कसायाच्या कह्यातून सोडवून गोशाळेत दिलेला गोवंश गोशाळेतच रहाणार !
|
जळगाव – पाचोरा तालुक्यातील वरखेडी अंबे वडगाव रस्त्यावर असलेल्या अकबर युसुफ कुरेशी याच्या शेतातील एका शेडमध्ये १५ एप्रिल २०२४ या दिवशी पोलिसांनी चौकशी केली असता गोवंशियांचे अवयव कापलेल्या अवस्थेत आढळून आले होते. तसेच शेडपासून थोड्याच अंतरावर रक्तमिश्रित माती अन् जवळच पाण्याच्या टाक्या, बर्फाच्या लाद्या अशी सामुग्री आढळून आली होती. त्या वेळी कुरेशी याच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात मुक्या प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११, महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५ सी, ९, ९ ए. अंतर्गत गु.र.नं.८३/२०२४ नुसार कायदेशीर गुन्हा नोंदवून तेथील गोवंश एका स्थानिक गोशाळेकडे सुपुर्द करण्यात आला होता.
१. आरोपी अकबर युसुफ कुरेशी याने गुरांचा ताबा मिळावा; म्हणून पाचोरा न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला होता. या वेळी न्यायालयात गोशाळेचे संचालकही उपस्थित होते. त्यांनी गुरांचा ताबा गोशाळेलाच मिळावा, या हेतूने त्यांची बाजू मांडली.
२. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून गोशाळेत देण्यात आलेल्या गुरांना अकबर युसुफ कुरेशी याच्याकडे न देता ती गोशाळेकडे कायम ठेवण्याचा निर्णय दिला, तसेच ‘कुरेशी याने १६ एप्रिल २०२४ पासून ते २५ जुलै २०२४ पर्यंत एकूण १२ गुरांचा कायद्याला अनुसरून लागणारा पूर्ण खर्च म्हणजे १ लाख ८१ सहस्र ८०० रुपये ३ दिवसांच्या आत गोशाळेला द्यावा’, असा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
३. गोशाळेकडून कामकाज पहाणारे विश्व हिंदु परिषद, बजरंग दलाचे गोरक्षक अधिवक्ता हेमंत गणेश गुरव यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.