सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेत घालून दिलेल्या अद्वितीय कार्यपद्धती आणि त्यांचा साधकांना होणारा लाभ !
मागील भागात परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांची शीघ्रतेने आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा उत्सव अनेक ठिकाणी आयोजित करणे, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके चालू करून साधकांना साधनेसाठी सतत मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, ‘स्वभावदोष आणि अहं’ यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करायला शिकवणे’, हा भाग वाचला. आता त्याच्या पुढचा भाग पहाणार आहोत.
(भाग ३)
या लेखाचा भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा. https://sanatanprabhat.org/marathi/821101.html
१८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना मार्गदर्शन करणे
१८ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले येणार आहेत’, असे केवळ कळल्यावर साधकांमध्ये पुष्कळ उत्साह संचारणे : वर्ष १९९८ ते वर्ष २००३ पर्यंत प.पू. डॉक्टरांचे ठाणे जिल्ह्यात क्रियाशील आणि सर्व साधक यांच्यासाठी वेगवेगळे मार्गदर्शन असायचे. साधक या सत्संगाची चातकासारखी वाट पहायचे. ती जणू एक पर्वणीच असायची. ‘प.पू. डॉक्टर येणार आहेत’, असे कळल्यापासूनच सर्व साधकांमध्ये एक अपूर्व उत्साह संचारायचा.
१८ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनातील विविध सूत्रे : प.पू. डॉक्टर साधकांना त्यांच्या स्थितीनुसार पुढच्या टप्प्याचे मार्गदर्शन करायचे. साधकांच्या शंकांचे निरसन करतांना ते ‘साधकाला साधनेत पुढे जाण्यास साहाय्य होईल’, अशा पद्धतीने करायचे. त्यांच्या मार्गदर्शनात ते ‘भारतभर सनातन संस्थेचा प्रचार कसा मोठ्या प्रमाणात चालू आहे ?’, ‘ठिकठिकाणी साधक साधनेच्या दृष्टीने कसे चांगले प्रयत्न करत आहेत ?’, हे उदाहरणे देऊन सांगायचे. ‘साधकांकडून कशा प्रकारे चुका होत आहेत ?’, आणि ‘त्या टाळण्यासाठी काय करायला हवे ?’, याविषयीही ते मार्गदर्शन करायचे. ‘पुढे सनातन संस्थेचे ध्येय काय असणार आहे ?’, आणि ‘ते साध्य करण्यासाठी साधनेच्या स्तरावर कसे प्रयत्न करायला हवेत ?’, अशा अनेक विषयांवर ते साधकांना मार्गदर्शन करायचे.
१८ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनातील काही महत्त्वाची सूत्रे !
१. ईश्वराला प्रांजळपणा हा गुण पुष्कळ आवडतो. त्यामुळे साधकांनी तो गुण त्यांच्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा.
२. साधकांमध्ये ‘धृतराष्ट्र-गांधारी’ वृत्ती नको. ‘जे समष्टीला हानीकारक आहे’, ते लगेच पुढे कळवायला हवे.
३. ‘दिसेल ते कर्तव्य’ या भावाने वागावे.
४. ईश्वरप्राप्तीसाठी हळूहळू सर्वस्वाचा त्याग करायचा प्रयत्न करायला हवा.
५. आपल्या मनात मोठ्या भावाविषयी आदर आणि जवळीक असते, तोच भाव आपल्याला मार्गदर्शन करायला येणार्या साधकांविषयी असावा. त्यांना विशेष वागणूक दिल्यास आपल्यात आणि त्यांच्यात जवळीक निर्माण होणार नाही. त्यामुळे मार्गदर्शकांचा अहं वाढून त्यांची साधनेत हानीही होऊ शकते.
