Farooq Abdullah : (म्हणे) ‘भारतीय सैन्यदल आणि आतंकवादी यांच्यामध्ये संगनमत !’ – काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला
काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचे संतापजनक विधान
श्रीनगर – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी भारतीय सैन्यदलाविषयी केलेल्या संतापजनक विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. देशाच्या सीमेवर तैनात असलेले सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यामध्ये संगनमत असल्याचा गंभीर आरोप फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. देशाच्या सीमेवर सुरक्षादलाचे जवान तैनात असतांनाही घुसखोरी कशी होते ? असा प्रश्न फारुख अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे. सीमेवर अंमली पदार्थांची तस्करीही केली जाते. सैन्य आणि आतंकवादी यांच्यामध्ये संगनमत आहे, असे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.
जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात फारुख अब्दुल्ला कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. फारुख अब्दुल्ला म्हणाले की, शेकडोंच्या संख्येने आतंकवादी देशात कसे प्रवेश करत आहेत ?, याचे उत्तरे मिळायला हवे. (काश्मीरमध्ये पाकप्रेमींची संख्या कमी नाही. त्यामुळे काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करणे पाकपुरस्कृत आतंकवाद्यांना सोपे जाते, याची अनेक उदाहरणे आहेत ! – संपादक) याविषयी कुणाचे तरी उत्तरदायित्व निश्चित केले पाहिजे. सीमा हा केंद्र सरकारचा विषय आहे आणि देशाचे गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री यांनी या संदर्भात बोलले पाहिजे.
(सौजन्य : Zee News)
फारुख अब्दुल्ला यांचे आरोप दुर्दैवी ! – गुलाम नबी आझाद
फारुख अब्दुल्ला यांच्या संतापजनक वक्तव्याविषयी गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखालील ‘डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी’ने (‘डीपीएपी’ने) आक्षेप घेतला आहे. फारुख अब्दुल्ला यांनी भारतीय सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, हे दुर्दैवी असल्याचे ‘डीपीएपी’ने म्हटले आहे. फारुख अब्दुल्ला यांचे हे विधान म्हणजे देशासाठी बलीदान देणार्या भारतीय सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासाखे आहे, असे ‘डीपीएपी’चे प्रवक्ते श्री. अश्वनी हांडा यांनी म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाभारतीय सैन्यदलावर बिनबुडाचे आरोप करून त्यांचे मानसिक खच्चीकरण करणार्या अशा राजकारण्यांच्या विरोधात राष्ट्रदोहाचा खटला चालवून त्यांना कारागृहात डांबण्याची मागणी राष्ट्रप्रेमींनी केल्यास आश्चर्य वाटणार नाही ! |