी सत्संगाला कसा जाणार ?’, असा विचार माझ्या मनात येऊन मी अस्वस्थ झालो. ‘गुरुदेवांच्या सत्संगासाठी जायचे आहे, तर तेच काहीतरी मार्ग काढतील आणि मला सत्संगाचा लाभ नक्की मिळेल’, अशी माझी दृढ श्रद्धा होती.

३. साधकाने गुरुचरणी केलेली प्रार्थना 

मी तळमळीने आणि श्रद्धेने परम पूज्य गुरुदेवांना प्रार्थना करत होतो. ‘हे गुरुदेवा, ‘मला आपल्या कटाक्षाचा एक क्षण पुरेसा आहे. मला आपल्या दर्शनाची संधी मिळू दे. आपल्या सत्संगात मला खोकला येणे पूर्ण थांबू दे आणि त्या वेळी मला आणि अन्य साधकांना माझ्या खोकल्यामुळे कोणताही त्रास होऊ नये’, अशी आपल्या चरणी प्रार्थना !

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे केवळ अस्तित्व आणि साधकाने केलेली प्रार्थना यांमुळे सत्संगाच्या वेळी खोकल्याचा त्रास न होणे 

‘गुरुकृपा कशी कार्य करते ?’ हे सूत्र ‘गुरुकृपायोगाचे माहात्म्य’ या ग्रंथामध्ये मी वाचले होते. त्यातील ‘गुरुदेवांच्या केवळ अस्तित्वाने कार्य होते’, या सूत्राची मी १०० टक्के अनुभूती घेतली. मी तळमळीने आणि श्रद्धेने प.पू. गुरुदेवांना केलेल्या प्रार्थनेमुळे आणि त्यांच्या अस्तित्वाने सत्संगाच्या अडीच घंट्यांच्या कालावधीत मला एकदाही खोकला आला नाही. सत्संगानंतर रात्री अर्धा घंटा खोकला आला; परंतु त्यानंतर कफ बाहेर पडून मला पुष्कळ शांत वाटले.

‘प.पू. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला सत्संगात खोकला आला नाही आणि सत्संगाचा लाभ झाला’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. अशोक लिमकर (वय ७३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.