‘वोकिझम’चा अंत हवा !

(वोकिझम म्हणजे जगभरात प्रस्थापित समाजव्यवस्था, संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था यांना छेद देणारी विकृती !)

पॅरिस येथील बॉक्सिंगच्या स्पर्धेत प्रतिस्पर्धी एंजेला कारिनी हिला काही सेकंदात हरवणार्‍या इमेन खेलीफ हिच्या लिंगपालटाविषयी संभ्रम होता. तिने लिंगपालट केला कि काय ? असे अनेकांना वाटत होते. प्रत्यक्षात इमान खेलीफ ही जन्मत:च स्त्री असल्याचे समोर आले. असे असले, तरी लिंगपालट या भयावह निसर्गविरोधी प्रकारावर या बॉक्सिंगच्या सामन्याच्या निमित्ताने पुन्हा ‘वोकिझम’ची चर्चा होऊ लागली आहे. त्या निमित्ताने हा लेखप्रपंच…!

१. ‘वोकिझम’ म्हणजे काय ?

सर्वसामान्य भाषेत ‘वोक’ या इंग्रजी शब्दाचा साधा अर्थ म्हणजे ‘जो झोपलेला नाही असा तो, म्हणजे जागा असलेला’, असा आहे. तरी याचे प्रत्यक्षातील सध्याचे वास्तव भयानक झाले आहे. त्याचा अर्थ ‘सामाजिकदृष्ट्या सध्याची जी व्यवस्था आहे अथवा जे मापदंड आहेत, त्याला विरोध करणे, सामाजिक संस्कृतीला विरोध करणे, त्या विरुद्ध बंड करणे, ती अमान्य करणे’ असा घेतला जात आहे. हा नवीन ‘फॅसिस्ट’वाद (हुकूमशाही) आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये; कारण सर्वसाधारण रूढ, परंपरागत गोष्टी, सामाजिक भान आणि विशेषत: धार्मिकतेच्या अनुषंगाने केलेल्या कृती यांना साम्यवादी चुकीचे ठरवतात. (आर्थिकदृष्ट्या) सामाजिक समता हा साम्यवादांचा एक आवडता शब्द, जी कधी अस्तित्वातच येऊ शकत नाही. संपत्तीचे समान वाटप, सर्वांचे समान अधिकार वगैरे वगैरे हे निसर्गाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे, ते साम्यवादी साध्य करण्याच्या प्रयत्न करतात. त्यासाठी इतिहासाचे विकृतीकरण करणे, लोकांच्या धार्मिक गोष्टींवर आक्षेप घेणे, त्यांचा बुद्धीभेद करणे, त्याने नाही जमले तर धमकावणे, लोकांच्या विशेषत: धनिक वर्ग, श्रीमंत वर्ग यांतील लोकांच्या हत्या करणे (यासाठी नक्षलवाद आहे) असे प्रकार केले जातात. एवढा सर्व आटापिटा करूनही, कोट्यवधी लोकांना मारूनही साम्यवादी त्यांचे अनैसर्गिक इप्सित साध्य करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी ‘वोकिझम’चा नवीन प्रकार शोधून काढला आहे. यापूर्वी समलिंगी संबंध, लिव्ह इन रिलेशनशीप (विवाह न करता पुरुष आणि स्त्री यांनी एकत्र रहाणे), मुक्त संभोग हे प्रकार, म्हणजे नवीन साम्यवादाचा भाग आहेत. त्यात ‘वोकिझम’ची भर पडली आहे.

श्री. यज्ञेश सावंत

२. पुरुष वा स्त्री बनण्याचा निर्णय व्यक्तीने स्वत: घेणे

‘वोकिझम’ हे अतिशय ओंगळवाणे आणि भयंकर स्वरूप आहे. एखाद्या पुरुषाला वाटले, ‘मी स्त्री आहे’, तर तो स्त्री बनू शकतो, म्हणजे केवळ स्त्रियांचे कपडे घालून नव्हे, तर लिंगपालट करून ! तसेच एखाद्या स्त्रीला वाटले, ‘ती पुरुष आहे’, तर ती तसे करू शकते. म्हणजे जे जन्मत:च निसर्गाने त्या व्यक्तीची स्त्री अथवा पुरुष म्हणून दिलेली ओळख पुसून टाकणे आणि त्या व्यक्तीने स्वत:ला स्त्री किंवा पुरुष म्हणून जगायचे हे ठरवणे. आपल्याला वाटू शकेल, सर्व ठिकाणीच नीती-नियम पाळणार्‍या, सामाजिक बांधिलकी, सामाजिक परिस्थितीचे भान असणार्‍या सर्वसामान्यांना हे एकदम विपरितच वाटेल; मात्र सर्वसामान्य मानवी बुद्धीला जे काही विपरित वाटते, तेच साम्यवादी बुद्धीभेद करून समाजाच्या माथी मारण्याचा, समाजात रूढ करण्याचा आणि समाजाच्या योग्य-अयोग्य काय याचा विचार करण्याच्या जाणिवा बोथट करून नष्ट करण्याचा प्रयत्न साम्यवादी करत आहेत.

