पी.एम्.आर्.डी.ए.च्या कामकाजात मराठीचा वापर करण्याच्या आयुक्त योगेश म्हसे यांच्या सूचना !

पिंपरी (पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिकेनंतर आता पी.एम्.आर्.डी.ए.ने (पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणने) सुद्धा प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व विभागप्रमुखांनी स्वत:चे कामकाज मराठीतूनच करण्याच्या सूचना आयुक्त योगेश म्हसे यांनी दिल्या आहेत. राज्यशासनाच्या परिपत्रकान्वये सामान्य नागरिकांशी केला जाणारा पत्रव्यवहार, सर्व नमुने, पत्रके, परवाने, टिप्पणी, आदेश, परिपत्रके, अहवाल आदी कार्यवृत्तांत मराठी भाषेत असणे आवश्यक आहे. त्याची कार्यवाही करण्याच्या सूचना महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सर्व विभागप्रमुखांना दिल्या आहेत. (महाराष्ट्रात प्रशासकीय कामकाजात राजभाषा मराठीचा वापर वाढवण्याच्या सूचना द्याव्या लागणे, हे संबंधितांना लज्जास्पद आहे. मराठीच्या वापराविषयी कठोर कार्यवाही करणे आवश्यक आहे ! – संपादक) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राधिकरणाची माहिती सर्वांच्या निदर्शनास आणणे आवश्यक असल्यास संकेतस्थळावर ती केवळ इंग्रजी भाषेत न ठेवता मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांत प्रसिद्ध करावी. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने जनसामान्यांना उपलब्ध करून दिलेले माहिती अधिकार, आपले सरकार, ई-निविदा इत्यादी ऑनलाईन सेवा किंवा पोर्टल मराठी भाषेत उपलब्ध असणे आवश्यक आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांनी मराठीचा यथायोग्य वापर करावा. मराठी वापराविषयीच्या सूचनांचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी काटेकोरपणे कार्यवाही करावी, अशा सूचना महानगरआयुक्त डॉ. म्हसे यांनी केल्या आहेत.