गुरुदेवांच्या भेटीनंतर रुग्णाईत स्थितीत असलेल्या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्यामधील पालट अनुभवणार्या सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव !
सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव रामनाथी, गोवा येथील आश्रमात आल्या होत्या. २३.७.२०२४ या दिवशी त्या दोघी रुग्णाईत स्थितीत असलेल्या सनातनच्या ४८ व्या संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांना भेटायला गेल्या. त्या वेळी त्यांना जाणवलेली सूत्रे आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव पू. आजींना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेल्यावर पू. आजींमध्ये जाणवलेले पालट येथे दिले आहेत.
१. सद्गुरु अनुराधा वाडेकर, ठाणे सेवाकेंद्र, ठाणे.
१ अ. पू. दातेआजींच्या खोलीत गेल्यावर ‘मी एका पोकळीत जात आहे’, असे मला जाणवले. त्यांच्या खोलीत नीरव शांतता जाणवत होती.
१ आ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव पू. दातेआजींना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत आल्यावर पू. आजींमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याप्रमाणे त्यांच्या हालचाली होणे : आरंभी पू. आजींच्या शरिराची काहीच हालचाल होत नव्हती; पण सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव त्यांना भेटण्यासाठी आणि नामजपादी उपाय करण्यासाठी त्यांच्या खोलीच्या दाराजवळ आल्यावर ‘पू. आजींमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याप्रमाणे त्यांच्या शरिराच्या हालचाली होत आहेत’, असे मला जाणवले.
१ इ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आल्यावर पू. आजींनी डोळे उघडणे आणि ‘त्यांचे डोळे निर्गुण स्थितीत आहेत’, असे जाणवणे : आधी पू. आजींचे डोळे मिटलेले होते; पण गुरुदेव खोलीत आल्यावर त्यांनी डोळे उघडले. पू. आजींच्या डोळ्यांकडे पाहिल्यावर ‘त्यांचे डोळे निर्विकार आणि निर्गुण स्थितीत आहेत’, असे मला जाणवले. त्यांच्या डोळ्यांच्या पापण्याही लवत नव्हत्या. जणू त्या डोळ्यांनीच उपस्थित सर्वांना सांगत होत्या की, आता माझी कोणतीच इच्छा राहिलेली नाही. गुरुदेवांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सर्वकाही केले आहे.’
१ ई. पू. आजींच्या चेहर्यावर मृत्यू जवळ आल्याचे क्लेश न जाणवणे आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी ‘पू. आजींची आध्यात्मिक स्थिती शांतीची आहे’, असे सांगणे : ‘खरेतर मृत्यूचा क्षण जवळ येणे’, हे अतिशय यातनादायी असते; पण पू. आजींच्या चेहर्यावरून तसे काहीच जाणवत नव्हते. त्यांच्याकडे पाहून पुष्कळ चांगले वाटत होते. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितले, ‘‘पू. आजी मृत्यूच्या दाढेत असून त्यांची आध्यात्मिक स्थिती शांतीची आहे.’’ ‘शक्ती’, ‘चैतन्य’, ‘भाव’, ‘आनंद’ आणि त्यापुढे असणारी ‘शांती’ची स्थिती पू. आजी अनुभवत होत्या ! पू. आजींकडून शांती प्रक्षेपित होत होती. मृत्यूच्या दाढेत असतांना यातना सहन करून समष्टीला लाभ व्हावा, यासाठी गुरुदेवांच्या कृपेने पू. आजींची मोठी झुंज चालू होती.
१ उ. पू. आजींची सेवा करण्याच्या माध्यमातून ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव संपूर्ण कुटुंबाचा उद्धार करत आहेत’, असे जाणवणे : पू. आजींचे कुटुंबीय पू. आजींसाठी नामजप करतात. त्यांच्यासाठी आळीपाळीने वेगवेगळे नामजप कित्येक घंटे चालू असतात. पू. आजींच्या आशीर्वादाने आणि त्यांची सेवा केल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या साधनेतील अडथळे दूर होऊन ‘ते लवकर पुढे जातील’, असे मला वाटले. या माध्यमातून ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी संपूर्ण कुटुंबाचा उद्धार करण्याचे ठरवले आहे’, असे मला जाणवले.’
२. पू. (सौ.) संगीता जाधव, ठाणे सेवाकेंद्र, ठाणे.
२ अ. पू. दातेआजींची स्थुलातून हालचाल होतांना न दिसणे आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा आवाज ऐकल्यावर त्यांच्या हाता-पायाची हालचाल होऊ लागणे : ‘पू. दातेआजींना पाहिल्यावर ‘त्यांच्यात कोणतीच चेतना नाही’, असे वाटत होते; कारण स्थुलातून त्यांची काहीच हालचाल होत नव्हती. ‘त्यांचा श्वासोच्छ्वास चालू आहे कि नाही’, हेही कळत नव्हते. थोड्याच वेळात तिकडे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आले. ते बाहेरच्या खोलीत कोणाशीतरी बोलत होते. त्यांचा आवाज ऐकल्यावर पू. दातेआजींच्या पायांची आणि डाव्या हाताची हालचाल होऊ लागली. त्यांचा चेहरा आरंभी एकदम निस्तेज होता. नंतर तो हळूहळू तेजस्वी दिसायला लागला.
२ आ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव नामजपादी उपाय करत असतांना पू. दातेआजींनी प्रतिसाद देणे आणि त्यांचा चेहरा आनंदी दिसू लागणे : गुरुदेव पू. आजींसाठी नामजपादी उपाय करू लागले. तेव्हा पू. आजींचा चेहरा आनंदी दिसू लागला. त्यांनी मध्येच डोळे उघडले. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा पू. आजींबद्दल संवाद चालू असतांना तो ऐकून ‘आजी स्वतःच प्रतिसाद देत आहेत’, असे वाटत होते. काही क्षण असे वाटले की, त्या आता उठूनच बसतील. त्यांच्या शरिराच्या एका बाजूची हालचालही झाली.
२ इ. पू. दातेआजींच्या चेहर्यावर पुष्कळ आनंद दिसून तो शांत वाटणे आणि त्यांच्या ‘चेहर्यातून पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे : पू. आजी मध्येच डोळे उघडून इकडेतिकडे पहात होत्या. तेव्हा ‘त्यांना काही त्रास होत आहे’, असे वाटत नव्हते. काही वेळाने त्यांच्या चेहर्यावर पुष्कळ आनंद जाणवू लागला. नंतर थोड्या वेळाने त्यांचा चेहरा अतिशय शांत दिसू लागला. त्यांच्या ‘चेहर्यातून ‘हॅलोजन’प्रमाणे (टीप) पांढरा प्रकाश प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. (टीप : पांढर्या रंगाचा प्रखर प्रकाशझोत देणारा एक प्रकारचा दिवा)
२ ई. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव पू. दातेआजींना मृत्यूच्या छायेतून बाहेर काढत आहेत, असे वाटणे : गेल्या कित्येक दिवसांपासून पू. आजी मृत्यूशी झुंज देत आहेत. त्या अर्धबेशुद्धावस्थेत असून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव त्यांना मृत्यूच्या छायेतून बाहेर काढत आहेत. पू. आजी मृत्यूच्या दाढेत असूनही ‘आनंद’ आणि ‘शांती’ यांची अनुभूती घेत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मृत्यूच्या दारातही पू. आजी शांतीच्या स्थितीमध्ये आहेत’, हे मला प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.’
(लिखाणाचा दिनांक २८.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |