अमली पदार्थांच्या व्यवसायात गाेमंतकियांचा वाढता सहभाग
पणजी, ११ ऑगस्ट (वार्ता.) – अमली पदार्थांच्या व्यवसायात स्थानिकांचा सहभाग वाढत आहे. चालू वर्षाच्या ६ मासांच्या अहवालानुसार अमली पदार्थ व्यवसायाशी निगडीत कह्यात घेतलेल्यांमध्ये ४२ टक्के गोमंतकीय नागरिक आहेत. ही आकडेवारी गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ८० टक्के अधिक आहे.
अमली पदार्थ व्यवसायामध्ये गुंतलेल्यांना कह्यात घेतलेल्यांमध्ये वर्ष २०२३ मध्ये २८ टक्के, तर वर्ष २०२४ मध्ये २३ टक्के गोमंतकीय नागरिक होते. गेल्या २ वर्षांमध्ये गोवा पोलिसांनी अमली पदार्थांशी संबंधित एकूण ६५ प्रकरणांमध्ये ८५ नागरिकांना कह्यात घेतले आहे. यामध्ये १९ विदेशी नागरिक, ४५ गोव्याबाहेरील आणि २१ गोमंतकीय नागरिक आहेत. चालू वर्षी मागील ६ मासांत गोवा पोलिसांनी अमली पदार्थांशी संबंधित एकूण १३ प्रकरणांमध्ये १२ जणांना कह्यात घेतले आहे. यामध्ये ५ गोमंतकीय, ४ गोव्याबाहेरील नागरिक आणि ३ विदेशी नागरिक यांचा समावेश आहे. गोवा पोलिसांच्या मते पोलीस अमली पदार्थांच्या विरोधात प्रतिदिन पर्यटकांची वर्दळ अधिक असलेल्या ठिकाणी दिवसरात्र गस्त घालत असतात आणि या व्यवसायासंबंधी गोपनीय माहिती गोळा करत असतात. मद्यालये आणि ‘शॅक’ या ठिकाणी अचानकपणे भेटी देऊन तपासणी केली जाते. युवकांमध्ये अमली पदार्थांच्या विरोधात जागृती केली जात आहे, तसेच सरकारच्या विविध खात्यांशी योग्य समन्वय होण्यासाठीही नियमितपणे बैठकाही घेतल्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशन काळात मुख्यंमत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले होते की, ज्या आमदारांनी शैक्षणिक संस्थांमध्ये अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती दिली आहे, त्या आमदारांची गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकातील अधिकारी भेट घेणार आहेत.
संपादकीय भूमिकाअसे असतांना अमली पदार्थांना प्रोत्साहन देणारे सनबर्नसारखे कार्यक्रम होऊ न देणेच श्रेयस्कर ! |