शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ !
पुणे – शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आर्.टी.ई.) खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला दुसर्यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे अद्याप प्रवेश न घेतलेल्यांना ८ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्याची संधी आहे. प्रवेश प्रक्रियेत अद्याप ५० सहस्रांहून अधिक जागा रिक्त आहेत, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.
राज्यातील ९ सहस्र २१७ शाळांमध्ये १ लाख ५ सहस्र २४२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी प्रविष्ट झालेल्या २ लाख ४२ सहस्र ५१६ अर्जांमधून ९३ सहस्र ९ विद्यार्थ्यांना प्रवेश घोषित झाला आहे. प्रतीक्षा सूचीत ७१ सहस्र २१६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिक्षण विभागाने प्रवेश घोषित केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३९ सहस्र ४१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून प्रवेश घेण्यासाठी ३१ जुलैपर्यंतची मुदत होती; ती प्रारंभी ५ ऑगस्टपर्यंत आणि नंतर ८ ऑगस्टपर्यंत वाढवून दिली आहे.