गोवा-कारवार यांना जोडणारा ‘काळी’ नदीवरील ४१ वर्षे जुना पूल कोसळला

नदीत कोसळलेल्या ट्रकचा चालक सुदैवाने वाचला

काणकोण, ७ ऑगस्ट (वार्ता.) – गोवा राज्य आणि कारवार यांना जोडणारा मडगाव-मंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील ‘काळी’ नदीवर असलेल्या ४१ वर्षे जुन्या पुलाचा काही भाग मंगळवार, ६ ऑगस्ट या दिवशी रात्री कोसळला. या दुर्घटनेत एक मालवाहू ट्रक पुलावरून नदीच्या पाण्यात कोसळला. ट्रकचालक प्रसंगावधान राखून ट्रकच्या बाहेर येऊन ट्रकवर चढला आणि त्याने आरडाओरड केली. याची माहिती मिळाल्यानंतर अग्नीशमनदलाच्या सैनिकांनी त्याला सुखरूपपणे नदीच्या काठावर आणले.

हा पूल वर्ष १९८३ मध्ये उभारण्यात आला होता. हा पूल कमकुवत झाल्यामुळे ५ वर्षांपूर्वी या पुलाला समांतर पूल उभारण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावरील पुलांवरून एकेरी वाहतूक चालू होती. आता जुना पूल कोसळल्याने नवीन पुलावरून दुहेरी वाहतूक होणार आहे. गोव्यातून मंगळुरू, बेंगळुरू या ठिकाणी जाणार्‍या आंतरराज्य प्रवासी गाड्या या पुलावरून कारवारच्या दिशेने जात असतात. हा पूल कोसळल्याने या प्रवासी गाड्यांवर निर्बंध आले आहेत.