१८ ई. अनिष्ट शक्तींविषयी साधकांना सांगून त्यांच्यामुळे होणार्या त्रासांवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायला शिकवणे : प.पू. डॉक्टर साधकांना ‘अनिष्ट शक्तींचे त्रास कसे असतात ?’, ‘अनिष्ट शक्ती मानवाला त्रास का देतात ?’, ‘त्या साधकांच्या साधनेत बाधा का आणतात ?’ इत्यादी अनेक विषयांवर सखोल माहिती देऊन त्यावरील आध्यात्मिक स्तरावरील उपायही सांगत असत, उदा. मीठ-पाण्याचे (टीप) उपाय करणे, शरिरातील विविध चक्रांवर विभूती लावणे, प्रार्थना करणे, भोवती रिकामी खोकी लावून नामजप करणे, विविध देवतांचा नामजप करणे,
प.पू. भक्तराज महाराज यांच्या आवाजातील भजने ऐकणे इत्यादी. त्यामुळे साधकांना अनिष्ट शक्तींची भीती न वाटता गुरुकृपा आणि देवतांचे आशीर्वाद यांच्या साहाय्याने होणार्या त्रासांवर मात करता येऊ लागली. काळानुसार प.पू. डॉक्टर साधकांना अनिष्ट शक्तींच्या त्रासावर सूक्ष्मातून लढायला शिकवून (विविध आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायला शिकवून) त्यांना त्यावर मात करायला शिकवत आहेत.
(टीप – एका टबात पावले पाण्यात भिजतील एवढे पाणी घेऊन त्यात चमचाभर खडेमीठ घालणे आणि त्यात १०-१५ मिनिटे पावले बुडवून बसून देवतेचा नामजप करणे, नंतर ते पाणी टाकून देणे)
१९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनामुळे साधकांना झालेले लाभ !
१९ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांचे जन्मोजन्मीचे त्रास दूर केल्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती होणे : कलियुगात मानव साधना करत नसल्यामुळे प्रत्येकाच्या जीवनात अदृश्य अनिष्ट शक्ती बरेच अडथळे आणतात. समाजात ‘अनिष्ट शक्ती म्हणजे काय ?’, ‘त्यापासून होणारे त्रास कुठले ?’, यांविषयी बरेच अज्ञान आहे; परंतु प.पू. डॉक्टरांनी आरंभापासूनच साधकांना सूक्ष्म जगताची ओळख करून दिली आणि ‘त्या त्रासांपासून स्वतःचे रक्षण कसे करावे ?’, याविषयी अमूल्य ज्ञान दिले. त्यामुळे साधकांचे जन्मोजन्मीचे त्रास दूर होऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती होत आहे.
१९ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाचा साधकांना स्थूल आणि सूक्ष्म स्तरांवर लाभ होणे : प.पू. डॉक्टरांच्या उच्चतम आध्यात्मिक स्तरावरील मार्गदर्शनाचा साधकांना अनेक पटींनी शब्दातीत लाभ होत असे. स्थुलातून सर्वांना बरेच काही शिकायला मिळायचेच; पण सूक्ष्मातूनही बराच लाभ होत असे, उदा. ‘प.पू. डॉक्टर येऊन गेल्यावर आध्यात्मिक त्रास उणावणे, उत्साह पुष्कळ प्रमाणात वाढणे, साधना आणि सेवा करण्याची तळमळ वाढणे, त्यांच्या सत्संगात येणार्या विविध अनुभूतींमुळे त्यांच्यावरील श्रद्धा वाढणे’, असे अनेक लाभ व्हायचे.’
२०. प्रचारातील किंवा आश्रमातील साधकांचे मार्गदर्शन ठेवणे
अ. अन्य जिल्ह्यातून किंवा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील साधक जेव्हा त्यांच्या जिल्ह्यामध्ये जायचे, तेव्हा त्या साधकांचे जिल्ह्यातील साधकांसाठी मार्गदर्शन ठेवले जायचे.
१. ‘सूक्ष्मातील ज्ञान कसे मिळते ?’, याविषयी सौ. अंजली गाडगीळ (आताच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) यांचे मार्गदर्शन ठेवले होते.
२. कु. अनुराधा वाडेकर (आताच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर) या जेव्हा त्यांच्या ठाणे येथील घरी जायच्या, तेव्हा ठाण्यातील साधकांसाठी त्यांचे मार्गदर्शन ठेवायला सांगायचे. या मार्गदर्शनात त्या ‘अनिष्ट शक्तींचे त्रास कसे असतात ?’, ‘त्यावर मात कशी करायची ?’, याविषयीची अभ्यासपूर्ण सूत्रे सांगायच्या.
३. सौ. संगीता जाधव (आताच्या पू. (सौ.) संगीता जाधव) या सोलापूर येथे वैयक्तिक संपर्क चांगला करायच्या; म्हणून ठाणे आणि मुंबई जिल्ह्यांतील साधकांसाठी त्यांचे ‘वैयक्तिक संपर्क कसा करावा ?’, या विषयावर अभ्यासवर्ग अन् मार्गदर्शन ठेवले होते.
४. प.पू. कालीदास देशपांडे (आताचे परात्पर गुरु कालीदास देशपांडे) यांचेही वर्षातून १ – २ वेळा मार्गदर्शन ठेवले जात असे. तेव्हा ते सनातनचे प्रचारातील एकटेच संत होते. त्यांच्या दौर्यामुळे ‘संत कसे असतात ? त्यांच्या सान्निध्यात अनुभूती कशा येतात ? संत सहवासात नामजप चांगला कसा होतो ? त्यांच्या अस्तित्वाने आनंद कसा मिळतो ?’ हे सर्व आम्हाला अनुभवता आले.
५. वर्ष २००४ – २००५ मध्ये परात्पर गुरु पांडे महाराज ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे रहात होते. तेव्हा त्यांचे मार्गदर्शन ठाणे जिल्ह्यातील सर्व साधकांसाठी ठेवले होते. त्या मार्गदर्शनातूनही साधकांना अनेक गोष्टी शिकता आल्या.
६. प्रचारसेवा करणारे श्री. आठलेकरकाका, डॉ. दुर्गेश सामंत, श्री. विनय पानवळकर, वैद्या (सुश्री) माया पाटील इत्यादी साधकांचेही वेळोवेळी मार्गदर्शन ठेवले जात असे.
२१. साधकांमध्ये भावजागृती होण्यासाठी केलेले प्रयत्न !
अ. वर्ष २००२ मध्ये प.पू. डॉक्टरांना सुचवल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये भावसत्संग चालू केले. या सत्संगात ‘भाव म्हणजे काय ? आणि तो कसा वृद्धिंगत करावा ?’, याविषयीची सूत्रे सांगितली जात असत. भावाच्या स्तरावर प्रयत्न करणार्या साधकांना आलेल्या अनुभूती सत्संगात सांगितल्या जात असत.
आ. ‘भावजागृती’ याविषयी साधकांना मार्गदर्शन मिळावे’, यासाठी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमधून भावजागृती या विषयावर लेखमाला छापायला आरंभ केला.
इ. ‘भावजागृतीसाठी साधना’ या विषयावर प.पू. डॉक्टरांनी एक ग्रंथही प्रकाशित केला. या ग्रंथात ‘भाव’ म्हणजे काय ? भावाचे घटक कोणते ? भाव निर्माण होण्यातील अडथळे कुठले ? व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या दृष्टीने भावाचे महत्त्व काय आहे ? भाव वाढवण्यासाठी काय करावे ? इत्यादी पुष्कळ चांगली माहिती दिली आहे.
२२. श्री दुर्गादेवीचे सनातनच्या आश्रमांत सूक्ष्मातून आगमन होणे
वर्ष २००२ – २००३ मध्ये प.पू. डॉक्टरांच्या भक्तीमुळे विविध आश्रम आणि साधकांची घरे येथे सूक्ष्मातून श्री दुर्गादेवीचे आगमन होत असे. दुर्गादेवीच्या आगमनासाठी चांगल्या प्रकारे वातावरण निर्मिती केली जायची. देवीच्या आगमनाच्या काही दिवस आधीपासून साधकांना प्रार्थना, नामजप आणि अन्य भावजागृतीचे प्रयत्न वाढवायला सांगितले जायचे. दुर्गादेवीच्या प्रत्यक्ष आगमनापूर्वी भाव असलेले साधक सर्वांकडून भावार्चना करून घ्यायचे. त्यामुळे साधकांचा भाव जागृत होऊन बर्याच जणांना दुर्गादेवीच्या सूक्ष्मातील आगमनाची जाणीव व्हायची. सूक्ष्म गंध येणे, भाव दाटून येणे इत्यादी अनुभूतीही यायच्या.
२२ अ. सामूहिक नामजपाचे नियोजन करणे : देवतांप्रतीचा भाव वाढण्यासाठी अधूनमधून दिवसभरात ५ ते ८ घंट्यांचे सामूहिक नामजपाचे नियोजन केले जायचे. हा नामजप वैखरीतून केला जायचा. मध्यवर्ती रहाणार्या एखाद्या साधकाच्या घरी साधक एकत्र येऊन हा नामजप करायचे. नोकरी करणारे साधक त्या दिवशी सुटी घेऊन सामूहिक नामजपाचा आनंद घ्यायचे.’
सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण !
या लेखाचा भाग ४ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/825571.html
इदं न मम । (हे लिखाण माझे नाही !) (१७.४.२०२४)
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
|