हिंदूंनी अखंड सावध रहाण्याची वेळ !

१. विरोधकांचा महाराष्ट्र सरकारला हिंदुविरोधी ठरवण्याचा डाव

‘भारताला इस्लामी राष्ट्र करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी कपोलकल्पित घटनांची निर्मिती करून त्याचा प्रसार-प्रचार करणे चालू आहे. यामागे हिंदु समाजात वैचारिक गोंधळ निर्माण करून संभ्रम निर्माण करण्याचा विरोधकांचा मोठा डाव आहे. आजही हिंदु समाजातील बहुसंख्य जनतेला स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिप्रेत असलेली राजकीय दृष्टी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे विरोधकांवर विश्वास ठेवण्याकडे आजही त्यांचा कल आहे. विरोधी पक्ष हा सातत्याने हिंदुत्वनिष्ठ राजकीय पक्ष आणि संघटना यांना हिंदुविरोधी ठरवण्यासाठी धडपडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही सातत्याने विविध पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. विरोधकांच्या बनावट आणि काल्पनिक कथानकांना फसणे, म्हणजे हिंदूंनी स्वतःच स्वतःचा घात करण्यासारखे आहे.

‘इ.व्ही.एम्.’ यंत्राविषयी (मतदान यंत्राविषयी) सातत्याने संशय व्यक्त केला जातो. एवढेच नाही, तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाला लक्ष्य करून खोटेनाटे आरोप करण्यात आले, तसेच निवडणूक आयोगाला न्यायालयातही खेचण्याचा प्रयत्न झाला. हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे की, सर्व विरोधी पक्ष अत्यंत लबाड आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ पक्षाच्या हाती देशाची सत्ता जाऊ द्यायची नाही. त्यामुळे ते विविध प्रकारे विद्यमान सरकारची मानहानी करण्याचा घाट घालत आहेत. या षड्यंत्राला फसून त्यांचे मनसुबे यशस्वी करण्याचे पातक आपल्याकडून घडू नये, यासाठी हिंदु समाजाने अखंड सावध असले पाहिजे.

२. वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये दिल्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारचा विरोध करणे चुकीचे !

वक्फ बोर्ड

महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी रुपये दिल्याची बातमी सर्वत्र पसरली. त्यासाठी विरोधी पक्षाने एक बनावट कथानक रचून ‘वक्फ बोर्डाला महाराष्ट्र सरकारने १० कोटी देऊन हिंदु समाजाचा विश्वासघात केला’, अशी बातमी सर्वत्र प्रसारित केली. त्यावर तात्काळ विश्वास ठेवून हिंदूंनी तीव्र निषेध केला. हिंदूंकडून झालेली ही चूक विरोधी पक्षांच्या पथ्यावर पडली. वक्फ बोर्डाची स्थापना काल किंवा आज झालेली नाही. या सर्व गोष्टींची प्रक्रिया ७ दशकांच्या पूर्वीपासून चालू आहे. काँग्रेसच्या तत्कालीन सरकारांनी वक्फ बोर्डाला अमर्यादित अधिकार दिले आहेत. एवढेच नव्हे, तर वक्फ बोर्डाच्या साहाय्याने एक समांतर न्यायव्यवस्थाही अस्तित्वात आणली आहे. वक्फ बोर्डाला असा अमर्यादित अधिकार दिल्यानंतर ‘देशाच्या राष्ट्रीय संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे’, असे विधान देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते मनमोहन सिंग यांनी केल्याचे सर्वांना स्मरत असेल. या अमर्यादित अधिकाराचा लाभ वक्फ बोर्डाने घेतला. त्यामुळेच वक्फ बोर्ड लक्षावधी एकर भूमी अवैधपणे स्वतःच्या नावावर करू शकले आहे.

३. वक्फ बोर्डाने बळकावलेली भूमी परत मिळवण्यासाठी १० कोटी रुपयांचे प्रावधान (तरतूद)

वक्फ बोर्डकडून हिंदूंची मंदिरे, घरे आणि भूमी यांवर अतिक्रमण करण्याविषयीचे प्रातिनिधिक चित्र

