ब्रह्मोत्सवाच्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाच्या वेळी नागपूर येथील साधकांना आलेल्या अनुभूती !
१. ब्रह्मोत्सव सोहळा निर्विघ्नपणे पहाता यावा, यासाठी सूक्ष्मातून रामनाथी आश्रमात बसून गुरुदेवांना आळवणे आणि त्यानंतर सोहळा पहातांना डोळ्यांतून आनंदाश्रू वहाणे
‘सध्या माझी प्रकृती चांगली रहात नाही. ब्रह्मोत्सव सोहळा निर्विघ्नपणे बघता यावा; म्हणून परवा रात्रभर श्री गुरुदेवांच्या रामनाथी आश्रमात मानसरित्या ठाण मांडून बसलो होतो. मी त्यांना सतत आळवत होतो. ‘माझे जे काही होईल, ते होऊ दे; परंतु मला या डोळ्यांनी सोहळा पहाता येऊ दे’, अशी प्रार्थना होत होती. काल सलग ४.३० घंटे काही त्रास न होता मला हा सोहळा बघता आला. त्यामुळे मला सतत आनंद होत होता आणि डोळ्यांतून आनंदाश्रू वहात होते.’
– श्री. श्रीकांत पाध्ये
२. गुरुदेवांच्या दर्शनाची पूर्वसूचना मिळणे आणि त्यानुसारच त्यांना व्यंकटेश लक्ष्मी या रूपात पाहिल्यावर भावजागृती होणे
‘आज सकाळी मी नामजप करतांना ‘आपल्याला गुरुदेवांचे कुठल्या रूपात दर्शन होणार आहे ?’, असा विचार आल्यावर माझ्या समोर व्यंकटेश-लक्ष्मी नाव आले आणि दर्शन सोहळ्यामध्ये तेच रूप प्रत्यक्ष बघायला मिळाले. जेव्हा मी प्रत्यक्ष पद्मावती असे रूप पाहिले, तेव्हा माझी भावजागृती झाली. ‘आजचा सोहळा मी वैकुंठामध्येच प्रत्यक्ष तिरुमला तिरुपती इथे ब्रह्मोत्सव अनुभवत आहे’, असे मला वाटत होते आणि माझी भावजागृती होत होती.’
– सौ. अपर्णा घटवाई, नागपूर
३. संपूर्ण कार्यक्रमात थोड्या थोड्या वेळाने भावजागृती होणे
‘गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी संपूर्ण कार्यक्रमात माझी थोड्या थोड्या वेळाने भावजागृती होत होती. ‘आम्ही सर्व जण भाग्यशाली असल्यामुळे आम्हाला साक्षात् ईश्वराचे दर्शन होत आहे’, असे मला वाटत होते. माझ्या डोळ्यांतून सतत भावाश्रू येत होते. जेव्हा मी डोळे बंद करून प्रार्थना करत होते, तेव्हा ‘विशाल आकाशातून पिवळा प्रकाश येत आहे आणि त्यातूनच रथ येत आहे’, असे दिसत होते.’
– सौ. किरण प्रकाश जैन
४. भावजागृती होणे
‘कार्यक्रमापूर्वी माझी कंबर आणि पाय पुष्कळ दुखायला लागले, तसेच मला अस्वस्थ वाटत होते. कार्यक्रम चालू झाल्यावर गुरुचरणांशी एकरूपता जाणवत होती आणि माझा भाव सतत जागृत होत होता. अंगावर सतत रोमांचही येत होते. माझे भावाश्रू थांबत नव्हते. मी पूर्णवेळ अनुसंधानातच असल्याची जाणीव झाली.’
– सौ. उषा शरद किटकरू
(सर्व सूत्रांचा दिनांक २९.५.२०२३)
|