केंद्र सरकारने बांगलादेशामधील हिंदूंच्या संरक्षणाची काळजी घ्यावी ! – संघ आणि विश्व हिंदु परिषद

नागपूर – बांगलादेशामधील हिदूंना लक्ष्य करून त्यांना मारले जात आहे. तेथील हिंदूंच्या घरादारांना आग लावून त्यांना हुसकावून लावले जात आहे. केंद्र सरकारने तेथील हिंदूंचे संरक्षण करावे, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंप यांनी केली आहे.

‘बांगलादेशात हिंदु सुरक्षित रहातील, यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत’, असे रा.स्व. संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी येथे सांगितले.  नक्कीच सरकार तेथील हिंदूंच्या सुरक्षेसाठी पावले उचलेल, असेही ते म्हणाले.

विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ अधिवक्ता आलोक कुमार म्हणाले की, बांगलादेशामध्ये हिंदूंचे संरक्षण व्हावे. बांगलादेशात हिंदूंची घरे, दुकाने, कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने, महिला, मुले आणि अगदी मंदिरे अन् गुरुद्वारा, त्यांची श्रद्धाकेंद्रेही सुरक्षित नाहीत. तेथील अत्याचारित अल्पसंख्यांकांची स्थिती वाईटाकडून वाईट होत चालली आहे. केंद्र सरकारने याची नोंद घेत कारवाई करावी.