Sheikh Hasina Accuses US : माझे सरकार उलथवण्‍यामागे अमेरिका ! – शेख हसीना यांचा आरोप

बांगलादेशाचे एक बेट न दिल्‍याने अमेरिकेने रचले षड्‍यंत्र !

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना

नवी देहली – शेख हसीना यांनी त्‍यांचे सरकार उलथवण्‍यामागे अमेरिका असल्‍याचा आरोप केला आहे. शेख हसीना यांच्‍या जवळच्‍या लोकांनी एका इंग्रजी दैनिकाला पाठवलेल्‍या संदेशातून हा आरोप करण्‍यात आला आहे. बांगलादेशाकडून सेंट मार्टिन बेट घेऊन तिथे नौदल आणि सैन्‍य यांचा तळ उभारण्‍याची अमेरिकेची योजना होती. हा तळ उभारून अमेरिकेला बंगालच्‍या उपसागरात स्‍वतःचा प्रभाव निर्माण करणे शक्‍य होणार होते; मात्र शेख हसीना यांनी अमेरिकेला हे बेट देण्‍यास नकार दिला होता. या संदर्भात काही मासांपूर्वी शेख हसीना यांनी ‘एक गोरा माझ्‍याकडे आला होता’ असे विधान केले होते. त्‍यामुळे तो गोरा म्‍हणजे अमेरिका होती, हे उघड झाले आहे.

कट्टरतावाद्यांच्‍या राजकारणाला बळी पडू नका ! – शेख हसीना यांचे नागरिकांना आवाहन

शेख हसीना यांनी बांगलादेशाच्‍या नागरिकांना आवाहन करतांना म्‍हटले आहे की, मला माझ्‍या देशात मृतदेहांचा खच पाहायचा नव्‍हता; म्‍हणून मी त्‍यागपत्र दिले. काही लोकांना विद्यार्थ्‍यांच्‍या मृतदेहांवर पाय ठेवून सत्तेत यायचे होते; परंतु मी तसे होऊ दिले नाही. मी पंतप्रधानपदाचे त्‍यागपत्र दिले. अमेरिका सेंट मार्टिन बेट मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहे. मी त्‍या बेटाचे सार्वभौमत्‍व सोडले असते, तर अमेरिका अगदी सहजपणे बंगालच्‍या उपसागरात तिचे वर्चस्‍व निर्माण करू शकली असती; परंतु मी तसे होऊ दिले नाही. मी देशातील जनतेला विनंती करते की, काही कट्टरतावादी तुमची दिशाभूल करू पहात आहेत. तुम्‍ही त्‍यांच्‍या राजकारणाला बळी पडू नका.

संपादकीय भूमिका

बांगलादेशाचे सरकार उलथवल्‍यामुळे भारताला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्‍यामुळे अमेरिका भारतासाठीही शत्रूराष्‍ट्रच झाली आहे. अशा अमेरिकेसमवेत भारताने जशास तसे वागण्‍याची आवश्‍यकता आहे !