निवडणूक आचारसंहितेमुळे पावसाळ्यापूर्वी नद्यांमधील गाळ काढता आला नाही ! – जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर
गोवा विधानसभा अधिवेशन
पणजी, ६ ऑगस्ट (वार्ता.) – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने मार्च ते मे या कालावधीत नद्यांमधील गाळ काढण्यासंबंधी फारसे काम करता आले नाही. वाळवंटी, म्हादई आणि शापोरा नद्यांचे नोव्हेंबर मासात सर्वेक्षण करून तेथील गाळ काढण्याची आवश्यकता असल्यास पाहिले जाणार आहे आणि आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी २०२५ पासून नद्यांमधील गाळ काढण्यात येणार आहे, अशी हमी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तर तासाच्या वेळी दिली. भाजपचे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री सुभाष शिरोडकर उत्तर देत होते.
आमदार प्रेमेंद्र शेट प्रश्न विचारतांना म्हणाले, ‘‘जुलै मासात पडलेल्या पावसामुळे वाळवंटी नदीला पूर येऊन नदी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. नदीतील गाळ ७ वर्षांपूर्वी काढण्यात आला होता. प्रत्येक वर्षी नद्यांचे सर्वेक्षण करून त्यातील कचरा काढण्याचे दायित्व खात्याचे आहे.’’ याला उत्तर देतांना जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले, ‘‘यंदा नद्यांना पूर येण्यास अनेक कारणे आहेत. घरातील सुका कचरा, तोडलेली झाडे आदी नदी किंवा ओहोळ यांमध्ये फेकली जातात. यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पुरासाठी काही अंशी हे एक कारण बनते. नागरिकांनी कचरा नदी किंवा नाले यांमध्ये फेकू नये. (हेही नागरिकांना सांगावे लागणे दुर्दैवी ! – संपादक) त्याचप्रमाणे यंदा आतापर्यंत विक्रमी १२० इंच पाऊस पडला आहे.’’
संपादकीय भूमिकाअशा तातडीच्या आणि काळानुसार त्याच वेळी करावयाच्या कामांना निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार नाही, असा कायदा सरकार का करत नाही ? |