वक्फ बोर्डाच्या कह्यात असलेली भूमी पुनश्च प्राप्त करून घेणे नितांत आवश्यक आहे, अन्यथा संपूर्ण देशाची भूमी या बोर्डाच्या कह्यात जाईल. ही परिस्थिती निर्माण होऊ नये; म्हणून महाराष्ट्रातील लक्षावधी एकर भूमी जी वक्फ बोर्डाने अवैधपणे संपादन केली आहे, त्याची सविस्तर माहिती प्राप्त करण्याच्या हेतूने महाराष्ट्र सरकारने १० कोटी रुपये उपयोगात आणले आहेत. वक्फ बोर्डाच्या नावावर असलेली भूमी ही त्याच्याकडे कशा प्रकारे हस्तांतरित झाली ? त्यांनी कुणाची भूमी बोर्डाच्या नावावर करून घेतली ? खरा सातबारा उतारा कुणाच्या नावावर आहे ? तो वक्फ बोर्डाच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी त्यावर कुणी स्वाक्षरी केली ? या आणि अशा अत्यंत महत्त्वाच्या मूलभूत प्रश्नांची संगतवार माहिती महाराष्ट्र सरकारकडे असेल, तर त्याला अनुसरून निर्बंधांच्या चौकटीत राहून अवैध मार्गाने बळकावलेली भूमी पुनश्च सोडवणे सहज शक्य होईल. त्यासाठी या १० कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे; पण ही सत्य माहिती बाहेर येऊ न देता ‘महाराष्ट्र सरकारने हिंदु समाजाचा विश्वासघात केला’, अशी आवई उठवण्यात आली.

श्री. दुर्गेश परुळकर

४. हिंदूंनी विरोधी पक्षाचे कुटील षड्यंत्र हाणून पाडणे आवश्यक !

हिंदु समाजाच्या मनात महाराष्ट्र सरकारविषयी अविश्वासाचे बीज पेरण्यात आले. आता ते बीज रुजल्यानंतर त्याचा मोठा वृक्ष करण्यासाठी अशा प्रकारचे विविध आरोप विरोधी पक्षाकडून सातत्याने केले जातील. येणार्‍या निवडणुकीत बहुसंख्य हिंदु समाज हा विद्यमान महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी उभा राहून त्याला मतदान करणार नाही. असे घडले, तर सत्ता विरोधी पक्षाच्या हाती जाईल. विरोधी पक्षांच्या हाती सत्ता गेली की, या राज्यात मनमानी राज्यकारभार करण्याची पूर्ण मोकळीक विरोधी पक्षाला मिळणार आहे. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारविषयी अविश्वास निर्माण करून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाने यशस्वीपणे केला आहे. त्यांच्या या प्रयत्नाला हाणून पाडण्यासाठी हिंदु समाजाने अखंड सावध रहाणे नितांत आवश्यक आहे.

वक्फ बोर्डाला देण्यात आलेले अमर्यादित अधिकार एवढे बलवान आहेत की, त्याच्या विरोधात कुणालाही न्यायालयात जाण्यासाठी एकही दार उघडे ठेवण्यात आले नाही. वक्फ बोर्डाचे विसर्जन करून या बोर्डाने बळकावलेली संपूर्ण भूमी पुनश्च आपल्या कह्यात घेण्याचे महत्त्वाचे उद्दिष्ट हिंदूंना साध्य करायचे आहे. ते साध्य करण्यासाठी योग्य प्रकारे हालचाल करणे नितांत आवश्यक आहे. त्यामुळे आपण विरोधकांच्या भूलथापांना फसण्याऐवजी अखंड सावध राहून विरोधकांचे कुटील डाव उधळले पाहिजे.

सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे विरोधी पक्ष हा विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा आहे का ? याचाही विचार केला पाहिजे. हिंदु समाजात फूट पाडून पक्षपात केला तो याच विरोधी पक्षांनी ! भ्रष्टाचाराचे विविध विक्रम प्रस्थापित केले, ते याच विरोधी पक्षांनी ! अशा भ्रष्टाचारी आणि अराजक सदृश वातावरण निर्माण करणार्‍या विरोधी पक्षावर विश्वास ठेवण्याचा अपराध आपल्याकडून घडू नये; म्हणून आपण हिंदूंनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आपण आपल्याच बांधवांवर अविश्वास बाळगून आत्मघात करत आहोत, ही जाणीव सातत्याने आपल्याला असली पाहिजे. ‘संशय सर्व गोष्टींचा विनाश घडवून आणतो’, या गीतेतील वचनाकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. अत्यंत बिकट परिस्थिती असल्याने हिंदु समाजाने संशयरहित होऊन राष्ट्रहिताचा विचार करावा आणि विरोधकांच्या कुटील डावाला फसू नये एवढीच माफक अपेक्षा !’

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२२.६.२०२४)

संपादकीय भूमिका : 

विरोधकांच्या खोट्या कथानकांना न भूलता हिंदु समाजाने संघटितपणे संशयरहित होऊन राष्ट्रहिताचा विचार करावा !