‘सीआयडी’ अन्वेषणाची प्रत न मिळाल्यामुळे दोषींविरुद्ध गुन्हे नोंद करण्यास विलंब ! – डॉ. सचिन ओंबासे, जिल्हाधिकारी धाराशिव
श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचार्यांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई न केल्याचे प्रकरण !
धाराशिव – श्री तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी घोटाळा प्रकरणी सीआयडी (गुन्हे अन्वेषण विभाग) अन्वेषणाची प्रत न मिळाल्यामुळे दोषींविरुद्ध गुन्हे नोंद करण्यास विलंब झाला, अशी माहिती उच्च न्यायालयाने दिलेल्या नोटीसनंतर धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली. जिल्हा प्रशासनाकडून गुन्हे नोंद करण्यास विलंब झाल्याविषयी प्रसारमाध्यमांनी जिल्हाधिकार्यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना ते बोलत होते. (प्रकरण इतके गंभीर असूनही प्रशासनाकडून दोषींवर कारवाई करण्यास दिरंगाई का केला जात आहे ? – संपादक)
डॉ. सचिन ओंबासे यांनी पुन्हा गृह विभागाकडे अहवालाची प्रत मिळण्याची मागणी केली आहे, तर ‘दोषींवर गुन्हे नोंद होईपर्यंत पाठपुरावा चालूच रहाणार’, अशी भूमिका हिंदु जनजागृती समितीने घेतली आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात भ्रष्टाचार करणार्यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गुन्हे नोंद केले नाहीत; म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने जिल्हा प्रशासनाला नोटीस बजावली आहे.