सद्गुरुपदावर विराजमान असूनही नम्र आणि दास्यभावात असलेले सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

१. सुश्री (कु.) पूनम चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 

कु. पूनम चौधरी

१ अ. नम्रता : ‘सद्गुरु काका समाजातील संतांना भेटायला जातात. तेव्हा ते संतांचे दर्शन घेतांना संतांना साष्टांग नमस्कार करतात. बर्‍याच वेळा तेथील जागाही अस्वच्छ असते. सद्गुरु काका धर्मप्रेमी किंवा हिंदुत्वनिष्ठ यांच्या घरी जातात. तेव्हा त्यांच्या घरी कुणी वयस्कर असेल, तर सद्गुरु काका त्यांना वाकून नमस्कार करतात.

१ आ. शिकण्याची वृत्ती : मागील एक वर्षापासून मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून नामजपादी उपाय करत आहे. सद्गुरु काकांशी माझे अधूनमधून भ्रमणभाषवर बोलणे होत असते. तेव्हा ते मला ‘आश्रमातील साधक आणि संत यांच्याकडून काय शिकायला मिळाले ?’, असे विचारतात. ते सांगतात, ‘‘तुम्हाला जी सूत्रे शिकायला मिळतात, ती मला पाठवत रहा. मलाही शिकायचे आहे.’’ मध्यंतरी माझी प्रकृती बरी नव्हती. तेव्हा मला सूत्रे लिहून पाठवायला जमत नव्हते. तेव्हा सद्गुरु काकांनी मला ती सूत्रे ध्वनीमुद्रित करून पाठवण्यास सांगितले.

१ इ. इतरांचा विचार करणे : एकदा देहली सेवाकेंद्रात असतांना मला त्रास होत होता. त्या वेळी थंडीचे दिवस होते. सद्गुरु काका माझ्याकडे आले. तेव्हा त्यांना वाटले, ‘माझ्या पायांत चपला नसल्यामुळे मला थंडी वाजत असेल.’ त्यांनी लगेच माझ्या चपला शोधून काढल्या. स्वतःच्या हातांनी त्या चपला उचलून माझ्या समोर ठेवल्या अन् सांगितले, ‘‘प्रथम या चपला पायांत घाला आणि जपाला बसा.’’

१ ई. भाव

१ ई १. ‘रामनाथी आश्रमातून आलेला कोणताही निरोप, म्हणजे सनातनच्या ३ गुरूंचा संदेश आहे’, असा भाव असणे : सद्गुरु काका स्वतः आधुनिक वैद्य आहेत, तरी कधी त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना औषधे घ्यायची असतील, तर ते ‘त्यांना काय त्रास होत आहे ?’, हे ते रामनाथी आश्रमातील आधुनिक वैद्यांना सांगून ते सांगतील, ती औषधे घेतात, तसेच त्यांनी सांगितलेली पथ्येही पाळतात. रामनाथी येथून आलेला कोणताही निरोप म्हणजे ‘साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा संदेश आहे’, असा सद्गुरु काकांचा भाव असतो अन् ते त्याचे काटेकोरपणे पालन करतात.

१ ई २. दास्यभाव जाणवणे : पुणे येथील साधक श्री. तुषार भास्करवार हे वर्ष २०२४ च्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सेवेसाठी गोव्यात आले होते. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘सद्गुरु काका जवळून जरी गेले, तरी त्यांच्यातील दास्यभाव जाणवतो आणि त्यांच्याकडून तशी स्पंदने येत असल्याचे जाणवते.’’

१ उ. अनुभूती 

१ उ १. सद्गुरु काकांचे भावपूर्ण बोलणे ऐकल्यावर भावजागृतीचा प्रयत्न आपोआप होणे : सद्गुरु पिंगळेकाकांचे भ्रमणभाषवर बोलणे झाल्यावर ते म्हणतात, ‘‘रामनाथी आश्रम, तीन गुरु, सद्गुरु, सर्व संत, सर्व साधक, तसेच सृष्टीतील कणाकणाला माझा भावपूर्ण नमस्कार !’’ सद्गुरु काकांचे हे वाक्य ऐकून ‘कणाकणात गुरुदेव सामावलेले आहेत’, असा भाव ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या कृपेने माझ्याकडून आपोआप होऊ लागला आहे.

