‘ऑनलाईन’ वा भ्रमणभाषद्वारे होणार्या फसवणुकीच्या घटनांपासून सावध रहा !
साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि विज्ञापनदाते यांच्यासाठी सूचना !
गेल्या काही मासांपासून ‘ऑनलाईन’ वा भ्रमणभाषद्वारे होणार्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याविषयी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांमधून वेळोवेळी सूचना देऊनही अशा प्रकारच्या घटना साधक आणि धर्मप्रेमी यांच्याविषयी घडत असल्याचे आढळून येत आहे. या घटनांविषयी सर्वांमध्ये गांभीर्य निर्माण व्हावे, या उद्देशाने एका धर्मप्रेमी महिलेविषयी नुकतीच घडलेली घटना येथे देत आहोत. या धर्मप्रेमी महिला लेखा विभागाशी (‘अकाऊंट’शी) संबंधित कामे करतात. असे असूनही त्यांना या बनावट कॉलचा घोटाळा लक्षात आला नाही. त्यामुळे काेणत्याही बनावट घोटाळ्याविषयीच्या संपर्कांना फसू नये.
२९ जुलै २०२४ या दिवशी दुपारी मला एक भ्रमणभाष आला. त्या वेळी पुढील संभाषण झाले. ‘‘भाभीजी …..इनकी मिसेस (पत्नी) हो ना ।’’ त्यानंतर मी ‘हो’ म्हटले. मग ते म्हणाले, ‘‘…यांच्या ‘गूगल पे’ला (ऑनलाईन खात्यामध्ये) काही अडचण आलेली आहे. त्यामुळे त्यांनी मला हा क्रमांक दिला आहे.’’ मी ‘बरं’ म्हणून भ्रमणभाष बंद केला.
त्यानंतर त्यांनी परत त्यांनी मला भ्रमणभाष करून ‘१० सहस्र रुपये पाठवले आहेत. संदेश आला का पहा ? भ्रमणभाष चालू ठेवा’’, असे म्हटले. तो संदेश बघून मी त्यांना ‘हो’ म्हणून सांगितले. ‘‘पुढचे २ सहस्र रुपये पाठवतो. भ्रमणभाष चालू ठेवा. मी तुम्हाला २ सहस्र रुपये पाठवण्याऐवजी २० सहस्र रुपये पाठवले गेले आहेत’’, असे त्यांनी सांगितले. ‘तो संदेश आला का ? जरा बघा’, असे सांगून भ्रमणभाष बंद केला. त्यांनी परत लगेच भ्रमणभाष केला आणि म्हणाले, ‘‘संदेश आला का जरा बघा ? भ्रमणभाष चालू ठेवा. बंद कशाला करता.’’ मी म्हणाले, ‘‘मला ‘रेंज’ नाही. मी नंतर ‘ट्रान्सफर’ करते (पैसे पाठवते).’’ त्यावर ते ‘नाही’ म्हणाले. आणि ‘हे करा. भ्रमणभाष चालूच ठेवा. बंद करू नका’, असे सांगितले. यानंतर मी ‘दुसरा संदेश आला का पाहिले आणि २० सहस्र रुपये आल्याचा संदेश पाहून माझ्या ‘गूगल पे’मधून १८ सहस्र रुपये त्या व्यक्तीचा क्रमांक घेऊन ‘ट्रान्सफर’ केले. त्यानंतर त्यांनी ‘स्क्रीनशॉट’साठी (भ्रमणभाषच्या पडद्यावर दिसणार्या चित्राचे छायाचित्र) ‘व्हॉट्सॲप’ प्रणालीचा भ्रमणभाष क्रमांक देत त्यावर तो पाठवण्यास सांगितले. मी त्यावर ‘स्क्रीनशॉट’ पाठवला आणि भ्रमणभाष बंद केला. (या संपूर्ण प्रकरणात त्या व्यक्तीने ३ वेगवेगळे भ्रमणभाष वापरले होते.)
वरील संदेश पाठवल्यानंतर लक्षात आले की, ‘तो संदेश बनावट होता. ‘गूगल पे’च्या माझ्या खात्यावर त्या व्यक्तीचे कोणतेच व्यवहार झालेले नव्हते’, हे लक्षात आले. यानंतर मी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेले. त्या वेळी पोलिसांनी ‘सायबर क्राईम’ विभागाच्या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ किंवा १९३० या क्रमांकावर तक्रार करण्यास सांगितले’, तसेच संबंधित बँकेत जाऊन पैसे हस्तांतर करण्याचा व्यवहार थांबवण्याविषयी कळवण्यासही सांगितले. बँकेने तो व्यवहार थांबवून ठेवल्याने त्या व्यक्तीला माझ्या खात्यातील पैसे काढता आले नाहीत.
– एक धर्मप्रेमी महिला
सावध रहा आणि स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका !
प्रशासन, प्रसारमाध्यमे यांद्वारे समाजाला सतर्क केले जात असतांनाही अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याविषयी सतर्क रहाणे आवश्यक आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘फेडेक्स घोटाळा’ कशा प्रकारे होतो आणि त्याद्वारे समाजात लोकांची कशा प्रकारे फसवणूक होत आहे’, याची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही चौकट खालील लिंकवर उपलब्ध आहे
सध्या ‘फेडेक्स कॉलर’द्वारे करण्यात येणारा घोटाळा
लिंक : https://sanatanprabhat.org/marathi/804234.html