Yogi Adityanath Says : सनातन धर्माच्या रक्षणासाठी जिद्दीने काम करावे लागेल ! – योगी आदित्यनाथ
बांगलादेशातील हिंदूंच्या स्थितीवरून उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – आज शेजारील देशांमध्ये हिंदूंना वेचून ठार मारले जात आहे. मठ आणि मंदिरे पाडली जात आहेत. इतिहासातून शिकून, संघटित होऊन सनातन धर्माच्या रक्षणासाठी जिद्दीने काम करावे लागेल, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी बांगलादेशाचे नाव न घेता केले.
इतिहासाच्या चुकांमधून धडा घेत नाही, त्याचे भविष्यही उरत नाही !
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, आज तुम्ही जगाचे सध्याचे चित्र पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, भारताचे सर्व शेजारी जळत आहेत. तेथील मंदिरे पाडली जात आहेत. हिंदूंना निवडकपणे लक्ष्य केले जात आहे. तरीही ‘ही परिस्थिती का निर्माण झाली ?’, याचा इतिहासातून शोध घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही. म्हणूनच आपण लक्षात ठेवूया की, जो समाज इतिहासात घडलेल्या चुकांमधून धडा घेत नाही, त्याचे भविष्यही उरत नाही. सनातन धर्मावर येणार्या संकटासाठी पुन्हा एकदा एकजुटीने काम करण्याची आवश्यकता आहे.