आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन
सनातनचा लघुग्रंथ ‘आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन’ यातील काही दृष्टीकोन ७ ऑगस्ट या दिवशी पाहिले. आज पुढील दृष्टीकोन पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/822237.html
७. आध्यात्मिक उपायांच्या संदर्भात उपयुक्त ठरणारे दृष्टीकोन
७ अ. त्रासांच्या लक्षणांविषयी सतर्कता बाळगून आध्यात्मिक उपाय करणे : नियमितपणे बसून आध्यात्मिक उपाय करणार्या साधकांपैकी काही जण ‘सेवा पुष्कळ आहे’, हे कारण सांगून किंवा ‘सेवेतूनच उपाय होतात’, असे समजून उपाय एकदम अल्प किंवा बंद करतात. ‘सेवेतून उपाय होऊ शकतात’, हे योग्य असले, तरी त्रास असलेल्या प्रत्येकाच्याच बाबतीत असे होत नाही; कारण ते साधकाच्या त्रासाची तीव्रता, त्रासाचे स्वरूप, त्रासाशी लढण्याची साधकाची क्षमता, साधकाची आध्यात्मिक पातळी अशा विविध घटकांवर अवलंबून असते. बहुतेक वेळा साधकांनी उपाय एकदम अल्प किंवा बंद केल्याने त्यांच्या त्रासांत वाढ होऊन त्याचा परिणाम त्यांचा देह, मन, बुद्धी किंवा अहं यांवर होतो. त्यामुळे त्यांची सेवा नीट होत नाही आणि ते सेवेतून तेवढे चैतन्य ग्रहण करू शकत नाहीत.
यासाठी साधकांनी उपाय अल्प किंवा बंद केल्यावर २ – ४ दिवस ‘त्रासाची लक्षणे वाढत नाहीत ना’, हे सतर्क राहून पहावे. त्रासाची लक्षणे वाढत असल्यास पुन्हा पूर्वीसारखेच उपाय करावेत.
‘सेवेतूनच उपाय होतील; म्हणून वेगळे बसून उपाय करण्याची आवश्यकता नाही’, असे संतांनी सांगितले असल्यास त्याविषयी साधकांनी मनात शंका न आणता त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धेने करावे. मात्र असे केल्यानंतर त्रासाची लक्षणे वाढल्यास त्याविषयी संतांना नम्रपणे सांगावे.
– (पू.) श्री. संदीप आळशी (२५.९.२०२०)
७ आ. आध्यात्मिक उपायांची, तसेच सेवेचीही फलनिष्पत्ती वाढवणे
१. ‘आपल्याला उपाय एक ‘कर्मकांड’ म्हणून उरकून टाकायचे नसून ‘नामजपाच्या माध्यमातून भक्तीभाव वाढवणे आणि देवाच्या चरणांशी जाणे’, हे साध्य करायचे आहे’, हे लक्षात ठेवले पाहिजे.
२. उपायांच्या वेळी नामजप करतांना रिकाम्या खोक्यांचे उपायही केले, तर उपायांची फलनिष्पत्ती वाढते. सेवा करतांना आणि झोपतांनाही सभोवताली खोके ठेवून उपाय करता येतात. सेवा करतांना आसंदीत (खुर्चीत) दोन मांड्यांच्या मध्ये एकावर एक असे खोके सहजपणे ठेवता येतात. त्यामुळे स्वाधिष्ठान आणि मणिपूर या दोन महत्त्वाच्या कुंडलिनीचक्रांवर उपाय होत रहातात. बर्याच साधकांना स्वाधिष्ठान आणि मणिपूर या दोन चक्रांशी संबंधित त्रास अधिक असतात. त्यांना असा उपाय केल्याने पुष्कळ लाभ होईल. (रिकाम्या खोक्यांच्या उपायांविषयीचे विवेचन सनातनचा ग्रंथ ‘रिकाम्या खोक्यांचे उपाय [२ खंड]’ यात दिले आहे.)
३. शारीरिक त्रासांचा परिणाम मनावरही होतो. शारीरिक त्रासांमुळे मनाला अस्थिरता आली असल्यास त्या वेळी प्राधान्याने सेवा करावी. सेवेत लक्ष गुंतल्यामुळे शारीरिक त्रासांकडे अल्प लक्ष गेल्याने शारीरिक त्रासांचा मनावर होणारा परिणाम अल्प होतो. ग्रंथसंकलनासारख्या सेवेत मनाची एकाग्रता आवश्यक असते. अशा सेवेत मन एकाग्र होत नसल्यास त्या वेळी प्राधान्याने अल्प एकाग्रता चालू शकेल अशी सेवा (उदा. संगणकातील अनावश्यक धारिका पुसणे) करावी. त्रासामुळे मन अस्थिर असतांना किंवा झोप येत असतांना अट्टहासाने एकाग्रता आवश्यक असलेली सेवा करणे, म्हणजे त्या सेवेतील फलनिष्पत्ती स्वतःच अल्प करणे होय.