१ उ २. ‘दशमहाविद्या यज्ञा’च्या वेळी सद्गुरु काकांच्या संदर्भात आलेली अनुभूती : ऑक्टोबर २०२३ मध्ये रामनाथी आश्रमात ‘दशमहाविद्या यज्ञ’ झाला. त्या वेळी एका सूत्राविषयी माझे सद्गुरु काकांशी बोलणे झाले. तेव्हा ‘दशमहाविद्यादेवीच्या चरणी माझा नमस्कार !’, असे त्यांनी मला सांगितले. मी यज्ञस्थळी जाऊन सद्गुरु काकांच्या वतीने देवीला नमस्कार करत होते. तेव्हा मला पुढील दृश्य दिसले, ‘सद्गुरु काका बालकरूपात देवीच्या श्री चरणी नतमस्तक झाले आहेत. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आरती करत आहेत. तेव्हा सद्गुरु काका बालरूपात आहेत अन् त्यांनी आरतीचे तबक धरले आहे.’ याविषयी सद्गुरु काकांना कळवल्यावर ते म्हणाले, ‘‘मी असाच भाव ठेवला होता. तुम्हाला योग्य दृश्य दिसले.’’

१ उ ३. ‘नवचंडी यागा’च्या वेळी आलेल्या अनुभूती 

१ उ ३ अ. ‘श्री दुर्गादेवी सद्गुरु काकांवर आक्रमण करणार्‍या अनिष्ट शक्तींशी सूक्ष्म युद्ध करत आहे’, असे दृश्य दिसणे : गुरुदेवांच्या जन्मोत्सवानिमित्त २८ ते ३०.५.२०२४ या कालावधीत रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात ‘नवचंडी याग’ झाला. सनातनचे पुरोहित नवव्या अध्यायाच्या वेळी यज्ञात आहुती देत असतांना गुरुकृपेने मला पुढील दृश्य दिसले, ‘श्री दुर्गामाता सांगत आहे, ‘सद्गुरु पिंगळेकाकांवर अनिष्ट शक्तींचे आक्रमण होत आहे. त्यांच्या रक्षणासाठी हा अध्याय आहे.’ तेव्हा पाताळातून आक्रमण करणार्‍या अनिष्ट शक्तींशी श्री दुर्गामाता सूक्ष्मातून युद्ध करत होती.’

१ उ ३ आ. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ, श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ आणि सद्गुरु काका वैकुंठलोकात जाऊन श्रीविष्णूच्या रूपातील गुरुदेवांची चरणसेवा करत आहेत’, असे दिसणे : त्यानंतर मला दिसले, ‘सद्गुरु पिंगळेकाका भगवान श्रीविष्णूचे चरणसेवक बनून वैकुंठलोकात गेले आहेत. वैकुंठलोकात गुरुदेव श्रीविष्णूच्या रूपात शेषशय्येवर पहुडले आहेत. तेथे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु काका त्यांची चरणसेवा करत आहेत.’

श्री. आनंद जाखोटिया

 २. श्री. आनंद जाखोटिया (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ३८ वर्षे), उज्जैन, मध्यप्रदेश. 

अ. ‘सेवा भावपूर्ण आणि परिपूर्ण कशा प्रकारे करायला हवी ?’, याविषयी सद्गुरु काका आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात.’

सौ. मंजुला कपूर

३. सौ. मंजुला कपूर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५७ वर्षे), देहली 

अ. ‘सद्गुरु पिंगळेकाकांना प्रत्येक विषयाचे अगाध ज्ञान आहे. ते प्रत्येक सूत्राचा सखोल अभ्यास करतात.

आ. सद्गुरु काका सर्व सेवा पुढाकार घेऊन करतात. ते ‘हे माझ्या गुरुदेवांचे कार्य आहे’, असे म्हणून साधकांच्या समवेत सेवा करतात. त्यामुळे सर्व साधकांना सेवा करायला उत्साह मिळतो.

इ. सद्गुरु काका साधकांना सांगतात, ‘‘कितीही अडचणी आल्या, तरी आपल्याला प्रत्येक प्रसंगातून शिकायचे आहे’, हे लक्षात घेऊन सकारात्मक रहायला हवे.’’

ई. एखादा प्रसंग घडल्यावर मी सद्गुरु पिंगळेकाकांना आत्मनिवेदन केले, तर मला चैतन्य अन् ऊर्जा मिळते. जेव्हा माझ्या मनात काही शंका असतात, तेव्हा एखाद्या साधकाकडून सद्गुरु काकांचा निरोप येतो आणि मला मार्गदर्शन मिळते.

‘हे गुरुदेव, ‘तुमच्या कृपेने आम्हा सर्व साधकांना सद्गुरु काकांचे अमूल्य मार्गदर्शन आणि सहवास मिळत आहे’, याबद्दल आम्ही सर्व साधक तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो. ‘हे गुरुदेवा, आमच्यात भक्तीभाव निर्माण करा. आमच्याकडून तुम्हाला आणि सद्गुरु काकांना अपेक्षित अशी समष्टी सेवा करून घ्या’, हीच आपल्या श्री चरणी एकमेव प्रार्थना आहे.’- सौ. मंजुला कपूर

(सर्व सूत्रांचा दिनांक : ५.७.२०२४)