संतांनी सांगितल्यावर नामजप लिहून आणि मोठ्याने करणारे नांदेड येथील कै. सुदर्शनराव गोजे (वय ७४ वर्षे) !
१८.५.२०२४ या दिवशी सुदर्शनराव गोजे (वय ७४ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांची पत्नी श्रीमती शालिनी गोजे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. अनासक्त
‘माझे यजमान कै. सुदर्शनराव गोजे यांना कशाचीच आसक्ती नव्हती. ते ‘त्यांच्या निवृत्तीवेतनाचे पैसे, कपडे, वस्तू किंवा आवडीचे पदार्थ’, असे काहीच मागत नसत. त्यांना आम्ही जे देत होतो, त्यात ते आनंदात रहात असत.
२. संतांनी सांगितल्याप्रमाणे सतत मोठ्याने नामजप करणे
२ अ. वहीत लिहून नामजप करणे : वर्ष २०१७ मध्ये आमची गुरुदेवांशी भेट झाली होती. तेव्हा गुरुदेवांनी यजमानांना ‘मोठ्याने नामजप करा’, असे सांगितले होते; पण यजमानांनी लिहून नामजप केला. त्यांनी लिहिलेल्या नामजपाच्या बर्याच वह्या आहेत.
२ आ. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी सांगितलेले नामजपाचे उपाय करणे : मागील एका वर्षापासून यजमानांना लघवीचा त्रास होत होता. त्यांच्या पौरुषग्रंथी (प्रोस्टेट) वाढल्या होत्या. त्यासाठी सद्गुरु जाधवकाकांनी त्यांना नामजपाचे उपाय सांगितले होते. सद्गुरु जाधवकाकांनी सांगितल्याप्रमाणे यजमान नामजपाचे उपाय करत होते. सद्गुरु जाधवकाकांनी त्यांना दिलेला ‘श्री दुर्गादेव्यै नमः । ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप भावपूर्ण केला.
२ इ. सद्गुरु नंदकुमार जाधव घरी आल्यावर यजमानांनी त्यांना नमस्कार करणे आणि तेव्हापासून मोठ्या आवाजात नामजप करणे : मे २०२४ मध्ये सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा नांदेड जिल्ह्यात दौरा चालू होता. ९.५.२०२४ या दिवशी सद्गुरु जाधवकाका महाप्रसादासाठी आमच्या घरी आल्यावर यजमानांनी त्यांना नमस्कार केला आणि तेव्हापासून यजमान मोठ्या आवाजात नामजप करायला लागले.
३. निधन
१४.५.२०२४ या दिवशी यजमानांना रुग्णालयात दाखवून आणले होते. सर्व ठीक होते; पण १६.५.२०२४ या दिवशी रात्री यजमानांची प्रकृती बिघडली; म्हणून त्यांना रुग्णालयात भरती केले. १८.५.२०२४ या दिवशी सकाळी त्यांचे निधन झाले.
४. अग्नीसंस्कार
यजमानांचे निधन झाल्यावर मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘या कठीण परिस्थितीत मला शांत आणि स्थिर ठेवा. मला मुलांना धीर देता येऊ दे. यजमानांचा पुढचा प्रवास चांगला होऊ दे.’ यजमानांच्या पार्थिवाला अग्नी दिला, तेव्हा ऊन होते. नातेवाईक आणि समाजातील लोक त्यांना श्रद्धांजली वहात असतांना पाऊस आला. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
५. अनुभूती
पहिल्या दिवशी पीठ पसरून त्यावर परात झाकून ठेवतात आणि दुसर्या दिवशी परात उचलून बघतात. तेव्हा त्या पिठावर ‘ॐ’, ‘स्वस्तिक’, ‘त्रिशुळ’, ‘महादेवाची पिंडी’, अशी शुभचिन्हे दिसली. तेव्हा गुरुचरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली.
६. अंत्यविधी निर्विघ्नपणे पार पडणे
त्यानंतरचे सर्व विधी निर्विघ्नपणे पार पडले. ब्राह्मणही चांगले मिळाले. त्यांनी सर्व विधी चांगले केले. १० व्या दिवशी गोदावरीच्या मध्यभागी जाऊन अस्थींचे विसर्जन केले. तेव्हा माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘गंगामैय्या, तू त्यांना तुझ्या पवित्र चरणी घे.’ यजमानांसाठीचे पिंड ठेवल्याबरोबर कावळे आले आणि त्यांनी घास घेतला. यावरून ‘यजमानांचा पुढील प्रवास चांगला चालू झाला आहे’, असे मला वाटले आणि गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
७. घाटावरून परत येतांना गाडी बंद पडणे, एका मुलाने येऊन गाडी चालू करून घरापर्यंत आणून सोडणे
आम्ही घाटावरून परत येतांना आमची गाडी अकस्मात् पुलावरच बंद पडली. मागे गाड्यांची गर्दी झाली. लोक ओरडू लागले. तेव्हा गुरुदेवांना प्रार्थना झाली, ‘यातून आपणच बाहेर काढू शकता.’ अकस्मात् एक मुलगा आला आणि म्हणाला, ‘‘मी गाडी काढून देतो.’’ त्याने आमची गाडी बाजूला काढली; पण पुन्हा ती चालू होईना. तेव्हा त्या मुलाने स्वत: घरापर्यंत गाडी चालवत आणली. मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. प.पू. गुरुमाऊली प्रत्येक क्षणाला माझी सावली बनून माझ्या पाठीशी उभी आहे. गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता !’
– श्रीमती शालिनी गोजे (वय ६७ वर्षे), नांदेड. (१६.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |