साधकांनो, नामजपादी उपायांच्या संदर्भात हे लक्षात घ्या !
१. नामजपादी उपायांच्या वेळी न झोपता प्रयत्नपूर्वक नामजप करा !
‘काही साधकांना नामजपादी उपाय करतांना झोप येते. काही वेळा वाईट शक्तींचा त्रास असणार्या साधकांच्या नामजपामध्ये व्यत्यय आणण्यासाठी वाईट शक्ती त्या साधकांना झोप आणतात. काही साधकांना दमल्यामुळेही नामजपाच्या वेळी झोप येते. झोप येत असली, तरी नामजप-उपायांचा लाभ होण्यासाठी प्रयत्नपूर्वक नामजप करणेच आवश्यक असते.
सर्वसाधारणपणे आपल्याला झोप येण्याची शक्यता असलेली वेळ टाळूनच नामजपासाठी बसावे. नामजप-उपाय करतांना साधकांना झोप येत असल्यास त्यांनी डोळ्यांवर पाणी शिंपडणे, संतांची भजने ऐकत नामजप करणे, उभे राहून नामजप करणे, जवळच्या मंदिरात जाऊन तेथे प्रदक्षिणा घालत नामजप करणे इत्यादी उपायांचा अवलंब करावा.
२. भजने ऐकत नामजप करण्यापेक्षा नुसता नामजप एकाग्रतेने करण्याचा प्रयत्न करा !
काही साधक नामजपात मन गुंतण्यासाठी संतांची भजने ऐकत नामजप करतात. हे योग्य आहे; पण हेही लक्षात घ्यावे की, भजने ऐकत नामजप करतांना भजनांकडे लक्ष गेल्याने नामजप एकाग्रतेने होण्यास मर्यादा येते. नामजप एकाग्रतेने झाला, तर तो अंतःकरणापासून होऊन त्याचा अधिक लाभ होतो. यासाठी भजने ऐकत नामजप करण्यापेक्षा नुसता नामजप एकाग्रतेने करण्याचा प्रयत्न करावा.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले