पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांची अभंगवाणी !
पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज हे वाळवे बद्रुक (जिल्हा कोल्हापूर) येथील आहेत. वर्ष १९८२ मध्ये त्यांनी काडसिद्धेश्वर महाराज यांच्याकडून गुरुमंत्र घेतला, तसेच पंढरपूर येथील नामदेव टेंभूकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ते सांप्रदायिक अनुयायी बनले. त्यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. या अभंगांचे वैशिष्ट्य, म्हणजे हे अभंग सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत. त्यातील काही अभंग येथे प्रसिद्ध करत आहोत.
माझ्या मन मंदिरात । अवतरले विश्वनाथ ।। १ ।।
तेथे जडला माझा भाव । तोचि करतो माझे सर्व ।। २ ।।
अखंड नाम साधनेन । करितो त्याचे पूजन ।। ३ ।।
देव नाही वेगळा कोण । जिवाठाई जे चैतन्य ।। ४ ।।
योगक्षेम ज्याचे हाती । त्याची प्राप्ती म्हणजे मुक्ती ।। ५ ।।
– ह.भ.प. धोंडिबा रक्ताडे (महाराज), वाळवे-बद्रुक, जिल्हा कोल्हापूर. (साभार : ग्रंथ ‘धोंडिबाची अभंगवाणी’, खंड – १)