(कै.) पू. आशा दर्भेआजींच्या सहवासात साधिकेला स्वतःमध्ये जाणवलेले पालट आणि त्या कालावधीत आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती !
(कै.) पू. (श्रीमती) आशा दर्भेआजी यांची आज (९.८.२०२४) या दिवशी प्रथम पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…
‘२२.७.२०२३ (अधिक श्रावण शुक्ल पक्ष पंचमी) या दिवशी (कै.) पू. आशा दर्भेआजींनी (सनातनच्या ७१ व्या व्यष्टी संत, वय ९४ वर्षे) देहत्याग केला. ७.७.२०२३ या दिवशी पू. आजींची स्थिती गंभीर झाल्याने मी आणि माझी आई (श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी (वय ७३ वर्षे) गोव्याहून कोल्हापूरला गेलो. त्यानंतर पुढील १५ दिवस आम्हाला पू. आजींचा सहवास लाभला. या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने आणि पू. आजींच्या अस्तित्वाने माझ्यातील स्वभावदोष अन् अहं यांची तीव्रता न्यून होऊन माझ्यात पुढील पालट झाल्याचे मला जाणवले. माझ्या आईलाही माझ्यातील हे पालट जाणवल्याचे तिने सांगितले.
(कै.) पू. (श्रीमती) आशा दर्भेआजी यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा नमस्कार !
१. परिस्थिती स्वीकारता येणे
१ अ. ‘पू. आजींच्या स्थूलदेहात न अडकता त्यांच्याप्रती अखंड कृतज्ञताभाव दाटून येणे : ‘पूर्वी पू. आजींविषयी माझ्या मनात पुष्कळ प्रेम आणि भावनिकता होती. त्यांनी माझ्यावर एवढे प्रेम केले की, ‘मी त्यांच्याविना रहाणे किंवा त्या नसणे’, हा विचार मी स्वप्नातही करू शकत नव्हते. जेव्हा आम्ही पू. आजींच्या आजारपणात त्यांच्याकडे गेलो, तेव्हा त्यांची स्थिती पाहिल्यावर केवळ गुरुदेवांच्या कृपेनेच मला ती परिस्थिती स्वीकारता आली. पू. आजी ‘स्थुलातून असणे किंवा नसणे’ यापेक्षा त्यांनी माझ्यासाठी जे केले, त्यासाठी माझ्या मनात अखंड कृतज्ञताभाव दाटून येत होता. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेनेच मला एवढ्या सात्त्विक आणि गुणांचा सागर असलेल्या पू. आजींचे प्रेम लाभले, यासाठी कृतज्ञता व्यक्त होत होती.
१ आ. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी पू. आजींना त्यांच्या आयुष्यभराच्या तपस्येचे फळ त्यांना संतपद बहाल करून दिल्याने त्यांचे चैतन्य आणि शक्ती नेहमी मिळणार आहे’, याची जाणीव राहून स्वीकारार्हता वाढणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी पू. आजींना त्यांच्या आयुष्यभर केलेल्या तपस्येचे फळ त्यांना संतपद बहाल करून दिले आहे. त्यायोगे आपल्याला पू. आजींचे चैतन्य आणि शक्ती नेहमीच आध्यात्मिक ऊर्जा पुरवणार आहे’, ही जाणीव मला राहिली आणि माझी स्वीकारण्याची स्थिती वाढून मन सतत स्थिर राहिले. ‘पू. आजींच्या गुणांतून शिकून ते गुण आपल्यातही येण्यासाठी देवाला शरण राहून प्रयत्न करायचे आहेत’, हा विचार दृढ असल्यामुळे पू. आजींविषयी भावनिक किंवा भौतिक स्तरावर विचार झाला नाही. त्यामुळे पू. आजींनी देहत्याग केल्यानंतरही त्यांचे चैतन्य, शक्ती आणि आनंद मला अन् आईला आजही जाणवतो.
१ इ. वर्तमानकाळात राहून सर्व प्रसंग स्वीकारता येऊन ‘बहिर्मुखता’ हा दोष न्यून होऊन अंतर्मुखता आणि एकाग्रता वाढणे : पू. आजी कोल्हापूर येथे माझ्या धाकट्या मामाच्या (श्री. प्रसाद भास्कर दर्भे) घरी रहात होत्या. पूर्वी मला वाटायचे की, ‘पू. आजींशी सर्वांनी योग्य प्रकारे वागायला हवे आणि बोलायला हवे.’ पू. आजी मात्र त्यांच्याशी कोणी कसेही बोलले किंवा वागले, तरीही त्यांच्याशी प्रेमानेच बोलायच्या. त्या वेळी मला त्यांच्यातील ‘प्रीती’ जाणवत होती; पण त्यातून ‘मी शिकावे आणि तसे प्रयत्न करावे’, ही कृती माझ्याकडून झाली नाही. ‘शिकण्याची वृत्ती नसणे’ आणि ‘तीव्र बहिर्मुखता’ या स्वभावदोषांमुळे माझे लक्ष इतरांच्या चुकांकडे आणि स्वभावदोषांकडे असायचे. या वेळी मात्र पू. आजींच्या आजारपणात माझे ‘कोण काय बोलते किंवा कसे वागते ?’, यांकडे अजिबात लक्ष न जाता शांतपणे नामजप होत होता. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि पू. आजी यांच्याशी माझे सूक्ष्मातून अनुसंधान रहात होते. मला सर्व परिस्थिती स्वीकारता येण्यासाठी गुरुदेवांच्या चरणी सतत शरणागतभावात रहाता येत होते. तसेच पू. आजींची गुणवैशिष्ट्ये आणि प्रार्थना यांकडे लक्ष रहात होते. त्या वेळी माझा कृतज्ञताभाव दाटून येत होता. माझी ही स्थिती अजूनही आहे. या कालावधीत पू. आजींच्या केवळ अस्तित्वाने माझ्यातील ‘बहिर्मुखता’ हा दोष न्यून होऊन माझ्यातील अंतर्मुखता आणि एकाग्रता वाढली.
२. ‘अपेक्षा करणे’ आणि ‘मला अधिक कळते’, हा अहंभाव न्यून होणे : ‘मी वैद्यकीय क्षेत्रात काम केल्यामुळे पूर्वी पू. आजी रुग्णाईत असतांना त्यांचे उपचार आणि आधुनिक वैद्यांचा सल्ला यांविषयी मला माहिती असल्यामुळे नातेवाइकांनी मला विचारावे किंवा मी सांगितलेले सर्वांनी मान्य करावे’, अशी माझी अपेक्षा असायची. ‘मला या सर्व बाबी अधिक कळतात’, या विचाराने प्रत्येक सूत्र सांगतांना आणि मांडतांना माझा ठामपणा असायचा. या वेळी मात्र ‘पू. आजींच्या स्थितीविषयी पुढे काय करायचे ?’, याविषयी आधुनिक वैद्यांनी जे सांगितले आहे, त्याप्रमाणे इतरांना सांगून कृती करायचे. मी त्यांना मला जे ठाऊक आहे, ते सांगितले; पण ‘माझ्या मनाप्रमाणे व्हावे’, असा अट्टाहास झाला नाही.
३. ऐकण्याचा आणि विचारून करण्याचा भाग वाढल्यामुळे मन स्थिर रहाणे : नामजपादी उपाय करण्याच्या संदर्भातही ‘जे स्थुलातील उपाय सांगितले आहेत, ते करण्याविषयी कुटुंबियांना विचारायचे. त्यांनी होकार दिला, तर करायचे’, हा ऐकण्याचा आणि विचारण्याचा भाग वाढला. त्यामुळे मनात कोणताही ताण अथवा प्रतिक्रिया नव्हती. ‘पू. आजींनी जीवनभर कशा कृती केल्या ?’, हे आठवून त्यांच्याकडून शिकायला मिळालेले गुण माझ्यात येण्यासाठी प्रयत्न करायचा आहे’, याची जाणीव तेव्हापासून वाढली आहे.
४. ‘कर्तेपणा’ न्यून होणे : पू. आजींच्या आजारपणात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांनी काही नामजपांचे उपाय सांगितले होते. प्रथमतः माझ्या मनात ‘पू. आजींसाठी ते नामजप आई किंवा मी करत आहे’, असा विचार होता. प्रत्यक्षात नामजप करतांना ‘पू. आजीच आमची साधना होण्यासाठी तो नामजप आमच्याकडून करून घेत आहेत’, याची जाणीव वाढली. त्याच वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आम्हाला (आई आणि मी) पू. आजींसमवेत असतांना अधिकाधिक नामजप करून साधनेसाठी लाभ करून घेण्यास सांगितले. त्यांच्या या संकल्पामुळेच आमचा नामजप शरणागतीने आणि कृतज्ञताभावाने झाला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे अस्तित्व तेथे जाणवायचे. त्यामुळे त्यांनीच आमची साधना करून घेतल्याची जाणीव राहून कर्तेपणा न्यून झाला.
५. पू. आजी स्वतःची शारीरिक स्थिती चांगली नसतांनाही मुलगी आणि नातीची काळजी घेत असल्याची अनुभूती येऊन कृतज्ञता व्यक्त होणे : १७.७.२०२३ या दिवशी पू. आजींच्या शेजारी बसून नामजप करत असतांना मला सूक्ष्मातून दिसले की, ‘पू. आजी मला आणि आईला घेऊन सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या खोलीत गेल्या. तेथे आम्ही तिघींनी गुरुदेवांना नमस्कार केला. पू. आजी हात जोडून गुरुदेवांना म्हणाल्या, ‘आता या दोघींना तुम्हीच सांभाळा. त्यांना तुमच्या चरणी सोपवते.’ त्या वेळी गुरुदेवच ‘आम्हाला सांभाळत आहेत’, हे पू. आजींना माहिती असूनही त्या पुन्हा गुरुदेवांना असे का सांगत आहेत ?’, असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा ‘गुरुदेवांच्या चरणी मी आणि आईने शरणागत राहून साधना करायची आहे, याची जाणीव मला रहावी’, यासाठी पू. आजींनी ती अनुभूती दिल्याचे मला जाणवले. त्या क्षणापासून गुरुदेवांच्या चरणी माझा शरणागतभाव वाढल्याचेही मला जाणवले.
६. ‘ईश्वरेच्छा श्रेष्ठ आहे’, याची जाणीव राहून वर्तमानकाळात रहाता येणे : या कालावधीत रामनाथी आश्रमात एक शिबिर होते. पूर्वी शिबिर कालावधीत ‘मी तेथे असायला हवे. पुष्कळ सेवा आहेत. त्या कालावधीत माझ्या मनात ‘मी नसेन, तर सहसाधकांना काय वाटेल ?’, असे प्रतिमेसह कर्तेपणाचे विचारही असायचे. त्यामध्ये माझी स्वेच्छा अधिक कार्यरत असायची. त्यामुळे मी अस्वस्थ व्हायचे. या वेळी मात्र ‘मी पू. आजींच्या समवेत रहाणे, त्यांच्या चैतन्याचा माझ्या आणि आईच्या साधनेसाठी लाभ करून घेणे’, ही ईश्वराची इच्छा आहे. ‘माझ्यामुळे सेवा होतात किंवा रहातात’, असे नाही. ‘सेवा करतांनाही माझी साधना होते का ?’, हेच देव पहातो. त्यामुळे ‘मी जिथे आहे, तिथे अंतर्मुख राहून माझी साधना व्हायला हवी आणि त्यासाठी मी देवाच्या चरणी शरणागत रहायला हवे’, या जाणिवेने माझे मन शांत आणि स्थिर राहिले अन् भावाच्या स्तरावर प्रयत्न झाले.
७. पू. आजींच्या सहवासात सहसाधकांविषयी कृतज्ञताभाव वाढणे : या कालावधीत एका शिबिराशी संदर्भातील अनेक सेवा होत्या. असे असतांनाही विभागातील साधकांनी माझ्या वर्तमान परिस्थितीचा विचार करून मला समजून आणि सांभाळून घेतले. तसेच मला वेळोवेळी साहाय्य केले. खरेतर आतापर्यंतही अनेक प्रसंगांमध्ये माझ्या सर्व सहसाधकांनी आणि दायित्व असणार्या साधकांनी मला साहाय्य केलेच आहे; पण त्यांच्याविषयी हा कृतज्ञताभाव पू. आजींच्या सहवासात जाणवला. ‘पू. आजींनीच माझ्यातील कृतज्ञताभाव जागृत केला’, याची मला जाणीव झाली.
८. पू. आजींनी ‘आपल्यासाठी कोणी काही केले, तर शेवटच्या श्वासापर्यंत आपण त्याची जाणीव कशी ठेवायला हवी ?’, हे अंतर्मनावर बिंबवणे : पू. आजींमधील कृतज्ञताभावाचे उदाहरण म्हणजे पुष्कळ वर्षांपूर्वी माझ्या आईने पू. आजींना एक स्वेटर घेतला होता. तो त्यांना आवडायचा आणि त्या नेहमी वापरायच्या. तो स्वेटर घेऊन अनेक वर्षे झाली होती, तरीही पू. आजींना भेटायला कोणी गेले की, ‘हा स्वेटर माझ्या मुलीने दिला आहे’, असे त्या सर्वांना सांगायच्या ‘आपल्यासाठी कोणी काही केले, तर शेवटच्या श्वासापर्यंत आपण त्याची जाणीव कशी ठेवायला हवी ?’, हेच पू. आजींनी माझ्या अंतर्मनावर बिंबवले. याचप्रमाणे पू. आजींच्या आजारपणात कुटुंबियांना त्यांचे करावे लागते, हे पाहून त्या नेहमी म्हणायच्या, ‘‘अरे, तुम्ही माझ्यासाठी किती करता !’’ अशा प्रकारच्या अनेक प्रसंगांतून पू. आजींनी मला त्यांच्यातील कृतज्ञताभावाची अनुभूती दिली आहे. ‘गुरुदेवांच्या कृपेने आपल्याला एवढे चांगले सहसाधक मिळाले असून आपण आपल्या सहसाधकांकडून आपल्याला मिळणारे प्रेम आणि साहाय्य यांसाठी कृतज्ञ रहायला हवे’, हे मला पू. आजींकडून शिकायला मिळाले.
९. परम पूज्य गुरुदेवांच्या कृपेने पू. आजींच्या सहवासात साधिकेच्या कपाळावर ‘त्रिशूळ’ चिन्ह उमटणे : या कालावधीत पू. आजींच्या समवेत असतांना माझ्या कपाळावर ‘त्रिशूळ’ चिन्ह उमटले. परम पूज्य गुरुदेवांच्या कृपेनेच हे झाले. त्या वेळी ‘पू. आजींकडून मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. माझी आई, भाऊ (श्री. अमित अनंत कुलकर्णी) आणि भाचा (कु. विवान अमित कुलकर्णी, आध्यात्मिक स्तर ६१ टक्के, वय ८ वर्षे) यांनाही ते त्रिशूळ चिन्ह दिसले.
‘परम पूज्य गुरुदेव, आपल्या कृपेमुळेच आम्हाला पू. आजींचा सहवास लाभला आणि पू. आजींच्या अस्तित्वाने माझ्यातील स्वभावदोष न्यून होऊन त्यांच्या गुणांतून शिकण्याची तळमळ वाढली. भगवंता, आपण करत असलेल्या या कृपेसाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. पू. आजींच्या दैवी गुणांतून शिकता येऊ दे आणि त्यांचे गुण आमच्यात येण्यासाठी आमची स्वभावदोष निर्मूलन आणि गुणसंवर्धन प्रक्रिया सातत्याने होत राहू दे, अशी आपल्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– अश्विनी अनंत कुलकर्णी, ढवळी, फोंडा, गोवा.
|