बांगलादेशमधील चिघळती परिस्थिती आणि आव्हाने
१. सहस्रो बांगलादेशी प्रवेश करण्याच्या प्रतीक्षेत : भारतासाठी एक आव्हान !
‘बांगलादेशात अराजक माजले आहे. त्यामुळे सहस्रो बांगलादेशी नागरिक भारतात येण्यासाठी भारत-बांगलादेश सीमेवर प्रतीक्षा करत आहेत. आज बांगलादेशात अवामी लीगचे नेते आणि त्यांचे पाठीराखे, तसेच हिंदु नागरिक यांच्यावर मोठ्या प्रमाणात आक्रमणे होत आहेत. बांगलादेशात ८ टक्के, म्हणजे दीड ते दोन कोटी हिंदू तेथे रहात आहेत. वर्ष १९७१ च्या भारत-बांगलादेश लढाईत पाकिस्तानी सैन्याने ४० लाख बांगलादेशींना मारले होते. यातील १० लाख अवामी लीगचे समर्थक, तर उर्वरित ३० लाख हे बांगलादेशातील हिंदू होते. तोच प्रयोग आताही केला जात आहे. तेथे भूमी अल्प असून लोकसंख्या अतिशय दाट आहे. त्यामुळे तेथील भूमी महाग आहे. तेथील धर्मांधांना हिंदूंच्या मालमत्ता आणि भूमी बळकवायच्या आहेत. त्यामुळे ते हिंदूंवर आक्रमणे करत आहेत, हे स्पष्ट आहे.
पारंपरिकपणे तेथील उग्रवादी आणि ‘जमात ए इस्लामी’ यांना स्वतंत्र बांगलादेश नको होता. ‘बांगलादेश हा पाकिस्तानचाच भाग रहावा आणि येथे इस्लामी ‘रॅडिकेलेशन’ (मूलगामीकरण) चालू रहावे’, असे त्यांना वाटत होते. ते शेख हसीना यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. या हिंसाचाराच्या वेळी जमात ए इस्लामीचे सहस्रो कैदी कारागृहातून सोडण्यात आले आहेत. त्यामुळे हिंसाचारात अधिक भर पडली आहे.
२. बांगलादेशमधील आंदोलनात कट्टरतावाद्यांचा शिरकाव
बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार चालू आहे. या घटनेचे अवलोकन करतांना काही प्रश्न आपल्यासमोर येतात. बांगलादेशमध्ये आरक्षणावरून जे आंदोलन चालू झाले होते, त्यात कट्टरतावादी घुसले आहेत का ?, याचे उत्तर ‘हो’ असे आहे. या आंदोलनामध्ये निश्चितपणे जमात ए इस्लामीचे कार्यकर्ते आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे लोक यांनी शिरकाव केला आहे, तसेच त्यांच्या सहस्रो कैद्यांना सोडण्यात आलेले आहे. तेही यात घुसलेले आहेत. त्यांच्याकडून हिंसाचार आणि अराजकता वाढवण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहे.
३. हिंसाचार थांबवण्यात बांगलादेशातील सुरक्षादले असमर्थ !
देशांतर्गत हिंसाचार थांबवण्याचे दायित्व असलेले बांगलादेशाची सुरक्षादले निष्क्रिय ठरली आहेत. पोलीस जनतेचे रक्षण करण्याऐवजी त्यांचे रक्षण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. अर्धसैनिक दले हे केवळ भारत-बांगलादेश सीमेवर आहेत. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे बांगलादेशचे सैन्य हे काहीही करण्यास सिद्ध नाही. ते का घाबरत आहेत, हे कळू शकलेले नाही. जे सैन्य त्यांच्या पंतप्रधानांचे रक्षण करू शकले नाही, त्यांच्या निवासस्थानाचे रक्षण करू शकले नाही, त्यांच्या संसदेचे रक्षण करू शकले नाही, ते जनतेचे रक्षण कसे करतील ? अराजक तत्त्व सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ करत आहेत, तसेच हिंदूंना मारत आहेत. यात अवामी लीग पक्षाचे समर्थकही मोठ्या प्रमाणात मारले जात आहेत. अशा वेळी त्यांचे सैन्य केवळ हातावर हात ठेवून बसले आहे.’
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.
भारत बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करण्यासाठीचा एक उपाय !‘बांगलादेशातील हिंदूंची घरे जाळून आक्रमणकर्ते भारताला निश्चितपणे चिथावणी देत आहेत. वर्ष १९४७ मध्ये बांगलादेशात २४ टक्के हिंदू होते. सध्या त्यांची संख्या न्यून होऊन आता ती केवळ ८ टक्के राहिली आहे. त्यामुळे अन्य १६ टक्के हिंदूंचे धर्मांतर करण्यात आले, काहींना मारण्यात आले आणि काही पलायन करून भारतात आश्रयाला आले आहेत. आता शिल्लक राहिलेल्या दीड कोटी हिंदूंच्या विरोधातही तीच कारवाई केली जात आहे. त्यामुळे भारतासाठी ही निश्चितच चेतावणी आहे, असे म्हटले पाहिजे. भारत बांगलादेशात जाऊन हिंदूंचे रक्षण करू शकतो का ?, तर त्याचे उत्तर ‘नाही’, असे आहे. भारत बांगलादेशातील सैन्यावर केवळ दबाव टाकू शकतो; पण जे सैन्य त्यांचे पंतप्रधान आणि अवामी लीगचे नेते यांना वाचवू शकले नाही, ते हिंदूंना कसे वाचवतील ?, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे भारताने हिंदूंच्या रक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण केला पाहिजे. यासमवेतच जे हिंदू भारतात येण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आश्रय दिला पाहिजे. अन्यथा ते सर्व मारले जातील आणि त्यांच्या महिलांवर अत्याचार होतील, तसेच त्यांच्या भूमीही कह्यात घेण्यात येतील.’ – ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. |