अनैतिकतेचे अड्डे !

सध्या सर्वत्र ‘मसाज पार्लर’ (मालिश करून देण्याचे ठिकाण) आणि ‘स्पा सेंटर’ (मालिश आणि सौंदर्याशी संबंधित अन्य सुविधा देण्याचे ठिकाण) यांचे पेव फुटले आहे. या व्यवसायाच्या आडून अनैतिक धंदे चालत असल्याची अनेक प्रकरणे ठिकठिकाणी उघड होत आहेत. ‘स्पा सेंटर’च्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालत असल्याच्या अनेक तक्रारी नोंद झाल्यामुळे गुजरात पोलिसांनी कर्णावती आणि गांधीनगर भागातील ‘स्पा सेंटर्स’वर धाडसत्राची मोहीम हाती घेतली आहे. पैशाच्या मोबदल्यात परदेशी तरुणींना या अवैध व्यवसायात ढकलल्याच्या तक्रारीही पोलिसांकडे प्रविष्ट करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गुजरात गुन्हे शाखा यासंदर्भात जोरदार कारवाई करत आहे. त्यातून अनेक परदेशी तरुणींना पोलिसांनी कह्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी चालू आहे. अशाच एका विदेशी युवतीच्या पारपत्र तपासणीसाठी पोलीस ती रहात असलेल्या हॉटेलमध्ये गेले असता सदर युवतीने प्रचंड गदारोळ केला. मद्याच्या नशेत असलेल्या या युवतीने पोलिसांनाही लाथा मारत मारहाण केली, तसेच पोलिसांवर चप्पल फेकली. या वेळी त्या युवतीच्या बहिणीनेही तिला साथ दिली. अखेर पोलिसांनी त्या दोघींनाही कह्यात घेतले.

गेल्या काही वर्षांत शहरी भागात निर्माण होऊ लागलेली ‘स्पा सेंटर’ गुन्हेगारीची केंद्रे बनू लागली आहेत. काही दिवसांपूर्वी वरळीतील एका स्पा सेंटरमध्ये महंमद अन्सारी आणि साकिब अन्सारी यांनी गुरु वाघमारे नावाच्या इसमाची हत्या केली होती. ४ ऑगस्टला बिहार पोलिसांनी शहरातील एका स्पा सेंटरवर धाड टाकून त्या ठिकाणी चालणार्‍या अनैतिक व्यवसायाचा पर्दाफाश केला. १ ऑगस्टला जोधपूरमधील रातानाडा पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ‘स्पा सेंटर’वर धाड टाकून २ विदेशी युवतींना आणि दोन तरुणांना कह्यात घेतले. या ‘स्पा सेंटर’मध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली होती. पंजाबमध्ये २९ जुलैला एका ‘स्पा सेंटर’वर धाड टाकून तेथून थायलंड येथील ४ युवतींसह काही तरुणांना पोलिसांनी अटक केली. फरिदाबादमध्ये (हरियाणा) अवैध धंदे चालणार्‍या काही ‘स्पा सेंटर्स’ना बंद करण्यात आले आहे. मागील काही मासांत ‘स्पा सेंटर’च्या आडून चालणार्‍या अनैतिक धंद्यांच्या अनेक तक्रारी आल्याने ‘स्पा सेंटर्स’ नक्की लोकांच्या त्वचेच्या आरोग्यासाठी आहेत कि अनैतिक धंदे चालवण्यासाठी ?’, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. ‘स्पा सेंटर’ आणि ‘मसाज पार्लर’ यांसारख्या गोंडस नावाखाली सर्वच शहरांमध्ये हे धंदे चालू आहेत. अनेक ठिकाणी ही केंद्रे रात्री उशिरापर्यंत चालू असतात. तेथे चालणार्‍या अवैध धंद्यामुळे स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. ही केंद्रे चालवणारे मालक आणि पोलीस यांचे काही आर्थिक लागेबांधे असतात, याचीही चौकशी करायला हवी !

–  श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.