गोव्यातून ५५ सराईत गुंडांना तडीपार करण्याची प्रक्रिया चालू !
पणजी, ६ ऑगस्ट (वार्ता.) – राज्यात वर्ष २०२० ते १५ जून २०२४ या काळात गोव्यात १४९ सराईत गुंडांची नोंद झालेली आहे. यांपैकी ५५ सराईत गुंडांना तडीपार करण्यासाठीची प्रक्रिया जिल्हाधिकार्यांनी चालू केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे उत्तर दिले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी सराईत गुंडांची पोलीस ठाणेनिहाय सूची दिली. ती पुढीलप्रमाणे आहे.
मडगाव १९, वास्को १४, कळंगुट १२, मायणा-कुडतरी आणि वेर्णा प्रत्येकी १०, म्हापसा आणि वाळपई प्रत्येकी ८, फोंडा ७, कोलवा आणि कुंकळ्ळी प्रत्येकी ६, साळगाव, डिचोली आणि फातोर्डा प्रत्येकी ५, जुने गोवे आणि केपे प्रत्येकी ४, पणजी, मुरगाव, पेडणे, मांद्रे आणि काणकोण प्रत्येकी ३, म्हार्दाेळ, कुळे, कुडचडे आणि हणजूण प्रत्येकी २, तर आगशी, पर्वरी आणि सांगे येथे प्रत्येकी १ मिळून एकूण १४९ सराईत गुंडांची नोंद झाली आहे. यातील ५५ जणांना तडीपार करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकार्यांनी चालू केली आहे. तडीपार करण्यात येणार्यांची पोलीस ठाणेनिहाय सूची पुढीलप्रमाणे आहे. वेर्णा आणि मडगाव पोलीस ठाणे प्रत्येकी ६, कोलवा, वास्को आणि कुंकळ्ळी प्रत्येकी ५, म्हापसा ४, पणजी आणि मायणा-कुडतरी प्रत्येकी ३, कळंगुट, डिचोली, फातोर्डा, केपे, कुडचडे आणि फोंडा प्रत्येकी २, तर मुरगाव, सांगे, पेडणे, साळगाव, पर्वरी आणि जुने गोवे प्रत्येकी १ मिळून एकूण ५५. याखेरीज स्थानिक पोलिसांच्या वतीने वेळोवेळी सराईत गुंडांच्या घरी जाऊन किंवा त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली जात आहे. त्यांचे ‘कॉल डिटेल्स’ (भ्रमणभाषवरून केलेल्या संपर्कांची माहिती) आणि इतर माहिती तपासून त्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे.