भारतीय संस्कृतीतील धार्मिक जीवन !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘विवाह जुळवण्यापूर्वी पाहिली जाणारी काही तत्त्वे, भारतीय हिंदु समाजातच विवाहपरंपरा सहस्रो वर्षे टिकून आहे आणि रजस्वला स्त्री आणि शास्त्र’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(लेखांक ३४)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/822454.html
प्रकरण ६
१. हिंदु माणसाच्या अंतःकरणातील धर्मकल्पना विकसित होणे महत्त्वाचे !
‘सामान्यपणे स्नान-संध्या, देवपूजा, उपवास, व्रत-वैकल्ये, तीर्थयात्रा, देवदर्शने, माळा-टिळा धारण इत्यादी गोष्टींना आपल्या आचारांत स्थान देणार्यांना ‘धार्मिक’ म्हटले जाते. भारतीय हिंदु संस्कृती आणि परंपरा या गोष्टींना निश्चितपणे स्थान आहे. तथापि ही सर्व बाह्यलक्षणे आहेत. बिजाच्या पूर्ततेने ज्याप्रमाणे अंकुर येतो, कळ्या परिपक्व झाल्या की, ज्याप्रमाणे त्यांचेच फूल होते किंवा गर्भकाळ पूर्ण झाल्यावर, गर्भाची परिपूर्ण वाढ झाल्यावर तेच जसे बालक म्हणून जन्म घेते, त्याप्रमाणे हिंदु माणसाच्या अंतःकरणातील धर्मकल्पना जेव्हा विकसित होते, तेव्हा ही लक्षणे स्वाभाविकच त्याच्या ठिकाणी दिसू लागतात. भोळे-भाबडेपणाने, भक्तीभावानेही ही लक्षणे प्राप्त होतात अन् पूर्ण भारतीय धर्मतत्त्वज्ञानाच्या अभ्यासानेही ती उत्पन्न होतात.
२. जगद्गुरु शंकराचार्यांनी जाणलेले मर्म !
शुद्ध ज्ञानस्वरूप असलेले जगद्गुरु शंकराचार्य संन्याशाची छाटी (काठीरूपी धर्मदंड), गंध धारण करत होते. तीर्थयात्रा आणि पूजाही करत होते. ‘मी संपूर्ण दृश्यविश्वाच्या पलीकडचा ‘चिदानंदरूप शिव’ आहे’, असे ते म्हणत होते. मग जर मी ‘तो’च आहे, तर मला त्या उपाधी कशाला ?’, असे ते म्हणाले नाहीत; कारण हा देह म्हणजे ‘मी’ नव्हे आणि उपाधी ‘मी’ला नसून देहाला आहे, हे ते जाणत होते.
३. हिंदु धर्माचे माहात्म्य वर्णन करणारी उद्बोधक वचने !
‘धर्म’ शब्दाचा अर्थ, सर्व व्याप्तींसह केवळ हिंदु धर्मातच आढळतो; म्हणून हिंदु धर्मातील पुढील वचने लक्षात घेतली पाहिजेत.
१. यतोऽभ्युदयनिःश्रेयससिद्धिः स धर्मः ।
– वैशेषिक दर्शन, अध्याय १, आह्निक १, सूत्र ३
अर्थ : ज्या योगाने आपला अभ्युदय होऊन आपल्याला निश्चितपणे मोक्षप्राप्ती होते, तो धर्म होय.
२. वेदोऽखिलो धर्ममूलम् ।
– मनुस्मृति, अध्याय २, श्लोक ६
अर्थ : वेद हे धर्माचे मूळ आहे.
३. धर्मस्य प्रभुरच्युतः ।
– विष्णुसहस्रनाम, श्लोक १३७
अर्थ : धर्माचे स्वामी भगवान श्रीविष्णु आहेत.
४. धर्मेण धार्यते लोकः ।
अर्थ : धर्म मानवाला धारण करतो.
५. धर्म एव हतो हन्ति धर्माे रक्षति रक्षितः ।
– मनुस्मृति, अध्याय ८, श्लोक १५
अर्थ : धर्माचे पालन न करणार्याचा विनाश होतो आणि जो धर्माचे काटेकोर पालन करतो, त्याचे रक्षण धर्म (म्हणजे ईश्वर) करतो.
६. द्विविधो हि वेदोक्तो धर्मः प्रवृत्तिलक्षणो निवृत्तिलक्षणश्च ।
अर्थ : वेदांनी धर्माचे प्रवृत्तिस्वरूप आणि निवृत्तिस्वरूप असे २ प्रकार सांगितले आहेत.
७. धर्मं जिज्ञासमानानां प्रमाणं परमं श्रुतिः ।
– मनुस्मृति, अध्याय २, श्लोक १३
अर्थ : धर्माची जिज्ञासा असणार्यांसाठी ‘वेद’ हेच सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे.
८. यतो धर्मस्ततो जयः ।
– महाभारत, उद्योगपर्व, अध्याय ३९, श्लोक ७
अर्थ : जेथे धर्म, तेथे जय ।
९. धर्मेणैव जगत्सुरक्षितमिदं धर्माे धराधारकः ।
धर्माद्वस्तु न किञ्चिदस्ति भुवने धर्माय तस्मै नमः ।।
– आर्य चाणक्य
अर्थ : हे जग धर्मामुळेच सुरक्षित आहे. धर्माला ‘पृथ्वीचा धारणकर्ता’ असे म्हटले आहे. या जगतात धर्माविना कोणतेच अन्य तत्त्व नाही, त्या धर्माला नमस्कार असो.
१०. यदा यदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ४, श्लोक ७
अर्थ : हे भारता (भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा र्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो.
११. सुखं तु न विना धर्मात् तस्मात् धर्मपरो भवेत् ।
– अष्टांगहृदय, सूत्रस्थान, अध्याय २, श्लोक २०
अर्थ : धर्माविना सुख संभवत नाही; म्हणून धर्मपरायण असावे.
१२. आहारनिद्राभयमैथुनं च सामान्यमेतत्पशुभिर्नराणाम् ।
धर्माे हि तेषामधिको विशेषो धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ।।
अर्थ : आहार, निद्रा, भय आणि मैथुन या गोष्टी पशू अन् मानव यांच्यात समान आहेत. (धर्म ही त्यांच्यातील अधिकची विशेष गोष्ट आहे.) धर्मविहीन (धर्माचरण न करणारी) माणसे ही पशूंसारखीच आहेत.
१३. अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृत्ता ।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १८, श्लोक ३२
अर्थ : जी (बुद्धी) तमोगुणाने व्याप्त असते, ती अधर्माला धर्म असे मानते.
(क्रमशः)
– भारताचार्य आणि धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)
लेखांक ३५. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/823971.html