मानसिक कारणांमुळे (उदा. स्वभावदोषांमुळे) मन अस्थिर झाल्यास त्या वेळी प्राधान्याने आध्यात्मिक उपाय करावेत.उपायांमुळे मनावरचे सूक्ष्म त्रासदायक आवरण लवकर अल्प झाल्याने मनाची अस्थिरता लवकर अल्प होते. त्यानंतर सेवा करावी.
७ इ. उपायांच्या वेळी नामजप करतांना हातांच्या मुद्रा आणि न्यास करणे : बरेच साधक उपायांच्या वेळी नामजप करतांना हातांच्या मुद्रा आणि न्यास करत नाहीत. याविषयी साधकांनी पुढील दृष्टीकोन लक्षात घ्यावेत.
१. नामजप ही जशी एक उपायपद्धत आहे, तशी ‘मुद्रा आणि न्यास करणे’ ही दुसरी उपायपद्धत आहे. एकाच वेळी दोन्ही उपायपद्धतींचा लाभ घेण्याची संधी असतांना ती आपण का दवडायची ?
२. काही वेळा साधकांना त्रासामुळे मुद्रा आणि न्यास करण्याचे लक्षात रहात नाही. अशा साधकांनी याविषयी त्यांना इतरांना आठवण करून देण्यास सांगावे किंवा भ्रमणभाषवर तशी आठवण करून देणारा गजर लावावा.
३. एका हाताने न्यास आणि दुसर्या हाताने मुद्रा करून काही वेळाने हात किंवा बोटे अवघडल्यासारखी झाली किंवा दुखू लागली, तर हातांची अदलाबदल करावी. न्यास करणे शक्यच नसेल, तर मुद्रा तरी करावी.
७ ई. ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’ने उपाय शोधणे : ‘एकदा उपायांच्या वेळी मी दोन-तीन दिवसांपासून करत असलेला ‘ॐ’ हा नामजप करत होतो. बराच वेळ नामजप करूनही उपायांचा परिणाम होत नव्हता. नंतर मी ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’ने उपाय शोधून श्री अग्निदेवाचा नामजप करायला लागलो. हा नामजप करायला आरंभ केल्याच्या पुढच्याच क्षणाला मला उपायांचा परिणाम जाणवायला लागला. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धत’ ही सोपी उपायपद्धत शोधून साधकांवर केवढी कृपा केली आहे ! ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’ने उपाय शोधून ते करण्याचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.
१. व्यक्तीला त्रास देणार्या वाईट शक्ती व्यक्तीतील विकाराचे किंवा त्रासाचे मूळ स्थान वारंवार पालटत असतात. ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’ने न्यास करण्यासाठीचे स्थान स्वतः शोधायचे असल्याने प्रत्येक वेळी विकाराचे किंवा त्रासाचे स्थान शोधले जाते. त्यामुळे उपाय अचूकतेने करणे शक्य होते.
२. वाईट शक्ती पंचमहाभूतांच्या स्तरावर व्यक्तीवर आक्रमणे करत असतात. बहुतेक वेळा व्यक्तीचा विकार किंवा त्रास तोच असला, तरी वाईट शक्ती ज्या महाभूताच्या स्तरावर आक्रमण करतात, ते महाभूत वेगवेगळे असू शकते. यासाठीच त्या त्या आक्रमणाला परतवून लावण्यासाठी त्या त्या महाभूताशी संबंधित मुद्रा आणि नामजप शोधून उपाय करणे महत्त्वाचे ठरते.
वरील दोन्ही कारणांमुळे ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धती’ने उपाय शोधण्याचे महत्त्व लक्षात येते. असे असले तरी बरेच साधक या पद्धतीने उपाय शोधण्यासाठी पाऊलच उचलत नाहीत; कारण त्यांच्यामध्ये शिकण्याची तळमळ नसते. काही साधक आत्मविश्वासाच्या अभावापोटी उपाय शोधत नाहीत. काही साधकांना या पद्धतीविषयी गांभीर्य वाटत नसल्याने ते प्रयत्न करत नाहीत. गुरूंवर श्रद्धा ठेवून प्रयत्न केल्याने थोडे थोडे जमायला लागले की, आत्मविश्वास वाढतो. त्या आत्मविश्वासाच्या बळावर पुढे आणखी चांगले जमायला लागते. परात्पर गुरु डॉक्टरांचा या उपायपद्धतीमागे संकल्पही झालेला असल्याने साधकांना या पद्धतीनुसार उपाय शोधणे निश्चित जमेल अन् त्यानुसार उपाय केल्याने परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पाचे फळ मिळून साधकांचे त्रास लवकर न्यूनही होतील.
(या उपायपद्धतीचे विवेचन सनातनचा ग्रंथ ‘प्राणशक्तीवहन उपाय [२ खंड]’ यात केले आहे.)’
– (पू.) श्री. संदीप आळशी (२८.१०.२०१६)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/822721.html
(वाचा : सनातनचा लघुग्रंथ ‘आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यासाठी उपयुक्त दृष्टीकोन’) (क्रमशः)
सनातनचे ग्रंथ आणि उत्पादने यांच्या ऑनलाईन खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क क्र. : ९३२२३ १५३१७
|