व्यष्टी साधना गांभीर्याने करणारी ५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्चस्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली मंगळुरू येथील कु. वै.जी. पूर्वी (वय १४ वर्षे) !
कु. वै.जी. पूर्वी हिला १४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
श्रावण शुक्ल सप्तमी (१२.८.२०२४) या दिवशी मंगळुरू (कर्नाटक) येथील कु. वै.जी. पूर्वी हिचा १४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. ‘कु. पूर्वी २ वर्षांची असतांना मला म्हणायची, ‘‘आई, मला श्रीकृष्णाचा पोषाख घाल.’’ ती ५ वर्षांची झाल्यावर श्रीकृष्णाचे चित्र काढायची. ती श्रीकृष्णाशी बोलत बसायची.
२. घरातील कामे दायित्वाने करणे
अ. ती घरातील कामे दायित्वाने पूर्ण करते. ती कोणत्याही गोष्टीसाठी माझ्यावर अवलंबून रहात नाही. कधी मला जेवण बनवायला जमले नाही, तर ती स्वतः जेवण बनवते. मी जेवण न बनवल्याविषयी तिची कधी तक्रार नसते.
आ. ती शाळेतून घरी आल्यानंतर घरात कोणतेही काम असेल, तर ते ती पूर्ण करते. ती घरात तिच्या आजीची (माझी सासूबाईंची) काळजी घेते. त्यांना काही खायला हवे असेल, तर ती त्यांना विचारून बनवून देते. आम्ही सांगितलेले नसतांनाही ती हे सर्व करते.
३. सनातनचा सत्संग चालू झाल्यापासून ती न चुकता कपाळाला कुंकू लावते. तिला आधुनिक पोषाख घालायला आवडत नाही.
४. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
अ. तिची चूक झाली, तर ती लगेच क्षमायाचना करते, तसेच ‘ती चूक पुन्हा होऊ नये’, यासाठी प्रयत्न करते.
आ. शाळेतून घरी आल्यानंतर दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम किंवा भ्रमणभाष न पहाता ती नामजपादी उपाय करते. त्यामुळे तिला उत्साह वाटतो.
इ. कु. पूर्वी प्रतिदिन १ घंटा जप करते. ती परीक्षेच्या वेळीही नामजप करते. सेवा, अभ्यास आणि जेवण, या कृती करण्यापूर्वी ती प्रार्थना करते अन् या कृती झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करते.
५. तिला सेवा करण्याची संधी मिळाल्यास ती सेवा करते. आता ती इतरांना साधना सांगण्याचा प्रयत्न करते.
६. पू. रमानंद गौडा यांचे मार्गदर्शन लाभल्यावर आनंद होणे : पू. रमानंदअण्णांचे (सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा (वय ४८ वर्षे) यांचे) मार्गदर्शन ऐकल्यावर तिला पुष्कळ प्रेरणा मिळते. पू. अण्णांचे मार्गदर्शन लाभल्यावर आणि त्यांची भेट झाल्यावर तिला पुष्कळ आनंद अन् कृतज्ञता वाटते. एकदा पू. अण्णा घरी येऊन गेल्यानंतर ती पुष्कळ रडत होती. ती म्हणते, ‘‘पू. अण्णांनी सांगितल्याप्रमाणे साधना केली पाहिजे.’’
७. कु. पूर्वी हिला आलेल्या अनुभूती
अ. एकदा भरतनाट्यम्च्या वर्गाला जातांना एक मुलगा तिची चेष्टा करू लागला. हे पाहून ती घाबरून पळू लागली. पळतांना तिने गळ्यातील श्री गुरूंची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि प.पू. भक्तराज महाराज यांची) चित्रे असलेले पदक हातात धरले आणि ‘गुरुदेवा, तूच रक्षण कर’, अशी प्रार्थना केली. नंतर तिने थोड्या वेळाने मागे पाहिले असता तो मुलगा तिला कुठेच दिसला नाही. ‘गुरूंनी माझे रक्षण केले’, असे म्हणून तिने कृतज्ञता व्यक्त केली.
आ. एकदा तिची समाजशास्त्राची परीक्षा असल्याने तिने समाजशास्त्राचा अभ्यास केला. ती रात्री झोपायला जात असतांना तिला शाळेतून लघुसंदेश आला, ‘उद्या समाजशास्त्राची परीक्षा नसून विज्ञानाची परीक्षा आहे.’
ऐनवेळी परीक्षेच्या विषयात पालट झाल्याने ती घाबरून गोंधळून गेली. तेव्हा मी तिला सांगितले, ‘‘गुरूंना प्रार्थना कर. ते तुला साहाय्य करतील. तू सकाळी लवकर उठून अभ्यास कर.’’ सकाळी उठल्यानंतर पुष्कळ पाऊस पडल्याने तिच्या शाळेला सुटी मिळाली आणि त्या दिवशी होणारी परीक्षा रहित झाली. त्या दिवसापासून तिच्या मनातील श्रीकृष्ण आणि गुरु यांच्याप्रतीचा भाव वाढला आहे. आता तिच्याकडून प्रार्थना आणि कृतज्ञता यांसाठीचे प्रयत्न अधिक होतात.
८. स्वभावदोष : राग येणे, आळशीपणा आणि चालढकलपणा’
– सौ. गीता योगीश (कु. पूर्वी हिची आई), मंगळुरू, कर्नाटक. (२३.५.२०२४)