आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन
सनातनचा लघुग्रंथ ‘आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन’ यातील काही दृष्टीकोन ८ ऑगस्ट या दिवशी पाहिले. आज पुढील दृष्टीकोन पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/822446.html
७. आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात उपयुक्त ठरणारे दृष्टीकोन
७ ए. नामजप अधिक परिणामकारक होण्यासाठी करायचे प्रयत्न
७ ए १. जलद गतीने करण्याचे महत्त्व : कधी कधी त्रासाची तीव्रता पुष्कळ वाढल्याने नामजप करतांना लक्ष सारखे विचलित होते आणि तो भावपूर्ण करण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी भावपूर्ण होत नाही. अशा वेळी नामजप जलद गतीने करावा, म्हणजे लक्ष जास्त विचलित होत नाही.
७ ए २. नामजप अखंड होण्यासाठी करायचे प्रयत्न
अ. करमाळ किंवा गणकयंत्र यांच्या साहाय्याने नामजप सतत करण्याचा प्रयत्न करावा.
आ. नामजप अखंड होण्यासाठी मध्ये मध्ये प्रार्थना करावी.
इ. नामजप अखंड होण्यासाठी स्वयंसूचना घ्यावी – ‘मी कुणाशी बोलत नसेन किंवा माझ्या मनात उपयुक्त विचार नसतील, तेव्हा लगेच माझा नामजप चालू होईल.’ (स्वयंसूचनांविषयी सविस्तर विवेचन सनातनचा ग्रंथ ‘स्वयंसूचनांद्वारे स्वभावदोष-निर्मूलन’ यात केले आहे.)’ – (पू.) श्री. संदीप आळशी (२०.८.२०१६)
७ ऐ. उपाय करण्यासाठी आवश्यक असणारी मनाची शक्ती सकारात्मक दृष्टीकोनावर अवलंबून असणे : ‘एकदा आत्यंतिक थकवा आणि वेदना यांमुळे उपायांमध्ये माझे लक्ष लागत नव्हते. त्या वेळी देवाच्या कृपेने मनात एक सकारात्मक विचार आला. त्यानंतर मनाची शक्ती थोडी वाढली. त्यामुळे उपायांमध्ये थोडे लक्ष लागायला लागले. त्यामुळे मनाची शक्ती आणखी थोडी वाढली. त्यामुळे उपाय आणखी चांगले व्हायला लागले. असे होत होत पुढे घंटाभर (तासभर) उपाय चांगले झाले. यावरून मनाची शक्ती वाढण्यासाठी सकारात्मक विचार किती आवश्यक असतो, हे कळले. यावरून जीवनात सतत सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे महत्त्व लक्षात येते.
‘अमुक एक गोष्ट मला जमणारच नाही’, असा नकारात्मक विचार केला, तर ती गोष्ट कितीही सोपी असली, तरी जमतच नाही. याउलट ‘अमुक एक गोष्ट मला जमेलच’, असा सकारात्मक विचार केला, तर ती गोष्ट कितीही कठीण असली, तरी जमते !’
– (पू.) श्री. संदीप आळशी (१६.१०.२०२०)
७ ओ. उपाय परिणामकारकपणे करण्यात सातत्य ठेवणे आवश्यक ! : आपण उपाय करत असतांना त्यामध्ये कधी कधी वाईट शक्ती अडथळेही आणतात. त्यामुळे उपाय करण्याचा कंटाळा येणे, नामजपावर लक्ष केंद्रित न होणे यांसारखे त्रास होतात. त्यामुळे उपाय परिणामकारक होत नाहीत. असे होऊ नये, यासाठी पुढील दृष्टीकोन लक्षात ठेवावा – ‘एखादे उत्तुंग यश गाठतांना मध्ये मध्ये आपल्या प्रयत्नांचे बळ अल्प पडल्याने किंवा मार्गातील अडचणींमुळे आपल्याला अल्पसे अपयश येऊ शकते’, हे आपण गृहीत धरायला हवे. ते अपयशही महत्त्वाचे असते; कारण त्यातून शिकूनच आपल्याला यश गाठता येते.
