Ram Gopal Yadav : इन्‍स्‍टाग्रामवर व्‍हिडिओ बनवणारे ज्‍या प्रकारचे कपडे घालतात, त्‍यामुळे नजर शरमेने खाली जाते !

समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव यांची सामाजिक माध्‍यमांतील अश्‍लीतेवरून राज्‍यसभेत टीका  !

समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव

नवी देहली – इन्‍स्‍टाग्रामवर ‘रील’ (व्‍हिडिओ) (Instagram Reels) बनवणारे असे कपडे घालतात की नजर शरमेने खाली जाते, असे विधान  समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव(Ram Gopal Yadav)  यांनी राज्‍यसभेत केले.

खासदार यादव म्‍हणाले की,

१. आमच्‍या वेळी आम्‍हाला, ‘चरित्र्य महत्त्वाचे आहे. त्‍याचे हनन झाले की, सर्व काही संपल्‍यासारखे आहे’, असे शिकवले जात होते.

२. आज सामाजिक माध्‍यमांत अशी स्‍थिती आहे की, तेथे अश्‍लीलता, नग्‍नता यांना प्रोत्‍साहन देणार्‍या गोष्‍टी घडत आहेत. मी विशेषकरून इन्‍स्‍टाग्राम ‘रील्‍स’विषयी हेच म्‍हणेन. अशा रिल्‍स आणि ते करणारे समाज बिघडवत आहेत.

३. जे काही वेगवेगळे अहवाल समोर आले आहे आहेत, त्‍यानुसार देशातले तरुण प्रतिदिन ३ घंटे रिल्‍स पहाण्‍यात घालवतात. अश्‍लीलता, नग्‍नता पसरवणारे रिल्‍स भारतातला तरुण प्रतिदिन सरासरी ३ घंटे पहातो, असाच याचा अर्थ आहे.

४. तरुणांचा कुटुंबाशी संवाद हरवत चालला आहे. एकत्र बसून जेवण करणे, गप्‍पा मारणे यामुळे प्रेम आणि आपुलकी वाढते. आजकाल लोक एकत्र बसतात; पण भ्रमणभाष घेऊन. त्‍यांचे एकमेकांकडे लक्ष नसते.

५. आजकाल बातम्‍याही वाचायला मिळतात की, इन्‍स्‍टाग्रामवर ओळख झाली, मैत्री झाली मग लग्‍न झाले. त्‍यानंतर मुलाने मुलीची हत्‍या केली. अशा प्रकारच्‍या घटना या रिल्‍समुळे होत आहेत. समाजात मद्य सेवनाचे प्रमाणही या रिल्‍समुळे वाढले आहे.

ऑनलाईन गेम्‍समुळे मुलांच्‍या मानसिकतेवर गंभीर परिणाम होतो  ! – फौजिया खान

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या खासदार फौजिया खान

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या खासदार फौजिया खान(Fauzia Khan) यांनीही याविषयावरील चर्चेत  बोलतांना सांगितले की, ऑनलाईन गेम्‍समुळे मुलांच्‍या मानसिकतेवर गंभीर परिणाम होत आहे. पुण्‍यातल्‍या एका मुलाने ऑनलाईन गेम्‍सच्‍या आहारी जाऊन आत्‍महत्‍या केली. त्‍यामुळे सरकारने या ऑनलाईन गेम्‍स आणि सामाजिक माध्‍यमे यांच्‍या वापराविषयी एक नियमावली घोषित केली पाहिजे.

सामाजिक माध्‍यमांवर कुठेही बंधन नाही ! – खासदार विक्रमजीत सिंह  

आम आदमी पक्षाचे खासदार विक्रमजीत सिंह (MP Vikramjeet Singh) म्‍हणाले की, सध्‍याच्‍या घडीला सामाजिक माध्‍यमांवर कुठलेही बंधन नाही. सामाजिक माध्‍यमांवर काहीही लिहिलेले, बोललेले चालते. पंतप्रधान मोदी (Narendra Modi) असोत, काँग्रेसचे नेते असोत किंवा आणखी कुणीही दिग्‍गज माणूस कुणावरही काहीही शेरेबाजी केली जाते. त्‍यासाठी अत्‍यंत खालच्‍या दर्जाची भाषा वापरली जाते. सामाजिक माध्‍यमांद्वारे तिरस्‍कार पसरवला जातो.

संपादकीय भूमिका

समाजाची नैतिकता घसरल्‍यामुळे असे होत आहे. याला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत. त्‍यांनी जनतेला साधना शिकवून धर्माचरणी बनवले असते, तर आज ही स्‍थिती आली नसती !