US Revokes Sheikh Hasina Visa : अमेरिकेने शेख हसीना यांना व्‍हिसा नाकारल्‍याची चर्चा !

मुलाने वृत्त फेटाळले !

(डीप स्‍टेट म्‍हणजे एखादी राज्‍यव्‍यवस्‍था सकृतदर्शनी तेथील सरकारच चालवत असले, तरी सरकारचे निर्णय ठरवण्‍यात काही अत्‍यंत बलशाली व्‍यक्‍ती असतात. या यंत्रणेला ‘डीप स्‍टेट’ म्‍हटले जाते.)

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्‍या पंतप्रधानपदाचे त्‍यागपत्र दिल्‍यानंतर शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. एका वृत्तवाहिनीने त्‍यांचा अमेरिकेत वास्‍तव्‍यास असणारा पुत्र सजीब वाजेद यांच्‍याशी संपर्क साधला. अमेरिकेचा व्‍हिसा (एखाद्या देशात काही काळासाठी रहाण्‍यासाठी मिळालेली अनुमती) रहित करण्‍यासंदर्भात चर्चा होत असल्‍याविषयी त्‍यांना विचारले असता ते म्‍हणाले की, अमेरिकेशी अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. माझ्‍या आईने बांगलादेशात बरीच वर्षे कार्य केले आहे. त्‍यामुळे ती निवृत्तीच्‍या विचारात होती.

वाजेद पुढे म्‍हणाले की, कुटुंब आता एकत्र वेळ घालवण्‍याची योजना आखत आहे. हा एकत्र वेळ कुठे आणि कसा घालवावा, यावर आम्‍ही विचार करू. मी वॉशिंग्‍टनमध्‍ये वास्‍तव्‍यास आहे. माझे काही नातेवाईक लंडनमध्‍ये, तर बहीण देहलीत रहाते. त्‍यामुळे आम्‍हाला ठाऊक नाही की, आई (शेख हसीना) सध्‍या कुठे जाईल !

बांगलादेशात चालू असलेल्‍या हिंसक निदर्शनांच्‍या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानपदाचे त्‍यागपत्र देऊन हसीना हवाई दलाच्‍या विमानाने भारतातील गाझियाबाद येथे दाखल झाल्‍या. ‘येथून त्‍या पुढे लंडनपर्यंत प्रवास करणार होत्‍या’, असे म्‍हटले जात असतांना आता त्‍या नियोजनात अडचणी निर्माण झाल्‍या आहेत. हसीना यांच्‍याकडे राजनैतिक पारपत्र किंवा अधिकृत व्‍हिसा नाही. त्‍यामुळे आधी व्‍हिसा मिळवून आणि नंतर लंडनला जाऊन त्‍यांना आश्रय मागावा लागेल. ही तांत्रिक अडचण सोडवण्‍याचा प्रयत्न लंडन आणि देहली येथून केला जात असल्‍याचे समजते.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील सत्तापालट आणि देशव्‍यापी हिंसाचारामागे अमेरिकेचा ‘डीप स्‍टेट’ कार्यरत असल्‍याचे म्‍हटले जात आहे. बांगलादेशातील विरोधी राजकीय पक्षांनी अमेरिकेला बांगलादेशातील अंतर्गत स्‍थितीत लक्ष घालण्‍याची काही काळापूर्वी विनंती केल्‍याचेही सांगितले जात आहे. त्‍यामुळेच शेख हसीना यांना अमेरिकेत प्रवेश नाकारला जाणे, हा या षड्‍यंत्राचा भाग नसेल, हे कशावरून ?