‘प्रयत्न करतांना अपयश जरी आले, तरी हार न मानता प्रयत्न जोमाने करतच रहाणे’, हे प्रयत्नांतील खरे सातत्य आहे.
८. त्रासांवर मात करण्यासाठी साधना आणि भक्ती वाढवा !
८ अ. साधनेची तळमळ वाढवणे : मध्यम ते तीव्र प्रमाणात त्रास असणार्या बर्याच साधकांना असा अनुभव येतो की, त्यांनी साधनेचे प्रयत्न चांगल्या प्रकारे चालू केले की, २ – ४ दिवसांनंतर त्यांमध्ये काही ना काही कारणामुळे खंड पडतो. यामध्ये सर्वसाधारणपणे ६० टक्के भाग हा ‘वाईट शक्तींकडून साधनेला होणारा विरोध’ आणि ४० टक्के भाग हा ‘साधकांची साधनेची तळमळ अल्प असणे’ हा असतो. साधक जरा चांगले प्रयत्न करायला लागले की, वाईट शक्ती लगेच त्यांचे पाय मागे खेचतात. असे पुनःपुन्हा घडल्यामुळे साधक निराशेत जातात आणि त्यामुळे पुढे प्रयत्न करणेच सोडून देतात. यासंदर्भात साधकांनी पुढील दृष्टीकोन लक्षात ठेवावा.
अंदमानासारख्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वा. सावरकर जे करू शकले, ते साधकांना तेवढी प्रतिकूल परिस्थिती नसतांना का जमू शकणार नाही ? साधकांनी वाईट शक्तींकडून होणार्या विरोधापुढे न नमता साधनेचे प्रयत्न त्वेषाने, भावाच्या स्तरावर आणि चिकाटीने केले पाहिजेत. मग जय साधकांचाच होईल !
८ आ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न वाढवणे : स्वभावदोषांमुळे व्यक्तीच्या मनोदेहात सूक्ष्म जखमा निर्माण होतात. सूक्ष्म जखमांतून रज-तमात्मक स्पंदने निर्माण होतात. अशा व्यक्तींना वाईट शक्तींचा त्रास लवकर होतो. स्वभावदोष अधिक असल्यास वाईट शक्तींचे त्रासही अधिक प्रमाणात होतात. तसेच स्वभावदोषांमुळे वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ केलेल्या आध्यात्मिक उपायांची परिणामकारकताही घटते. अहं हा अनेक स्वभावदोषांचे मूळ आहे. यासाठी साधकांनी स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंचे चिंतन करून ते दूर करण्यासाठी सतत प्रयत्न करत रहाणे आवश्यक आहे. त्याकरिता ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया (७ खंड)’ या सनातनच्या ग्रंथमालिकेचा लाभ घ्या !
८ इ. आध्यात्मिक उपाय अन् स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया तळमळीने होण्यासाठी काय करावे ?
८ इ १. ‘प्रयत्न करण्याची आत्यंतिक आवश्यकता स्वतःला वाटेल’, असे करणे : आध्यात्मिक उपाय जर तळमळीने केले नाहीत, तर आध्यात्मिक त्रास अल्प न झाल्याने जीवनभर त्रास आणि दुःख भोगावे लागते. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया तळमळीने राबवली नाही, तर या जन्मात अपेक्षित प्रगती होत नाहीच, पण पुढच्या जन्मांतही ते स्वभावदोष आणि अहं सोबत येतातच. अशासारखे विचार सारखे मनावर बिंबवले, तर प्रयत्न करण्याची आत्यंतिक आवश्यकता आपल्याला भासू लागते. तेव्हा आपल्याकडून तळमळीने प्रयत्न होऊ लागतात.
