झाडांच्या फांद्या छाटण्याऐवजी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचार्यांनी दादर (मुंबई) येथे झाडेच अर्ध्यावर कापली !
मुंबई, ९ ऑगस्ट (वार्ता.) – पावसाळ्याच्या कालावधीत वादळामुळे झाड्यांच्या फांद्या तुटून दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून पावसाळ्याच्या पूर्वी झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्यात येतात. दादर (पूर्व) येथील नायगावमधील बंगाली स्कूलच्या समोरील काही झाडे अर्ध्यावर कापण्यात आली आहेत. २ दिवसापूर्वीच मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनुमतीविना झाड तोडल्यास ५० सहस्र रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असतांना झाडे पुन्हा जगणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची छाटणी करणार्यांवर सरकार काय कारवाई करणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
छाटणी करतांना झाडांच्या फांद्या कापण्यात येतात. फांद्या कापतांनाही ते झाड जीवंत राहित, तसेच पुन्हा बहरेल अशा पद्धतीने वृक्षांची छाटणी करावयाची असते; मात्र नायगाव येथे तोडण्यात आलेली झाडे अत्यंत चुकीच्या पद्धतीने कापण्यात आली आहेत. ही जुनी झाडे अर्ध्यावर कापण्यात आली आहेत. त्यामुळे ती पुन्हा उंच वाढण्याची शक्यता अल्प आहे, तसेच ही झाडे पुन्हा बहरायला काही वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यामुळे काही झाडे मरण्याचीही शक्यता आहे. झाडाची छाटणी करतांना नियमानुसार झाडाचा किमान शेंडातरी ठेवला जातो; मात्र नायगाव येथील काही झाड्यांच्या सर्वच फांद्या छाटण्यात आल्या आहेत.
याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी मुंडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार झाडांची छाटणी केली जाते. मुंबईतील झाडांची छाटणी यापूर्वीच पूर्ण झाली आहे, असे सांगितले. असे असतांना भर पावसाळ्याच्या कालावधीत ही झाडे नियमबाह्यपणे छाटण्यात आल्याचे दिसून येत आहे.