Protest Outside UN HQ : बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारावरून संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर हिंदूंची निदर्शने !
हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘हिंदू अॅक्शन’ने घेतला पुढाकार !
वॉशिंग्टन (अमेरिका) – बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात जगातील विविध ठिकाणी आंदोलने होऊ लागली आहेत. बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणाप्रीत्यर्थ ‘हिंदु अॅक्शन’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने ९ ऑगस्टला संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. यासह न्यूयॉर्कमध्येही अनेक ठिकाणी अशाच प्रकारची निदर्शने करण्यात आली.
अमेरिकेचे रिपब्लिकन पक्षाचे खासदार पॅट फॅलन यांनीही या विषयावर चिंता व्यक्त केली आणि बांगलादेशातील अल्पसंख्यांकांना लक्ष्य करण्याच्या घटनांचा निषेध केला. या वेळी त्यांनी सामाजिक माध्यमांवर पोस्ट करत लिहिले की, ‘मी बांगलादेशमध्ये चालू असलेला राजकीय हिंसाचार आणि धार्मिक छळ यांचा तीव्र शब्दांत निषेध करतो. मी अंतरिम सरकारला बांगलादेशी लोकांच्या समान हितासाठी कार्य करण्याची आणि हा हिंसाचार त्वरित संपवण्याची विनंती करतो.
पॅरिसमध्ये सोमवार, १२ ऑगस्टला होणार आंदोलन !
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे १२ ऑगस्टच्या दुपारी ३ वाजता आंदोलन होणार आहे. यासाठी पॅरिसमधील सर्व हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन आयोजक संघटनांनी केले आहे. हे आंदोलन येथील प्रसिद्ध ‘प्लेस डे ला रिपब्लिक’ (रिपब्लिक स्क्वेअर) येथे होणार आहे, असे बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठांनी ‘सनातन प्रभात’ला कळवले.
संपादकीय भूमिकासंयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर अशी निदर्शने हिंदू करतात, ही अभिनंदनीय गोष्ट आहे. जगभरातील हिंदूंनी मोठ्या प्रमाणात परिणामकारक संघटन केल्यास जगातील हिंदूंद्वेष्ट्यांवर वचक निर्माण होईल, हेही तितकेच खरे ! |