८ ई. गुरूंवरील श्रद्धा वाढवणे : ‘विविध जीवनाडीपट्टयांच्या (नाडीभविष्याच्या) माध्यमातून महर्षींनी ‘परात्पर गुरु डॉक्टर साक्षात् श्रीविष्णुस्वरूप असून ते मोक्षगुरु आहेत’, असे सांगितले आहे. असे परात्पर गुरु डॉक्टर आपल्या पाठीशी असतांना साधकांनी आध्यात्मिक त्रासांविषयी भय, चिंता आणि शोक का करावा ? ‘हम हैं तुमरे चरणोंके सेवक । तुम हो हमरे देहके रक्षक ।।’, या प.पू. भक्तराज महाराजांच्या भजनपंक्तीप्रमाणे आजपर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना सर्व दृष्टींनी सांभाळले आहे. ‘यापुढेही ते आहेतच’, हीच दृढ श्रद्धा साधकांनी ठेवून साधनेत वाटचाल करावी.’ – (पू.) श्री. संदीप आळशी
८ उ. साधना आणि भक्ती वाढवणे, हाच त्रासांवरील कायमस्वरूपी उपाय ! : ‘सध्या काळ प्रतिकूल असल्यामुळे साधकांना वाईट शक्तींचे त्रास अधिक प्रमाणात भोगावे लागत आहेत. एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी नियतकालिक ‘सनातन प्रभात’मध्ये एका चौकटीत लिहिले होते, ‘कागदावर काढलेल्या एका रेषेला लहान करायचे असल्यास तिच्या शेजारी दुसरी मोठी रेष काढली की, पहिली आपोआप लहान होते.’ या तत्त्वानुसार वाईट शक्तींचे त्रास दूर करण्यासाठी उपाय करण्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे, ‘आपली साधना आणि भक्ती वाढवून देवाला प्रसन्न करणे’ होय. एकदा देव प्रसन्न झाला की, वाईट शक्तींची आपल्याला त्रास देण्याची काय बिशाद ? ‘भूत पिसाच निकट नहिं आवै । महाबीर जब नाम सुनावै ।।’, असे संतश्रेष्ठ तुलसीदासांनी सांगितले आहे. महाबीर म्हणजे हनुमान. संतवचन कधीही असत्य ठरत नाही. आपल्या नामजपात आणि भक्तीत एवढी शक्ती हवी की, त्या योगे देवाला आपल्यासाठी यावेच लागेल.
साधकांनो, आपल्याला साधना आणि भक्ती यांची पराकाष्ठा करण्याचे नियतीने जणू आव्हानच दिले आहे, असे समजून श्री गुरूंचे स्मरण करून ते आव्हान स्वीकारूया ! मग पहा… अंती विजय आपलाच आहे !’ – (पू.) श्री. संदीप आळशी (२२.५.२०१६)
९. आध्यात्मिक त्रास असणार्यांना प्रेमाने समजून घेणे, ही इतरांची साधनाच आहे !
अ.‘आध्यात्मिक त्रास असणार्यांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक क्षमता आपण समजून घेऊन त्यांना प्रेमाने सांभाळून घेणे’, ही आपली साधनाच आहे.
आ. त्रास असणार्यांना सतत प्रोत्साहन देत रहावे. यामुळे त्यांचा उत्साह टिकून राहून त्रासांवर मात करण्यासाठीचे प्रयत्न करण्याची त्यांची क्षमता वाढते.
इ. त्रास असणार्या बहुतांशी जणांमध्ये एकटेपणाची भावना किंवा निराशा असते. त्यांना समष्टीमध्ये सहभागी करून घेतल्याने आणि त्यांच्यावर प्रीती (निरपेक्ष प्रेम) करण्याने त्यांची एकटेपणाची भावना किंवा निराशा अल्प करता येते. (समाप्त)
।। ॐ नमो भगवते वासुदेवाय ।।
|