साडेसात कोटी रुपयांची हानीभरपाई मिळण्यासाठी महापालिका दावा करणार !

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी समितीची स्थापना !

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर झालेली अवस्था

कोल्हापूर – संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी तातडीने समिती स्थापन केली आहे. यात अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य अग्नीशमन अधिकारी मनीष रणभिसे यांची नियुक्ती केली आहे. खासबाग मैदानाच्या मागील बाजूस ही आग लागल्याचे प्रत्यक्ष दर्शीने सांगितले आहे. त्यामुळे आग नेमकी कशामुळे लागली ? याची चौकशी तातडीने या समितीच्या वतीने करण्यात येणार आहे.

या आगीच्या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेने केशवराव भोसले नाट्यगृहाचा विमा उतरवला असून साधारणत: साडेसात कोटी रुपयांची हानीभरपाई मिळण्यासाठी दावा केला जाणार आहे, असे सांगितले.

दुर्घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी ! – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा

मुंबई – केशवराव भोसले या ऐतिहासिक वास्तूला भयंकर आग लागून ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूची हानी झाली. कोल्हापूरकरांचा हा सांस्कृतिक वारसा आहे, हा वारसा असा राख होतांना बघणे, हे भावनेला धक्का लागणारे आहे. या आगीत नाट्यगृहातील मौल्यवान गोष्टींची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

कोल्हापूरचे प्राचीन वैभव असलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी !

कोल्हापूर, ९ ऑगस्ट (वार्ता.) – कोल्हापूरचे प्राचीन वैभव असलेले ‘संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह’ ८ ऑगस्टला रात्री १० वाजता आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत नाट्यगृहाची इमारत जळून गेली आहे आणि केवळ दगडी बांधकाम शिल्लक राहिले आहे. अग्नीशमनदलाच्या विविध पथकांनी अथक परीश्रम घेऊन आग विझवली. कोल्हापूर शहराचा सांस्कृतिक वारसा भस्मसात झाल्याने अनेक कलाकार, अभिनेते, नाट्यप्रेमी यांनी हळहळ व्यक्त केली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

केशवराव भोसले नाट्यगृहात ९ ऑगस्टला जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी जय्यत सिद्धता करण्यात आली होती; मात्र आदल्या दिवशीच ही दुर्घटना घडली. घटना घडल्याचे कळल्यावर राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांनी रात्रीच भेट देऊन याच्या पुनर्उभारणीसाठी १० कोटी रुपयांचे साहाय्य देण्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ ऑगस्टला या संदर्भातील संपूर्ण माहिती घेऊन ‘जुने बांधकाम’ कायम ठेवून नाट्यगृहाची उभारणी केली जाईल. महापालिकेने ८ दिवसांत त्या संदर्भातील अहवाल सादर करावा, अशा सूचना केल्या. राज्य सरकारच्या नियोजन विभागाच्या सचिवांनी महापालिकेच्या प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्याकडून दूरभाषद्वारे याची सविस्तर माहिती घेतली.