Indu Makkal Katchi Andolan : बांगलादेशातच एका नव्‍या ‘हिंदु बंगाल’ची निर्मिती करून तेथे हिंदूंना वसवा ! – ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’, तमिळनाडू

तमिळनाडूतील ‘हिंदु मक्‍कल कत्‍छी’ची (हिंदु जनता पक्षाची) मागणी !

कोइम्‍बतूर (तमिळनाडू) – बांगलादेश, तसेच अमेरिका यांनंतर आता भारतातही बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या विरोधात आंदोलने होत आहेत. १० ऑगस्‍टच्‍या सायंकाळी येथील गांधी पार्क येथे या निमित्त आंदोलन करण्‍यात आले. आंदोलनाचे आयोजन हिंदु मक्‍कल कत्‍छी (हिंदु जनता पक्ष) या हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेने केले होते. या वेळी संघटनेचे संस्‍थापक अध्‍यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी उपस्‍थितांना संबोधित करतांना म्‍हटले की, भारत सरकार, संयुक्‍त राष्‍ट्रे आणि आंतरराष्‍ट्रीय मानवाधिकार संघटना यांनी बांगलादेशातील अल्‍पसंख्‍य हिंदूंच्‍या दुर्दशेच्‍या विरोधात आवाज उठवला पाहिजे. बांगलादेशातच एका नव्‍या ‘हिंदु बंगाल’ची निर्मिती करून हिंदूंना तेथे वसवण्‍याची व्‍यवस्‍था झाली पाहिजे. तेथे हिंदूंच्‍या सुरक्षिततेची हमी दिली गेली पाहिजे.

संपथ यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे !

१. बांगलादेशात अत्‍याचार सहन केलेल्‍या आणि भारतात शरणार्थी म्‍हणून जगणार्‍या हिंदूंना नागरिकत्‍व सुधारणा कायद्याच्‍या अंतर्गत त्‍वरित नागरिकत्‍व दिले जावे.

२. संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या शांती सैन्‍याला बांगलादेशातील दंगली रोखण्‍यासाठी पाठवण्‍यात यावे.

३. बांगलादेश हा पाकिस्‍तानसारखाच मुसलमान मूलतत्त्ववादी देश आहे; परंतु भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. हिंदूंसाठी कोणतेच राष्‍ट्र नाही. त्‍यामुळे हिंदूंच्‍या रक्षणाचे दायित्‍व हे भारताचे आहे.

४. इंडी आघाडी, द्रमुक आणि काँग्रेस हे पॅलेस्‍टिनी मुसलमानांसाठी निदर्शने करतात; परंतु बांगलादेशी हिंदूंसाठी काहीच करत नाहीत ! मणीपूर येथील महिलांना न्‍याय मिळावा, यासाठी आवाज उठवणार्‍या तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाने बांगलादेशातील स्‍थितीवरून किमान शाब्‍द़िक निषेधही केलेला नाही.

५. भारतातील मुसलमान संघटनांनीही बांगलादेशातील हिंदूंच्‍या विरोधात चालू असलेल्‍या हिंसाचाराविषयी निषेधाचा एक शब्‍दही उच्‍चारला नाही. भारतातील हिंदूंनी हे लक्षात घेतले पाहिजे.

संपादकीय भूमिका

भारत सरकारनेच या न्‍याय्‍य मागणीसाठी आता बांगलादेशावर दबाव बनवायला हवा. यासाठी अन्‍य देशांनीही या मागणीचे समर्थन करण्‍यासाठीही परराष्‍ट्र मंत्रालयाने आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !