सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील समस्या सोडवा, अन्यथा आंदोलन करणार !
शिवसेनेची (ठाकरे गटाची) महाविद्यालय प्रशासनाला चेतावणी
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या विविध समस्या आणि त्रुटी येत्या महिन्याभरात न सोडवल्यास, तसेच नवीन इमारत अन् वसतीगृह यांचे काम चालू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी शिवसेनेने (ठाकरे गटाने) ६ ऑगस्ट या दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना दिली आहे.
या वैद्यकीय महाविद्यालयातील विविध समस्यांविषयी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची भेट घेऊन चर्चा केली अन् त्यांना निवेदन दिले.
‘शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि शिक्षकांच्या अपुर्या संख्येमुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एन्.एम्.सी.ने) सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला १२ लाख रुपयांचा दंड केला आहे. विद्यमान महायुती सरकार, अधिष्ठाता आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या नाकर्तेपणामुळे हा दंड भरावा लागला आहे. लाखो रुपयांचा दंड होऊनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने येथील त्रुटी अद्यापपर्यंत दूर केलेल्या नाहीत. महाविकास आघाडी सरकारने ८ डिसेंबर २०२० यावर्षी या वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकूण ९६६ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. गेल्या २ वर्षांत महायुती सरकारला या महाविद्यालयाची इमारत बांधता आली नाही. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या वर्गखोल्या नाहीत. वसतीगृहाची व्यवस्था केली नाही. शिक्षक भरती केलेली नाही. विविध ५६४ पदांना मान्यता मिळालेली असतांना त्यातील केवळ २४ पदे भरली आहेत. अशा प्रकारे सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बंद पाडण्याचा महायुती सरकार प्रयत्न करत आहे’, असे या निवेदनात म्हटले आहे.