३. इमेन खेलीफच्या विजयावर टीका

पॅरिसमध्ये चालू असलेल्या वर्ष २०२४ च्या ऑलिंपिक सामन्यांमध्ये महिलांच्या बॉक्सिंगच्या स्पर्धेत अल्जेरियन बॉक्सर इमेन खेलीफ हिने तिची प्रतिस्पर्धी एंजेला कारिनी हिचा जोरदार ठोसे लगावून ४६ सेकंदांत पराभव केला. दुसर्‍या स्पर्धेतही तिने अन्य एका महिला प्रतिस्पर्ध्याला हरवले. या वेळी एंजेला कारिनी हिने ‘पुरुषाचे गुणधर्म असणार्‍याला महिला खेळाडूंच्या सामन्यात खेळण्याची अनुमती देऊ नये’, अशी अपेक्षा व्यक्त केली. महिलांमध्ये ‘एक्स एक्स’गुणोत्तर,  तर पुरुषांमध्ये ‘एक्स वाय’ गुणोत्तर असतात. एका शारीरिक चाचणीत इमेनमध्ये पुरुषाचे गुणोत्तर आढळल्याचा दावा करत तिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत प्रवेश नाकारण्यात आला होता. येथे मात्र तिला अनुमती मिळाली आणि ती स्पर्धेत खेळून एंजेला हिला काही सेकंदांत हरवल्यानंतर ती पुरुष असल्याचे तिच्यावर आरोप होऊ लागले. त्यामुळे ‘वोकिझम’च्या दुष्परिणामांची चर्चा होऊ लागली. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या चाचणीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

४. सरन्यायाधिशांच्या विधानावर आक्षेप !

काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधान केले होते, ‘पूर्णत: जैविक पुरुष असे काही नाही आहे’. याविषयी जवाहरलाल नेहरू विद्यापिठाचे प्राध्यापक आणि विचारवंत आनंद रंगनाथन् यांनी सांगितले की, पूर्णत: जैविक पुरुष असे काही नाही, हे विधान चुकीचे आहे. पुरुषात वीर्य उत्पन्न होते, तर स्त्रीमध्ये बीज फलित होते. मूलभूत फरक आहे की, ‘सेक्स’(लिंग) व्यक्तीतील शारीरिक भेद दाखवतो, तर जेंडर (लिंग) व्यक्तीची सामाजिक वागणूक, सामाजिक नियम यांच्याशी संबंधित आहे, म्हणजेच स्त्री आणि पुरुष असे कुणी स्वत:ला समजणे, मानणे हे एका बाजूला, तर त्यांची दायित्वे, क्षमता ही निसर्गाने ठरवून दिलेली आहेत, ही वस्तूस्थिती आहे.

उद्या कुणी स्वत:ला हव्या त्या लिंगाचा (पुरुष किंवा स्त्री) मानू लागला, तरी सार्वजनिक प्रसाधनगृहांचा वापर, दोघांसाठी ठरवून दिलेल्या सुविधांचा वापरच करणे अपेक्षित आहे; अन्यथा समाजात किती मोठा गोंधळ होईल; मात्र वोकिझममध्ये हे सर्व स्वत:ला मुक्त जगण्याच्या गोंडस कल्पनेपायी साध्य केले जात आहे. यामुळे समाजातील सामाजिक वातावरण पुष्कळ खराब होणार आहे. कितीतरी भयावह प्रश्न यामुळे निर्माण होतील.

५. इलॉन मस्क यांचा अनुभव

‘स्पेस एक्स’ आणि ‘टेस्ला’ या जगप्रसिद्ध आस्थापनांचे मालक इलॉन मस्क यांनी त्यांचा अनुभव सांगतांना म्हटले की, ‘वोकीझम अतिशय भयंकर आहे.’ त्यांच्या एका मुलाचे याच वोकीझम चळवळीमुळे मुलीत रूपांत करण्यात आले आणि त्यामुळे त्यांचे मुल जणू ‘मृत’ झाले आहे, असे त्यांना वाटते. मुलाच्या लिंगपालट शस्त्रक्रियेच्या कागदपत्रांवर मस्क यांची स्वाक्षरी त्यांना बेसावध करून घेण्यात आली होती. ‘परिणामी मुलाचे भावविश्व उद्ध्वस्त झाले आहे’, असे मस्क यांनी सांगितले. परिणामी ते या चळवळीचे कट्टर विरोधक बनले आहेत.

