संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहासाठी शासनाकडून २० कोटी रुपयांचे साहाय्य ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

केशवराव भोसले नाट्यगृहाची पहाणी करतांना मुख्यमंत्री

कोल्हापूर – संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापुरातील ऐतिहासिक नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाशी कलाकार, रसिक आणि कोल्हापूरकर यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. या भावनांचा विचार करून लवकरात लवकर नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीसाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी शासनाकडून २० कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आगीमुळे झालेल्या नाट्यगृहाच्या हानीची पहाणी केल्यावर त्यांनी ही घोषणा केली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘हे नाट्यगृह युद्धपातळीवर कोल्हापूरवासियांसाठी पुन्हा उभे करण्यासाठी महानगरपालिकेने सिद्ध केलेल्या आराखड्यानुसार २५ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. नाट्यगृहाचा ५ कोटी रुपयांचा विमा होता. उर्वरित निधी शासनाकडून दिला जाईल.’’

या वेळी राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांसह विविध अधिकारी, कलाकार आणि नाट्यप्रेमी उपस्थित होते.

जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल ! – मुख्यमंत्री

आगीच्या संदर्भात न्यायवैद्यक विभाग आणि पोलीस याचे अन्वेषण करत आहोत.  सखोल चौकशी होऊन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, असे मुख्यमंत्र्यांनी या प्रसंगी सांगितले.


नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी लागणारा निधी वेळेत देऊ ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

कोल्हापूर – दुर्दैवी घटनेत कोल्हापूर येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची हानी झाली. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याची घोषणा केली असून नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी लागणारा निधी वेळेत देऊ, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले. ११ ऑगस्टला नाट्यगृहाची पहाणी केल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.