संपादकीय : राष्ट्रघातकी स्वप्न !

‘बांगलादेशासारखी स्थिती भारतातही येऊ शकते’, अशा प्रकारची विधाने देशातील काही राजकारण्यांकडून केली जात आहेत. ‘केंद्रातील मोदी सरकार हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करत असल्याने देशात बांगलादेशासारखी स्थिती येईल आणि मोदी यांना देशातून पळून जावे लागेल’, अशी अप्रत्यक्ष चिथावणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. याकडे अत्यंत गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता म्हणजे हिंदूंनी याकडे लक्ष देऊन स्वतःच्या आणि स्वतःच्या पुढच्या पिढीसह देशाचा विचार करून अशा विधानांना विरोध करण्यासाठी संघटितपणे पुढे आले पाहिजे. अशा प्रकारच्या विचारसरणीच्या राजकारण्यांना उत्तर दिले पाहिजे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असे लोक भारताला अराजकाच्या गर्तेत टाकण्यासाठी सिद्ध झाले आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. त्यांना देशात ‘देशविरोधी व्यक्ती’ म्हणून उघडे पाडण्याची वेळ आता आली आहे. वेळ टळून गेली, तर भारताची स्थिती अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांच्यासारखी होईल. असे झाले, तर भारतियांना भीक मागावी लागेलच, त्यासह हिंदूंना धर्मांतर करावे लागेल. जे आज बांगलादेशासारखी स्थितीची मागणी करत आहेत, तेही यात नष्ट झालेले दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही.

भारत दिवाळखोर होईल !

काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राहिलेले सलमान खुर्शीद यांनी थेट नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील शाहीन बाग येथील मुसलमानांच्या आंदोलनाचा संदर्भ देत भारतात बांगलादेशासारखी स्थिती होण्याची शक्यता वर्तवली. या विधानाद्वारे त्यांनी ‘शाहीन बाग येथील आंदोलन योग्य होते’, असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या आंदोलनामुळे काही मास देहलीतील एक महामार्ग बंद ठेवावा लागला. यामुळे देशाची सहस्रो कोटी रुपयांची हानी झाली. याविषयी खुर्शीद एक शब्द बोलत नाहीत. मुळात हे आंदोलन चुकीचे होते; कारण नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे कुणाचेही नागरिकत्व जाणार नव्हते, तर भारताच्या शेजारील देशांतून येणार्‍या निर्वासितांना भारताचे नागरिकत्व दिले जाणार होते. ‘खोट्या सूत्रांवरून देशात अराजक निर्माण करा आणि भाजपचे सरकार पाडा’, असेच खुर्शीद यांना सांगायचे आहे. खुर्शीद यांच्याप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आदीही अशाच प्रकारची भाषा बोलत आहेत. भाजप सरकार किंवा नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवरून त्यांना असे म्हणायचे आहे; मात्र भाजप सरकारमुळे आज देशाची स्थिती स्थिर आहे आणि जागतिक स्तरावर भारताची पत निर्माण झाली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. स्वतःचा राजकीय स्वार्थ साध्य होत नाही आणि त्यामध्ये नरेंद्र मोदी ही एक मोठी भिंत आहे; म्हणून या राजकीय पक्षांच्या पोटात दुखत आहे. ज्या ज्या देशांत अराजकाद्वारे सत्तांतर झाले आहे, ते देश अधोगतीला गेले आहेत, हा इतिहास आणि वर्तमान आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. बांगलादेशाचीही स्थिती भविष्यात अशीच होणार आहे, यात तिळमात्र शंका नाही. बांगलादेशाचा विकास पाकिस्तानच्या तुलनेत पुष्कळ मोठ्या प्रमाणात होत होता. हे पाकिस्तानीही मान्य करत होते. बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देशहितासाठी अनेक कठोर निर्णय घेतले, याला जर कुणी हुकूमशाही म्हणत असेल आणि त्यामुळे त्यांना हटवण्याचा प्रयत्न झाला असेल, तर हे बांगलादेशासाठी हानीकारक आहे. बांगलादेश आता ५० वर्षे मागे जाणार आहे. बांगलादेशाच्या आर्थिक विकासामध्ये भारताचा मोठा वाटा आहे. भारतीय वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मोहीम यापूर्वीपासून चालू असल्याने बांगलादेशाचा आर्थिक विकास ठप्प होऊन तोही पाकिस्तानप्रमाणे दिवाळखोरीकडेच जाणार, यात शंका नाही. जर भारतीय राजकारण्यांना असेच भारतात व्हावेसे वाटत असेल, तर ते देशद्रोही आहेत, हेच स्पष्ट होते.

