नागपूजन !
शाळेत असतांना मला प्रश्न पडायचा की, नागपंचमीला नागाची पूजा का करतात ? त्याचे उत्तर मला कुठेच सापडेना. मग मी चिंतन करू लागलो. त्या वेळी असे लक्षात आले की, कदाचित साप किंवा नाग हे भूमीपुत्र असावेत. त्यांचा मान राखण्यासाठी त्यांची पूजा करत असतील. नंतर मला कुणी सांगितले, ‘‘मेल्यावर ज्यांची त्यांच्या संपत्तीवर इच्छा, आसक्ती असते, त्यांना सापाचा पुनर्जन्म मिळतो !’’ त्यामुळे मी असा निष्कर्ष काढला, ‘नाग आमचे पूर्वज असतील; म्हणून त्यांची पूजा करण्याची प्रथा असावी.’ काही जण सांगायचे की, नाग हा शेतकर्याचा मित्र आहे म्हणून त्याची पूजा करतात. नागदेवतेचे पूजन केल्यामुळे सर्प भय उरत नाही. नागपूजनाने ‘विषबाधेचे संकट दूर होते’, असेही म्हणतात. सगळेच जण नागपंचमीला प्रथा म्हणून नागपूजन करतात; परंतु त्यामागील नेमके कारण कुणाकडून कळले नव्हते.
एक दिवस नागपंचमीविषयी सनातन संस्थेचे प्रवचन ऐकण्याची संधी मिळाली. तेव्हा नेमके शास्त्र माझ्या लक्षात आले, म्हणजे नागपंचमीचे दैवी महत्त्व लक्षात आले. त्यासंबंधीचे धर्मशास्त्र समजले. ‘नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे म्हणजे नागदेवतेला प्रसन्न करून घेणे.’ नागदेवता शिवाच्या शरिराभोवती वेटोळे घालून सतत चिकटून रहातात. शिवालाही नागदेवता अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे ‘नागदेवतेची पूजा करणे, म्हणजेच सगुण शिवाची पूजा केल्यासारखे झाले.’ धर्मशास्त्रानुसार वातावरणात नागपंचमीला शिवलहरी जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. त्याचा लाभ आध्यात्मिक स्तरावर पूजकाला मिळत असतोे.
हिंदु किंवा सनातन धर्म प्रत्येक प्राणीमात्राचा, तसेच पंचमहाभूतांचा, निसर्गाचा एक घटक म्हणून, तसेच देवता म्हणून त्यांची पूजा करण्यास शिकवतो. निसर्गाची पूजा केल्याने आपोआपच त्याची काळजी घेतली जाते. त्यामुळ निसर्ग प्रसन्न होत असतो. पंचमहाभूते आपल्याला सर्वतोपरी साहाय्य करत असतात. आपल्या शरिरात आणि बाहेरही तीच आहेत. जेव्हा मनुष्य निसर्गाची, त्यातील प्राणीमात्रांची काळजी घेणे सोडून देतो, निसर्गपूजन थांबते, तेव्हा निसर्गाचा प्रकोप होऊन भूकंप, वादळ यांसारखी नैसर्गिक संकटे येण्यास आरंभ होतो. सध्याच्या काळात आपण हे मोठ्या प्रमाणावर अनुभवत आहोत.
यावरून हिंदु धर्माचे आणि धर्माचरणाचे महत्त्व लक्षात येते. हिंदु धर्म निसर्गातील विविध घटकांचे पूजन करायला सांगतो आणि त्या माध्यमातून निसर्गातील प्रत्येक घटक, प्राणी, वनस्पती, पंचमहाभूते यांविषयी कृतज्ञता व्यक्त करायला, त्याला शरण जायला शिकवतो. निसर्गाविषयीची ही कृतज्ञताच मनुष्यप्राण्यावर कृपेचा वर्षाव करते. त्यामुळे हिंदु धर्मातील सर्व निसर्गनिगडित सण, व्रते मनोभावे करून त्याची कृपा संपादन करूया !
– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा.