‘सज्जनगड रन २०२४’चे आयोजन !
सातारा, ९ ऑगस्ट (वार्ता.) – श्रीक्षेत्र सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळ आणि दिवेकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सज्जनगड रन २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सातारावासियांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपक्रमाविषयी माहिती देतांना समर्थभक्त डॉ. अच्युत गोडबोले म्हणाले, ‘‘श्री समर्थ रामदासस्वामी यांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासमवेत नागरिकांना आरोग्याचा मंत्र द्यावा यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. गजवडी येथील अभयसिंहराजे विद्यालयापासून चालू होणार्या स्पर्धेचा समारोप श्रीक्षेत्र सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या कार्यालय परिसरात होईल. १८ वर्षांवरील पुरुष आणि महिला यांसाठी ५ किलोमीटर अंतराची ही स्पर्धा असून चढाचा मार्ग असल्याने धावपटूंचा कस लागणार आहे, तसेच नयनरम्य परिसर असल्यामुळे धावपटूंना आनंद मिळणार आहे. आरोग्याचे महत्त्व विशद करण्यासाठीच समर्थांनी संपूर्ण महाराष्ट्रात मारुति मंदिरांची स्थापना केली. हाच धागा धरून ‘सज्जनगड रन २०२४’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी नाव नोंदणी करणार्यांना स्पर्धेपूर्वी टी-शर्ट, टी बॅच (चहाचे कुपन), तसेच स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन प्रमाणपत्र, रामवस्त्र आणि अल्पोपहार दिला जाणार आहे.’’