पुणे महापालिकेच्या वसतिगृह प्रशासनाच्या विरोधात अभाविपचे आंदोलन !
२ विद्यार्थ्यांचा डेंग्यू आणि कावीळने दुर्दैवी मृत्यू झाल्याचे प्रकरण !
पुणे, ७ ऑगस्ट (वार्ता.) – महानगरपालिकेच्या आंबेडकर वसतिगृहाचा निष्काळजीपणा आणि अस्वच्छता यांमुळे २ विद्यार्थ्यांचा डेंग्यू अन् कावीळ या आजारांमुळे अकाली मृत्यू झाला. प्रशासनाच्या या हलगर्जीपणाच्या विरोधात अभाविपने ६ ऑगस्ट या दिवशी तीव्र आंदोलन केले. (असे आंदोलन का करावे लागते ? महापालिका प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही ? – संपादक) संबंधित वसतिगृहात अत्यंत अस्वच्छता त्याचसह सोयी-सुविधांचा अभाव असणे याही गोष्टी आढळून आल्या. वसतिगृह प्रशासनाच्या निष्काळजी कारभारामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू होऊन २ दिवस उलटून गेल्यानंतरही वसतिगृहात ठिकठिकाणी अस्वच्छता आहे.
अभाविपने केलेल्या आंदोलनात पुढील २ दिवसांत वसतिगृह आणि वसतिगृह परिसर यांची स्वच्छता व्हावी, त्याचसह संबंधित दोषींवर कारवाई करून त्यांचे निलंबन करावे अन् मृत विद्यार्थ्यांच्या परिवारास हानीभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावर पुणे महापालिकेचे उपायुक्त श्री. नितीन उदास यांना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले आिण त्यांनी पुढील ३ दिवसांत सर्व मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन दिले आहे.