राज्य आपत्ती प्रतिसाद निधी यंदा दुप्पट करणार !
मुंबई – अतीवृष्टी आणि पूर यांनी बाधित झालेल्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद साहाय्य यंदा दुप्पट किमतीने देण्यात येणार आहे. लाखो कटुंबांना याचा लाभ होणार आहे. केंद्राच्या नैसर्गिक आपत्ती निकषांच्या धर्तीवर राज्यातही नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद निधीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्यास बाधितांना या निधीच्या माध्यमातून साहाय्य केले जाते. या साहाय्यामधील ७५ टक्के वाटा केंद्राचा, तर २५ टक्के भार राज्य सरकारवर असतो. २ दिवसांपेक्षा अधिक काळ क्षेत्र किंवा घर पाण्यात बुडाले असल्यास, घर पूर्णत: वाहून गेले असल्यास प्रतीकुटुंब कपड्यांच्या हानीसाठी ५ सहस्र आणि घरगुती भांडी, वस्तू यांच्या हानीसाठी ५ सहस्र असे लगेच देण्यात येणार आहेत. या वेळी केवळ घरात पाणी शिरून हानी झाली, तरीही साहाय्य मिळणार आहे. तर दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या हानीच्या ७५ टक्के किंवा ५० सहस्र रुपयांपर्यंत साहाय्य दिले जाणार आहे. टपरीधारकांना साहाय्याचेही यात प्रावधान आहे.