६. सामाजिक दुष्परिणाम

लिंगपालटाची शस्त्रक्रिया करण्यासाठी पालकांना धमकावण्यात येते, मुलांना कायदेशीरदृष्टया संरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. ही शस्त्रक्रिया परत उलट करता येत नाही म्हणजे तो किंवा ती यांचा लिंगपालट हा आयुष्यभरासाठी असतो. ‘सर्वांत प्रथम अशी शस्त्रक्रिया पालकांनीच करण्यास पुढाकार घेतलेल्या, म्हणजचे मुलाचे मुलीत रूपांतर झालेल्या तरुणाचे पुढील जीवन नरकयातनामय होते’, असे त्यानेच सांगितले आणि त्याने कंटाळून आत्महत्या केली.

या लिंगपालट शस्त्रक्रियांमुळे पुढे पुढे विविध प्रकारचे रोग, आजार उत्पन्न होण्याची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. साम्यवादी तत्त्वज्ञान लोकांच्या गळी उतरवण्याचे सातत्याने नवीन मार्ग साम्यवादी निर्माण करत असले, तरी त्यातून समाजाला कोणताही लाभ न होता, उलट समाजात अराजकच निर्माण होते. कित्येकांची आयुष्य, काहींच्या पिढ्या साम्यवादी घातक तत्त्वज्ञानामुळे उद्ध्वस्त झाल्या. पाश्चात्त्य देशामध्ये मोठ्या प्रमाणात फोफावत असलेले हे थेर भारतातही पसरण्यास काही प्रमाणात प्रारंभ झाला आहे. यातील घटनांना प्रसारमाध्यमे चांगली प्रसिद्धी देतात. त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध करतात, त्यांचे आणि त्यांच्या पालकांचे कौतुक करतात. समाजाची या प्रकारे दिशाभूल करतात. महाराष्ट्रातील काही मुला-मुलींनी लिंगपालट शस्त्रक्रिया केल्यावर ‘आता या मुलांचे मन हलके झाले, ती आता त्यांना हवे तसे आयुष्य जगू शकतील !’, अशी बातमी दाखवण्यात आली. यामुळे ज्यांच्या मनात असे काही विचार नसतील, त्यांनाही ते विचार करायला लावतील.

७. स्त्रीमुक्तीवर घाला ?

वोकिझममुळे निर्माण होणारे सामाजिक प्रश्न, दुष्परिणाम हे नंतर हाताळणे कठीण होणार आहे. मुख्य म्हणजे ‘स्त्री-मुक्तीवादी’, स्त्रीवादी संघटना (फेमिनिस्ट) यांचे याविषयी काहीच म्हणणे नाही का ? पुरुष स्त्री बनला अथवा स्त्री पुरुष बनली, तर हा थेट ‘स्त्रीमुक्ती’वरच घाला असणार आहे. स्त्रीवादी आता गप्प का ? स्त्रियांचे महत्त्वच न्यून केले जाणार आहे. ऑलिंपिकच्या स्पर्धेत झाल्याप्रमाणे पुरुष स्त्रिया बनून अशा स्पर्धा, संधी साध्य करण्यासाठी उतरला, तर कुठल्याही जैविक आणि लैंगिक दृष्ट्या स्त्री असलेल्या व्यक्तीला कधीच स्पर्धा जिंकता येणार नाही, ना संधी साध्य करता येईल. स्त्रियांना मिळणारे लाभ पाहून पुरुष स्त्री बनेल आणि पुरुषत्वाचा लाभ घेण्यासाठी स्त्री पुरुष बनेल. निसर्गदत्त लिंगाचे महत्त्वच रहाणारच नाही. मानवजातीच्या मुळावर उठलेल्या ‘वोकिझम’सारख्या विकृतीचा अंत करण्यासाठी सर्वांनी ‘अवेक’ म्हणजे जागे होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या विकृतीचा अंत करण्यासाठी सज्ज होऊया !

श्री गुरुचरणार्पणमस्तु ।

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (६.८.२०२४)

संपादकीय भूमिका

मानवजातविरोधी असलेल्या ‘वोकिझम’ या विकृतीला रोखण्यासाठी केंद्र सरकारने भारतात जनजागृती करून कायदा करणे आवश्यक !