पहिल्या श्रावण सोमवारी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात १२०० किलो फुलांची मनमोहक सजावट !

श्री सिद्धेश्वर मंदिरातील योग समाधीचे दर्शन घेतांना उपस्थित शिवभक्त

सोलापूर, ६ ऑगस्ट (वार्ता.) – श्रावण मासातील प्रत्येक सोमवारी श्री सिद्धेश्वर मंदिरातील योग समाधीला सुंदर फुलांची सजावट करण्यात येते. यंदाच्या वर्षी श्रावण मासातील पहिल्या सोमवारी शिवभक्त श्री. सोमनाथ केंगनाळकर यांच्या वतीने १ सहस्र २०० किलो फुलांच्या साहाय्याने सजावट करण्यात आली होती. यात शेंवती, झेंडू, अष्टर, गुलाब, पर्पल शेवंती आदी फुलांचा वापर करण्यात आला होता. एकूण २० कामगारांनी ही सजावट केली होती. यामध्ये फुलांच्या साहाय्याने शिखरामध्ये स्वस्तिक, ओम आणि कपिलसिद्ध यांची प्रतिमा साकारली होती.

पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. या वेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते ‘फिजिओथेरपी सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले, तसेच मंदिरामध्ये शिवभक्त वर्षा वाले यांनी तांदळापासून भगवान शंकराची प्रतिकृती साकारली होती.

मंदिरातील गाभार्‍यात श्री सिद्धरामेश्वरांच्या मूर्तीचे करण्यात आलेले पूजन 
फिजिओथेरपी सेंटरचे उद्घाटन करतांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि उपस्थित मंदिराचे पदाधिकारी
मंदिरामध्ये वर्षा वाले यांनी तांदळापासून भगवान शंकराची साकारलेली प्रतिकृती