हिंदूंचा विनाश !

पाकिस्तानातही अनेक वेळा अराजकाद्वारे सत्तांतर झाले आहे. ज्या सैन्यप्रमुखांनी तेथे सत्तांतर केले, तेच सैन्यप्रमुख नंतर नष्ट झाले. जनरल झिया यांनी भुत्तो यांना हटवले होते. त्या झिया यांनाच विमान अपघातात ठार करण्यात आले. परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांना हटवले, त्या मुशर्रफ यांना देश सोडून दुबईला पळावे लागले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. उद्या बांगलादेशातही हीच स्थिती येऊ शकते. जे विद्यार्थी म्हणून आंदोलन करत होते, ते विद्यार्थी नसून जमात-ए-इस्लामीचे जिहादी कार्यकर्ते आहेत. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरक्षणविरोधी आंदोलन थांबले होते; मग अचानक ते पुन्हा का आणि कुणी चालू केले ? याविषयी भारतातील राजकारण्यांनी उत्तर द्यायला हवे ? या जिहाद्यांकडून हिंदूंवर आता आक्रमणे केली जात आहेत. त्यांचा वंशसंहार करण्याचा प्रयत्न केला जात आहे, याविषयी हे राजकारणी आता का मौन बाळगून आहेत ? त्यांना भारतातही असेच व्हावेसे वाटत आहे का ? जर असे आहे, तर आता निधर्मी, सर्वधर्मसमभाववाले आणि पुरोगामी हिंदूंनी जागे होण्याची आवश्यकता आहे. आज जर ते जागे झाले नाहीत, तर तेही बांगलादेशातील हिंदूंप्रमाणे मारले जातील, यात शंका नाही. बांगलादेशात जिहाद्यांनी कम्युनिस्ट हिंदु, दलित हिंदु, अनुसूचित जाती आणि जमातीवाला हिंदु, पुरोगामी हिंदु, असे न पहाता केवळ हिंदू म्हणून त्यांच्याकडे पहात त्यांना लक्ष्य केले आहे.

विदेशी हस्तक्षेप हवा आहे का ?

बांगलादेशातील स्थितीमागे पाकिस्तान आणि अमेरिका आहे, हे आता जगजाहीर झाले आहे. शेख हसीना यांना अमेरिकेने शरण देण्याचे नाकारले आहे. शेख हसीना यांनी जगातील ५७ इस्लामी देशांपैकी कोणत्याच देशात जाण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही किंवा या देशांनीही ‘आम्ही तुम्हाला शरण देतो’ असे म्हटलेले नाही, हे लक्षात घ्यायला हवे. ‘पाकिस्तान आणि अमेरिका यांनी भारतातही अशा प्रकारचे अराजक निर्माण करावे’, असे भारतीय राजकारण्यांना वाटत आहे. राहुल गांधी यांनी देशात नुकत्याच झालेल्या निवडणुकीपूर्वी अमेरिका आणि युरोपीय देश यांना भारतातील लोकशाही वाचवण्यासाठी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले होते. त्यांचे आवाहन म्हणजे ‘बांगलादेशासारखी स्थिती भारताचीही करा’, असेच होते, हे नाकारता येणार नाही. भारतात जिहाद्यांची कमतरता नाही. भारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित आहेत. एका अहवालानुसार भारतात काश्मीरसारखी स्थिती होऊ शकणारे ५ सहस्रांहून अधिक लहान-मोठे विभाग आहेत. उद्या तेथे बांगलादेशासारखी स्थिती झाली, तर काय होणार ? याचा विचार केला पाहिजे आणि संघटित होऊन राजकारण्यांना वैध मार्गाने जाब विचारला पाहिजे. भारतातील शांतता अबाधित रहाण्यासह स्वतःला सुरक्षित करण्यासाठी हिंदूंनी कृतीशील झाले पाहिजे !

‘बांगलादेशासारखी स्थिती भारतात होऊ शकते’, म्हणणार्‍यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबा !