योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी घडवलेल्या त्यांच्या दैवी कार्यातील शिष्यांपैकी एक पू. महेश्वरीदेवी !
‘वर्ष १९७५ मध्ये योगतज्ञ प.पू. दादाजी साधनेसाठी हरिद्वार येथे गेले होते. योगतज्ञ दादाजी ज्या मठात निवासाला होते, तिथे त्यांच्या शेजारच्या खोलीत एक कुटुंब रहात होते. त्यांच्या समवेत त्यांची मुलगी होती. त्या मुलीचे वय अनुमाने १८ ते २० वर्षे असेल. त्या मुलीच्या वडिलांना योगतज्ञ दादाजी यांच्या श्रेष्ठतेविषयी कळले. तेव्हा त्यांनी मुलीविषयी योगतज्ञ दादाजींना सांगितले. त्यानंतर योगतज्ञ दादाजी यांनी त्या मुलीविषयी केलेले भविष्यकथन आणि त्यांचे भविष्यकथन सत्यात उतरल्याविषयी येथे दिले आहे.
१. ‘त्या मुलीचे वडील दादाजींना म्हणाले, ‘‘आमची मुलगी सारखी देवाचे करत असते. तिला देवाविना दुसरे काही दिसतच नाही. तुम्ही तिची पत्रिका पाहून आम्हाला सांगा ती असे का करते ? आम्ही काय करायला हवे ?’’
२. योगतज्ञ दादाजी यांनी मुलीचे सूक्ष्मातून भविष्य जाणून ‘मुलीचा जन्म केवळ आध्यात्मिक कार्यासाठीच झाला आहे आणि ती लवकरच अध्यात्मातील उच्च स्थानी पोचेल ’, असे सांगणे
योगतज्ञ दादाजी ज्योतिषशास्त्रातील जाणकार होतेच. त्यांनी त्या मुलीचे सूक्ष्मातून भविष्य जाणले. योगतज्ञ दादाजींनी त्या मुलीच्या वडिलांना सांगितले, ‘‘या मुलीचा जन्म केवळ आध्यात्मिक कार्यासाठीच झाला आहे. ही मुलगी व्यावहारिक जीवनापासून पूर्ण अलिप्त आहे. तिला संसारात जराही रस नाही. तिला ईश्वरप्राप्तीचीच ओढ आहे. या मुलीने योग्य मार्गाने साधना केली, तर ती लवकरच अध्यात्मातील उच्च स्थानी पोचेल आणि मनुष्य जन्माचे सार्थक करील. तिच्या ईश्वरप्राप्तीच्या मार्गात अडथळा न होणे, हेच योग्य आहे.’’
३. त्यानंतर त्या मुलीचे वडील जड अंत:करणाने योगतज्ञ दादाजींना म्हणाले, ‘‘तुम्हीच हिचे काय ते बघा.’’
४. योगतज्ञ दादाजींनी हिमालयामध्ये असलेल्या महामंडळातील समुहात त्या मुलीला सहभागी करून घेतल्यावर अल्प कालावधीतच ती मुलगी झाली अध्यात्मातील उच्च पातळीवर असलेल्या पू. महेश्वरीदेवी !
योगतज्ञ दादाजींनी त्या मुलीला आपल्या (योगतज्ञ दादाजी यांच्या) हिमालयामध्ये असलेल्या महामंडळातील समुहात सहभागी करून घेतले आणि तिला साधना शिकवली. त्या मुलीची ईश्वरप्राप्तीची तळमळ अधिक असल्यामुळे तिने साधनेतील बारकावे लवकर शिकून आत्मसात् केले. ती मुलगी अल्प कालावधीतच अध्यात्मात एका उच्च पातळीवर पोचली. आज त्या मुलीची ओळख पू. महेश्वरीदेवी अशी आहे.
५. योगतज्ञ दादाजी यांच्या हिमालयामध्ये असलेल्या महामंडळात पू. महेश्वरीदेवी यांना चांगले स्थान प्राप्त होणे आणि पू. महेश्वरीदेवी यांनीही सूक्ष्मातून वार्तालाप करून दैवी नोंदी दिल्याचे रिडिंग असणे
योगतज्ञ दादाजी यांच्या हिमालयामध्ये असलेल्या महामंडळात पू. महेश्वरीदेवी यांना चांगले स्थान प्राप्त झाले आहे. पू. महेश्वरीदेवी योगतज्ञ दादाजींना गुरुस्थानी मानतात. योगतज्ञ दादाजी देवतांशी, तसेच हिमालयामध्ये असलेल्या महामंडळातील उन्नत सत्पुरुषांशी सूक्ष्मातून वार्तालाप करत असत. ते एखाद्या घटनेचे सूक्ष्म रिडिंग घेत असत. योगतज्ञ दादाजी यांच्या काही सूक्ष्म रिडिंगमध्ये पू. महेश्वरीदेवी यांनीही सूक्ष्मातून वार्तालाप करून दैवी नोंदी दिल्याचे रिडिंग आहेत. योगतज्ञ दादाजी यांच्या दैवी कार्यात शिष्या पू. महेश्वरीदेवी तसेच पू. गीतांजलीदेवी यांनीही खारीचा वाटा उचलला आहे.
६. पू. महेश्वरीदेवी यांनी पाठवलेली विभूती योगतज्ञ दादाजी यांनी साधकांना देणे आणि या दैवी विभूतीमुळे साधकांना अनुभूती येऊन त्यांची साधना चांगली होणे
योगतज्ञ दादाजी यांच्याकडे सूक्ष्मातून दैवी विभूती (अंगारा) येत असे. त्याचप्रमाणे काही वेळा पू. महेश्वरीदेवी यांनी पाठवलेली विभूतीही त्यात असे. ती विभूती योगतज्ञ दादाजी साधकांना देत असत. त्या विभूतीला दैवी गंध असून तो अनमोल असे. या दैवी विभूतीने पुष्कळ साधकांना अनुभूती आल्या आहेत. साधकांच्या साधनेतील अडचणी सुटून साधना चांगली होण्यासाठी याचा लाभ झाला आहे.’
– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.७.२०२४)
|