संगीतातून साधनेचा प्रवास !
‘नामसाधनेत ‘वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा’ अशा चार वाणी आहेत, त्याप्रमाणेच संगीतातही टप्पे आहेत. ‘संगीतातून साधना’ हा ईश्वरप्राप्ती होण्याचा सुलभ मार्ग आहे. साधनेच्या प्रवासातील एक टप्पा ‘अनेकातून एकात’ आणि ‘एकातून शून्यात (अनंतात)’ जाणे ’, असा आहे. त्याचप्रमाणे संगीतातील प्रवास सात स्वरांच्या माध्यमातून चालू होतो. संगीत साधनेतील प्रवास ‘सूक्ष्म नाद आकाशतत्त्वाच्या दिशेने जाणे आणि नंतर परब्रह्माशी एकरूपता साध्य करणे’, असा असतो.
१. धार्मिक विधींमध्ये श्री गणेशाला लाभलेले महत्त्वाचे स्थान आणि संगीतातील स्वरांमध्ये ‘सा’ या स्वराचे महत्त्व
प्रत्येक धार्मिक विधीचा आरंभ श्री गणेशाच्या पूजनाने होतो. श्री गणेश दशदिशांचा स्वामी आहे. त्याप्रमाणे राग-गायनात षड्ज (सा) या स्वराला महत्त्व आहे. प्रत्येक रागासाठी ‘सा’ हा स्वर लावणे पक्के झाल्याविना नंतरच्या स्वरांतील गोडी (स्वरांची स्थाने) पक्की होत नाही. प्रत्येक रागातील विशिष्ट स्वररचनेवर आधारित रागात वातावरण-निर्मिती, रस-निर्मिती आणि भाव आदी निर्माण होतात.
२. स्वरसाधना करतांना असलेले शरणागतभावाचे महत्त्व
‘गायकावर सरस्वतीदेवीची कृपा आहे’, हे ‘त्याचे प्रत्येक स्वरावर असलेले प्रभुत्व, त्याच्या आवाजातील गोडवा आणि त्याचे भावपूर्ण गायन’, यांतून लक्षात येते. ‘प्रत्येक स्वराला देवता मानून त्याच्या चरणाशी लीन होऊन त्याच्यावर प्रभुत्व मिळवणे आणि त्या स्वराला प्रसन्न करून घेऊन त्याच्याशी एकरूपता साधणे’ या दृष्टीने आपली स्वरसाधना असावी, म्हणजे आपला स्वरसाधनेमधील प्रवास ‘अनेकातून एका तत्त्वाकडे जाणे’, असा होतो.
३. स्वरसाधनेच्या माध्यमातून अनेक संतांनी केलेली ईश्वरी आराधना !
संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत सेना महाराज, संत मीराबाई, संत जनाबाई यांसारखे संत वेगवेगळे अभंग, ईशस्तुतीपर कवने, भारुड आदी रचून त्यातून ‘देव कसा आहे !’, याचे गुणगान गात असत. त्यांची ही एक प्रकारे संगीत साधनाच होती. यातूनच त्यांनी ईश्वराशी एकरूपता साधली. ते स्वरांच्या माध्यमातून ईश्वराशी एवढे एकरूप झाले की, त्यांनी जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, अवघ्या चराचरात देवाचे अस्तित्व पाहिले. त्यांनी ‘देव दिसे ठाई ठाई, भक्त लीन भक्तापायी ।’ या उक्तीची प्रचीती घेतली.
गाण्यातील स्वरांपेक्षा गायकामधील भावाला पुष्कळ महत्त्व आहे. संतांनी त्यांच्यामधील कलेचा उपयोग जनसामान्यांना ‘ईश्वर कसा आहे ! त्याची प्राप्ती कशी करायची ? त्याने काय साध्य होते ?’, हे सांगण्यासाठी केला. त्यामुळे त्यांच्या वाणीत सदैव चैतन्य असे.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून साधना करणार्या साधकांचा कलेकडे पहाण्याचा आध्यात्मिक दृष्टीकोन
‘समाजातील बहुतांश कलाकार कलेच्या सादरीकरणावर भर देतात. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षण घेणारे साधक ‘कलेतून साधना’ होण्यासाठी प्रयत्न करतात. ते ‘कलेकडे आध्यात्मिक दृष्टीने कसे पहावे ? आणि कला सादर करतांना अनुभूती कशा येतील ?’, यासाठी प्रयत्नरत आहेत. हेच महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे.
– सुश्री तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४६ वर्षे), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२९.७.२०२४)’
४. द्रष्टे ऋषिमुनी आणि संत यांची संगीत साधना पश्यंती वाणीच्या माध्यमातून असावी !
द्रष्टे ऋषिमुनी आणि संत हरिदास, संत कबीर, संत मीराबाई, यांसारखे संत अन् सत्पुरुष केवळ ईश्वरासाठीच गात असत. ते या माध्यमातून देवाशी बोलत असत आणि देवही त्यांच्याशी नाना प्रकारे हितगुज करत असे. त्या काळी ना संगीतकार होते, ना साथसंगत होती. संत आणि ऋषिमुनी यांच्या वाणीत चैतन्य होते अन् त्यांना ईश्वरी अनुसंधानाची तळमळ होती. त्या काळी गायकाची वाणी सुरेल असो वा नसो, जनसामान्यांना गाण्यातील आर्तता आणि गायकामधील देवाप्रती भाव भावत असे. अशी वाणी, जी केवळ द्रष्टे संत आणि ऋषिमुनी यांना अवगत झाली, ती पश्यंती वाणी असावी.
५. कलियुगात कलेची झालेली हानी
कलियुगात यवनी आक्रमणानंतरच्या काळात काही जणांकडून संगीत कलेचा वापर ‘प्रसिद्धी, धनप्राप्ती, उच्च पद प्राप्ती’ यांसाठी होत राहिला. त्यांना अवगत असलेली कला धन आणि लोकेषणा यांसाठी वापरली जाऊ लागली. कलियुगात संगीत कलेचा दर्जा पुष्कळ खालावला आहे. संगीत कलेला बाजारी स्वरूप आले आहे. त्यामुळे ‘संगीत कलेतून ईश्वरप्राप्ती’ ही मूळ संकल्पना दुरावत चालली आहे.
६. संगीत कलेच्या उत्थानासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले करत असलेले दैवी कार्य !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आहेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून ‘संगीतातून साधना’ या विषयावर शिक्षण दिले जात आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी कला आणि विद्या यांना साधनेची जोड देण्यासाठी गुरुकृपायोगानुसार साधनामार्ग दाखवला.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची स्थापना करून ‘संगीतयोगाची’ निर्मिती केली आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा कृपासंकल्प आणि मार्गदर्शन’ यांमुळे ‘संगीतयोग’ मार्गाची व्याप्ती विकसित झाली आहे आणि त्यात वाढ होत आहे. ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ या मार्गानुसार साधना करून आज अनेक साधक ‘संत आणि सद्गुरु’ या पदांवर विराजमान झाले आहेत.
७. संगीतयोगानुसार साधना करणारे साधक गुरुकृपायोगानुसार साधना करत असल्याने त्यांना झालेले लाभ
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून संगीतयोगानुसार साधना करणारे साधक ‘नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती, तसेच स्वभावदोष निर्मूलन, अहं निर्मूलन आणि भावजागृतीसाठी प्रयत्न करणे’, अशा अष्टांगयोग प्रक्रियेतून शीघ्र आध्यात्मिक उन्नती करत आहेत. साधकांच्या साधनेमुळे साधक गायन, वादन, नृत्य इत्यादी कला सादर करत असतांना प्रेक्षकांना केवळ सुख, समाधानच नाही, तर चैतन्य, आनंद आणि शांती जाणवणे, यांसारख्या उच्च प्रतीच्या अनुभूतीही येत आहेत.
संगीत कलाकारांनो, ‘आपणही संगीताच्या माध्यमातून साधना करावी’, असे कृतज्ञतापूर्वक सुचवावेसे वाटते.’
– श्री. जयवंत रसाळ (संगीत विशारद, वय ६३ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२९.७.२०२४)
|