उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतांना मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अटकेचा आदेश दिला !
मुंबई – महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना अटक करण्याचे निर्देश दिले होते. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी तसा आदेश दिला होता, असा आणखी एक खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी ‘ए.एन्.आय्.’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे होते.
या मुलाखतीमध्ये परमवीर सिंह यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीचे सरकार असतांना मला आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही अटक करण्यासाठी अनिल देशमुख यांनी दबाव आणला होता. याविषयी शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ आणि उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी बैठका झाल्या होत्या. शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला शरद पवार, अनिल देशमुख, अनिल गोटे आणि पी.पी. चव्हाण उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी माझ्यावर विरोधकांवर खोटी कारवाई करण्यासाठी दबाव आणला; मात्र मी त्यांना नकार दिला.
उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत अनिल देशमुख होते. त्या वेळी ‘या प्रकरणाचा खटला बंद करण्यात आला असल्यामुळे कारवाई करता येणार नाही’, असे मी त्यांना सांगितले.